Login

आयुष्याची वाताहत...

आयुष्याची वाताहत
अजून किती दिवस वाट पाहायची मी ? झाले ना तुझ्या आईला जाऊन २ महिने ? कधी सांगणार आहेस तुझ्या बायकोला ?
काव्याने रोहितच्या मिठीचा विळखा सोडवत रागाने विचारले.

हे बघ थोडा धीर धर . मनात येईल ते बोलून लगेच गोष्टी संपत नाहीत. पुढे होणाऱ्या परिस्थितीचा पण विचार करावा लागतो. रोहित तिला शांत करत म्हणाला.

ठीक आहे मग आयुष्यभर विचारच करत बस . देते होकार मी आई वडिलांनी आणलेल्या मुलाला. मीच मूर्ख जे तुझ्या नादी लागून वाट बघत बसले. एकीकडे माझ्याशिवाय जगू शकत नाही म्हणतोस आणि दुसरीकडे बायकोला सोडायला तयार नाही.
ते काही नाही रविवारपर्यंत जर तू तिला हाकलून नाही दिलंस तर पुन्हा येऊच नको माझ्याकडे.

रोहितला धमकावून काव्या शांतपणे रुममधून बाहेर पडली आणि इकडे रोहित बुचकळ्यात पडला.

काव्या आणि रोहितची ओळख ५ वर्षांपूर्वी कॉलेजमध्ये शिकत असताना झाली.
त्यानंतर दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले. काहीना काही कामानिमित्त ती बऱ्याचदा रोहितच्या घरी येत जात असायची. यातून रीमाताईना म्हणजे रोहितच्या आईला काव्याच्या राहणीमानाचा, स्वभावाचा अंदाज आला होता.

एकुलती एक असल्याने प्रचंड लाडावलेली, हट्टी तसेच
तिचे बिनधास्त वागणे , बोल्ड विचार , कपड्यांची , खाण्यापिण्याची आवड वैगेरे पाहून त्यांना ती सून म्हणून कधीच आवडली नाही.
ती जर स्वतःमध्ये थोडाफार बदल करणार असेल तर विचार करु असे त्यांनी रोहितला स्पष्टच सांगितले होते.

मी आहे तशीच राहणार. दुसऱ्यांसाठी स्वतःच्या आवडी निवडी बदलू शकत नाही म्हणत काव्याही अडून बसली.

शेवटी कुणीच माघार घ्यायला तयार नव्हतं त्यामुळे रीमाताईंच्या पसंतीने सिद्धीचा सून म्हणून घरात प्रवेश झाला.

सिद्धी मुळातच सुंदर आणि शिकलेली होती. मध्यमवर्गीय कुटुंबातले चांगले संस्कार तिच्यावर होते त्यामुळे महिनाभरातच तिने रोहितचे मन जिंकून घेतले आणि अशाप्रकारे रोहित हळूहळू काव्याला विसरून गेला.

लग्न होऊन दीड वर्षे झाली तोच रिमाताई एका आजाराचे निम्मित होऊन देवाघरी गेल्या.
सिद्धीने त्यांची शेवटपर्यंत सेवा केली होती.
आता खऱ्या अर्थाने दोघांचे आयुष्य सुरू होणार तेवढ्यात एका कॉमन मित्राद्वारे अनपेक्षितपणे काव्या आणि रोहितची भेट झाली. भेटीगाठी वाढल्या पुन्हा जुन्या आठवणी जाग्या झाल्या.

रोहितला एकीकडे सिद्धीला फसवत असल्याने अपराधी वाटत होते तर दुसरीकडे काव्या रोहितच्या मनात आपले विचार बिंबवण्यात यशस्वी झाली की - आपले प्रेम खरे आहे म्हणून नशिबाने आपली भेट पुन्हा झाली. तेव्हाही आपण एकत्र आलो असतो , आपलाही संसार सुखाचा असता पण तुझ्या आईने घोळ घातला आणि स्वतःच्या आवडीची मुलगी तुझ्या गळ्यात पाडली.
बघं अजूनही वेळ गेलेली नाही तुमच्या लग्नाला फक्त दीड दोन वर्षे झाली आहेत. अजूनही मूलबाळ नाही आहे त्यामुळे आपल्याबद्दल खरं काय ते सांगून घटस्फोट घे मग आपल्या लग्नाचा मार्ग मोकळा. नाहीतर मला दुसऱ्याशी लग्नाचा विचार करावा लागेल.
रोहितलाही आता काव्याचं म्हणणं पटू लागलं होतं. खरंच आईमुळे सिद्धी मला सिद्धीला होकार द्यावा लागला आणि माझं प्रेम दुरावलं.

पण सिद्धीला जर हे समजलं तर ती कशी रिॲक्ट करेल ? मला समजून घेईल का ? की आकांडतांडव करेल ? अशा अनेक प्रश्नांनी रोहितला त्रासून सोडले होते.
शेवटी समोरासमोर बोलण्याची हिंमत नसल्याने त्याने हे सर्व चिठ्ठीद्वारे लिहिले आणि सिद्धीचं सहज लक्ष जाईल अशाप्रकारे बेडरूममध्ये ती चिठ्ठी ठेवून तो ऑफिसला निघून गेला.

संध्याकाळचे ४ वाजले तरी अजून सिद्धीचा काही कॉल msg नाही. तिने ती चिठ्ठी वाचली असेल का ? काय वाटलं असेल तिला ? रोहितला आता तिथल्या परिस्थितीचा अंदाज येत नव्हता.

संध्याकाळी तो घरी पोचला तेव्हा घर पूर्ण अंधारात बुडालं होतं आणि सिद्धीचा काही पत्ताच नव्हता. शिवाय तिचं सामानही जागेवर नव्हतं.

खरंतर सकाळी रोहित गेल्यानंतर थोड्याच वेळात सिद्धीला ती चिट्ठी मिळाली होती. काही महिन्यांपासून रोहितच्या बदललेल्या वागणुकीमुळे काहीतरी चुकीचं होत असल्याचा तिला संशय आलाच होता त्यामुळे तिनेही जास्त ताणलं नाही आणि तडकाफडकी घर सोडून माहेरी निघून गेली.

रात्री रोहितला तिने मेसेज टाकला.
" ठीक आहे जर तुला तुझ्या खऱ्या प्रेमाची जाणीव झालीच आहे तर मी तुला या नात्यातून मुक्त करते. लवकरच तुला घटस्फोट मिळेल."

रोहितला आधी विश्वासच बसेना. त्याने लगेच ही बातमी काव्याला दिली.
दुसऱ्या दिवशी काव्या मोजक्या सामानासकट रोहितच्या घरी पोचली. तिचा तो उत्साह आणि चेहऱ्यावरचा आनंद पाहून रोहितला आपण बरोबर केल्याची खात्री पटली.
दोघेही आता एकत्र लिव्ह इन रिलेशन मध्ये राहू लागले.

थोड्याच दिवसात रोहितला सिद्धीपासून घटस्फोट मिळाला आणि ती आयुष्यात पुढे निघून गेली.

आणि इकडे खऱ्या प्रेमाच्या नावाखाली रोहितच्या आयुष्याची वाताहत व्हायला सुरुवात झाली.

सुरुवातीचे दोन महिने गोडीगुलाबीत पार पडले.
मग मात्र घरकामाची सवय नसल्याने काव्याने सरळ सकाळ - संध्याकाळ दोन मदतनीस लावल्या होत्या आणि स्वतः मात्र मोबाईल आणि मैत्रिणींमध्ये व्यस्त राहू लागली.
शिवाय आठवड्यातून ४ वेळा बाहेरचं जेवण , वीकेंडच्या नावाखाली फिरायला जाणे , शॉपिंग करणे , यामुळे रोहितचा विनाकारण खर्च होऊ लागला.
महिन्याभराचं आर्थिक बजेट कोलमडू लागलं.
त्याने बऱ्याचदा काव्याला समजावून सांगितले पण ही तर आजकालची लाईफ स्टाईलच आहे. तू प्लीज मला टिप्पिकल बायकांसारखं वागायला सांगू नकोस म्हणत काव्याने त्याला गप्प केलं.

काव्याचे शौक आणि राहणीमानही तसे उंची होते त्यामुळे रोहितने काही गोष्टींना नकार दिला की ती चिडचिड करायची. आदळ आपट करायची . कधी कधी तर दहा दहा दिवस आईकडे जाऊन राहायची त्यामुळे सगळा भार रोहित वर पडायचा.

आताशा रोहितला जाणवू लागले की आईचा निर्णय योग्यच होता.
सिद्धीच्या असण्याने घराला जे घरपण आणि चैतन्य आले होते ते आता कुठेतरी हरवले होते. आपलंच घर त्याला अनोळखी वाटत होतं.
त्याच्या डोळ्यावरची खऱ्या प्रेमाची पट्टी आता उतरली होती.
आणि कितीही पश्र्चाताप केला तरी तो काहीच करू शकणार नव्हता.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →