Login

अधिरा (भाग -१ )

हुंडा घेणाऱ्या आणि देण्याऱ्यांना धडा शिकवण्याच्या नादात तिने एका निरपराध मुलीच्या सुसाईड करण्यास कारणीभूत ठरली. ती त्या मुलीला वाचवू शकेल का? असे काय केले तिने की त्या मुलीने असे पाऊल उचलले? जाणून घेण्यासाठी वाचा अधिरा ही कथा.
शीर्षक:- अधिरा

भाग-१

"हे बघ अनुप, तू तुझ्या पप्पांना समजून सांग." अधिरा विनंती सुरात अनुपला म्हणाली.

"काय समजावू मी त्यांना? मला नाही वाटतं, माझे पप्पा काही चुकीचे बोलले असतील. मोठ्यांना बोलू दे ना, आपण का नाक खुपसायचे त्यात?" अनुप तिचे बोलणे न पटून थोडा चिडत म्हणाला.

"काय बोलतोयस तू, अनु? मी नाक खुपसत नाहीये. तू माझा होणारा नवरा आहेस, अनु! तू इतकं सुध्दा समजून घेऊ शकत नाहीस का मला? अरे, आधीच घरगुती साखरपुडा म्हणून किती काय काय केले माझ्या पप्पांनी. किती खर्च झाला याची कल्पना आहे का तुला? तुम्हा सर्वांना महागडे गिफ्ट दिले. तुम्ही सांगेल तसं सगळा खर्च केला, तरी तुझ्या मम्मी-पप्पांनी बोल लावलेच." अधिरा चिडत म्हणाली.

"वर पक्षाचा मान ठेवणे कर्तव्यच आहे की वधू पक्षाचे. असं काय जगावेगळं केले गं तुझ्या मम्मी-पप्पांनी? हा, सांग ना. असं ही शालूचं लग्न नसतं तर माझे पप्पा असे  काही बोलले नसते. तिच्यासाठी बोलले असतील." अनुप बेफिकिरीने म्हणाला.

"ओह, म्हणजे तुझ्या बहिणीसाठी माझ्या आईवडिलांनी द्यायचं का? हे ठीक नाहीये, अनु. तुम्ही उघड उघड नाही पण शालूच्या आडून हुंडा मागताय आम्हाला आणि शालूकडेही देताय, जो की गुन्हा आहे." ती तावातावाने म्हणाली.

"ए तू नको शिकवूस मला? गुन्हा आहे म्हणे. ते तर आधीपासूनच रूढी, परंपरा, चालीरीतीनुसार चालत आलेले आहे. तेच माझे पप्पा करत आहेत. उगीच त्याला गुन्ह्याचे नाव देऊ नकोस. आम्ही कसे मॅनेज करत आहोत हे आमचं आम्हालाच माहिती! माझं करिअर आत्ताशी कुठे सुरू झालं आहे. त्यामुळे लगेच मी हातभार नाही लावू शकत. पप्पांचा बिझनेस सध्या मंदीत चालू आहे. माझ्या बहिणींचं घर वसण्यासाठी थोडं फार तुझ्या आईवडिलांनी दिलं तर काय बिघडलं?" तो‌ चिडून तिच्याकडे रोखून पाहत म्हणाला.

"तुझ्या बहिणीचं घर वसण्यासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या घरावर का गदा आणत आहात?‌ हं.. आणि तू कधीपासून चालीरिती मानू‌ लागलास रे? छान हं, रूढी, परंपरा चालीरितीच्या नावाखाली तुम्ही तुमची पोळी आमच्याकडून चांगलीच भाजून घेत आहात की." ती उपरोधिक हसत टोला मारत म्हणाली.

"तू जरा तोंड सांभाळून बोल. तुला जर पटत नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही. तू विचार करू शकतेस." तो थोडा गुर्मीत बोलला.

"काय बोलतोयस तू हे! अरे, प्रेम करतो आपण. तरीही असे का बोलतोस?" ती भरल्या डोळ्यांनी पाहत दुःखी होत म्हणाली.

"प्रेम आहे म्हणून तुझं इतकं ऐकून घेतलं. नाही तर मी हे लग्न तोडले असते." तो आताही गुर्मीनेच म्हणाला आणि तिच्याकडे तिखट नजर टाकून तिचं बोलणं न ऐकताच निघूनही गेला.

त्याचे बोलणे तिच्या मनाला खूप लागले. ती खिन्न मनाने जाणाऱ्या त्याच्याकडे पाहू लागली.

ती नाराज होऊन घरी आली. तिला दोन दिवसांपूर्वीची त्यांची साखरपुड्याची घटना आठवली आणि ओठांवर हसू तरळले; पण तेही थोड्या वेळासाठीच.. नंतर मात्र त्याचे बोलणे आठवले आणि तिचे मन पुन्हा उदास झाले.

ती विचार मनात करू लागली,"आज जर आपण त्याच्यापुढे झुकलो तर ते पुढेही चालीरितीच्या नावाखाली आपल्याला झुकवतील. त्यांच्या मागण्या वाढत जातील. अनुज असा असेल असे वाटले नव्हते. बस, आता पुढे नाते नेण्यात काहीच अर्थ नाही. त्यानेच हा मार्ग दाखवला आहे, तर तेच योग्य राहिलं."

खूप विचार करून तिने एक निर्णय घेतला.

दोन दिवसांपूर्वी अधिरा आणि अनुप यांचा दोन्ही घरच्या संमतीने साखरपुडा झाला होता. घरगुती साखरपुडा असूनही अनुपच्या आईवडिलांनी बऱ्याच मागण्या केल्या होत्या. अधिरा एकुलती एक मुलगी असल्याने तिच्या आईवडिलांनी काहीही आढेवेढे न घेता त्या मागण्या पूर्ण केल्या होत्या. पण त्या पूर्ण करताना त्यांची काय अवस्था होत होती हे तिने पाहिले होते. तिच्या लग्नासाठी ठेवलेली ठेव त्यांनी साखरपुड्यातच खर्च केली होती. लग्नही थाटामाटात व्हावे ही अनुपच्या घरांच्याची मागणी होती. त्यात त्यांनी खूप अवास्तव सोने, गाडी, किमती वस्तू आणि टू बी एच के फ्लॅटचीही मागणी केली होती. तेही त्यांच्या मुलीकडच्या वरपक्षाने मागितले म्हणून मागतोय, नाही तर आम्ही मागितले नसते. सध्या आमचे तेवढे बजेट नाहीये. (चेहऱ्यावर गंभीर भाव आणत) असंही तुम्ही तुमच्या मुलीला देतच आहात तर ते आमचेच झाले ना आणि रूढी, परंपरा, चालीरिती आपण कसे टाळू शकतो ना.' ते हसत म्हणाले  होते.

अधिराचे आईवडील जरी सधन असले तरी ह्या अवास्तव मागण्या ऐकूनच त्यांच्या घशाला कोरड पडली होती. मुलीच्या सुखासाठी त्यांनी होकार दिला होता. त्यासाठी ते त्यांचे राहते घर गहाण ठेवण्याचा विचार करत होते. ही गोष्ट तिला कळल्यावर तिने अनुपशी बोलायचे ठरवले. त्याच्याशी बोलल्यावर त्याचे बोलणे ऐकून तिला वाईट वाटले. तिने पूर्ण विचारांती एक निर्णय घेतला.

क्रमशः

काय निर्णय घेतला असेल तिने?

©️ जयश्री शिंदे

प्रस्तुत कथा पूर्णतः काल्पनिक आहे.
0

🎭 Series Post

View all