अडखळणारे पाय भाग १
@लघुकथा
©® आरती पाटील - घाडीगांवकर
" बाबा ss, एका जागी बसा ना. कशाला सारखे मध्ये मध्ये करताय ? " सारंग ओरडून जितेंद्ररावांना म्हणाला.
" अरे बाळा दिवसभर घरात बसून नाहीतर झोपून असतो. कमरेला आणि पाठीला रग लागते. म्हणून फेरी मारत होतो." जितेंद्रराव हळू आवाजात म्हणाले.
" अहो बाबा पण तुमच्या पायाला थरथर सुटते, अडखळतात तर कशाला चालता ? झोपून रहा ना. आराम करा. पण प्लीज मध्ये मध्ये करु नका. मी महत्वाच्या फोनवर आहे. " असं म्हणत सारंग फोनवर बोलू लागला. जितेंद्रराव उदास मनाने आपल्या रूममध्ये धिमी पाऊले टाकत निघून गेले.
जितेंद्ररावांची सत्तरी सूरू होती. वयानुसार शरीराला कंप सुटायचा. सारखं झोपून किंवा सतत बसून राहील तरी कमरेला आणि पाठीला रग लागायची. घराबाहेरची ताजी हवा तर त्यांनी कित्येक महिन्यात अनुभवलीच नव्हती. सावित्राईबाईंना म्हणजेच जितेंद्ररावांच्या पत्नीला हे जग सोडून १२ वर्षे झाली होती. सून आपलं आवरून आणि नोकरांना सासऱ्यांच्या जेवणाची सूचना देऊन जायची. मुलगा सतत कामात. नातंवंड आपल्या विश्वात. त्यामुळे आहे ते आयुष्य ते रेटत होते.
आठवडाभराने एका रविवारी प्रतापराव देशमुख जितेंद्ररावांचे जुने डॉक्टर मित्र जवळपास त्यांच्याच वयाचे त्यांना भेटायला आले.
जितेंद्ररावांना मित्र भेटला आल्याचं ऐकून अतिशय आनंद झाला. ते उत्साहाने अडखळत का होईना पटापट बाहेर येण्याच्या प्रयत्नात अडखळले पण पडायच्या आधी बाजूच्या खुर्चीला पकडलं म्हणून पडता पडता राहिले.
जितेंद्ररावांना मित्र भेटला आल्याचं ऐकून अतिशय आनंद झाला. ते उत्साहाने अडखळत का होईना पटापट बाहेर येण्याच्या प्रयत्नात अडखळले पण पडायच्या आधी बाजूच्या खुर्चीला पकडलं म्हणून पडता पडता राहिले.
समोर हॉलमध्ये बसलेल्या प्रतापराव आणि इतर सर्वांनाच हे दिसलं.
" अरे जितेंद्रा, हळू ये. मी इथेच आहे. कशाला घाई करतोयस. आता लागलं असतं ना तुला. " प्रतापराव काळजी करत जितेंद्ररावाजवळ जात म्हणाले.
" अरे जितेंद्रा, हळू ये. मी इथेच आहे. कशाला घाई करतोयस. आता लागलं असतं ना तुला. " प्रतापराव काळजी करत जितेंद्ररावाजवळ जात म्हणाले.
" तुम्हीच सांगून बघा काका. तुमचं तरी ऐकतायत का ते. आम्ही सांगून कंटाळलो आहोत. " सारंगच्या बोलण्यात नाराजीचा सुर होता.
" सारंग अरे, एवढ्या दिवसांनी कोणीतरी मला भेटायला आलं आहे. त्यामुळे आनंद झाला मला एवढंच. " जितेंद्रराव हळू स्वरात म्हणाले आणि प्रतापरावांसोबत येऊन सोफ्यावर बसले.
" काका पण ही गोष्ट खरी आहे. बाबा आमचं ऐकत नाहीत. त्यांना अनेक वेळा सांगितलं आहे तुमची खोली सोडू नका म्हणून. वयानुसार अशक्त झालेत ते. पाय थरथरात त्याचे. चालताना अडखळतात. त्यांना खूपदा सांगितलं की झोपून रहा, आराम करा पण यांना घरातल्या घरात का होईना, फिरायचं आहे. आता हे या थरथरत्या आणि अडखळत्या चालण्यामुळे कुठे पडले तर माझा खर्च होईल तो वेगळा पण ऑफिसला सुट्ट्या टाकून घरी बसाव लागेल ते वेगळं. यांना काय त्याच ? आम्हांला किती टेन्शन असतं नोकरीच ते आम्हांलाच माहित. या वयात नको ते सुचत यांना. आम्ही काय सर्व सोडून यांच्या मागे पुढे करत बसायचं का आता ? 'साठी' बुद्धी नाठी म्हणतात ते उगीच नाही. " सारंग आपल्याच तालात बोलत होता.
" खबरदार जर बापाबद्दल असं काही बोलशील तर ? तुला तूझ्या ऑफिसच्या सुट्ट्या जास्त महत्वाच्या वाटतात का ? " प्रतापराव जरा कडक आवाजात म्हणाले.
" तसं नाही काका, फक्त त्यांची काळजी वाटते म्हणून..." सारंग आपली बाजू सावरत म्हणाला.
" काळजी वाटते ? खरंच ? काळजी वाटते की तुला ते पडले तर सुट्ट्या घ्याव्या लागतील याचं टेन्शन येत का ? अरे ज्या बापाने तुला...... " प्रतापराव पुढे काही बोलणार तोच जितेंद्रराव मध्ये म्हणाले, " प्रताप कशाला विषय वाढवतोयस ? सारंग माझ्या काळजी पोटीच म्हणाला. आणि एका वयानंतर मुलाचं ऐकावं. चल माझ्या रूममध्ये जाऊन बोलूयात. " असं बोलून त्यांनी प्रतापरावांना आपल्या रूममध्ये नेलं. प्रतापरावांना भेटून आज खूप दिवसांनी त्यांना खूप आनंद झाला होता.
या प्रसंगानंतर पंधरा दिवसांनी सारंगच्या नावाने एक लिफाफा आला. सारंगने तो उघडून पाहिला आणि त्याच्या पायाखालची जमीन सरकली.
