शॉर्टफिल्म लेखन स्पर्धा जुलै २०२६
सारंगी: (पोटाला हात लावून बेडवर बसते) आजी, खूप जळजळ होतेय ग! पित्ताचा भयंकर त्रास होतोय.
आजी: (हातात लिंबू पाणी देत) हे घे! सारू, काय ग तुमची ही आजकालची जीवनशैली? रात्री उशिरापर्यंत जागणं, व्यायाम नाही आणि वेळी-अवेळी जंक फूड खाणं! वजन किती वाढलंय बघ तुझं.
सारंगी: (चिडून) आजी, रात्री ऑफिसचं खूप काम होतं. भूक लागली म्हणून अंडी, ब्रेड खाल्ले. व्यायाम करायला वेळ कुठे असतो? आणि हा जाडपणा मला अनुवंशिकतेमुळे मिळालाय, त्याला मी काय करू?
आजी: अनुवंशिकता वैगरे काही नसतं. मूळ गोम तुमच्या सवयींमध्ये आहे. शरीराला हालचाल नाही आणि पोटाला सकस आहार नाही, म्हणून हे वजन वाढतंय. मी सांगते तसं घरचं साधे जेवण खा आणि व्यायाम कर. फक्त एक महिना करून बघ, पित्ताचा त्रास पळून जाईल.
सारंगी: बरं, फक्त एकच महिना हं!(दुसऱ्या दिवशी सकाळी आजी नाश्त्याला गरम थालीपीठ आणि लोणी देते.)
सारंगी: (थालीपीठाकडे बघून) आजी, एवढं लोणी? माझं वजन अजून वाढेल ना!
आजी: हे घरचं शुद्ध लोणी आहे, याने वजन नाही वाढत. आणि हे थालीपीठ बघ, यात सगळी धान्यं आणि डाळी आहेत, अत्यंत पौष्टिक आहे हे!
(दुपारी जेवणात लाल भोपळ्याचे भरीत, डाळ घालून मेथीची भाजी आणि फुलके पाहून सारंगी तोंड वाकडं करते.)
सारंगी: आजी, मला यातलं काहीच आवडत नाही. मला फक्त वरण-भात दे.
आजी: शब्द दिलायस ना, मग ताट संपव! तुझं ते डाएट फूड म्हणून तू जे प्रोटीन शेक आणि सॅलड खातेस, त्यापेक्षा हे घरचं सात्विक जेवण खा. यात तुला प्रोटीन आणि सॅलडही मिळेल.
(रोज सकाळी सहाला आजी सारंगीला बागेत पळायला घेऊन जाते. महिनाभर हा नियम चालू राहतो.)
सारंगी: (एक महिन्यानंतर, आनंदाने आजीला मिठी मारते) आजी, बघ! माझं वजन एक किलोने कमी झालंय!
आजी: (हसत) आणि तुझा तो पित्ताचा त्रास?
सारंगी: तो तर कधीच गायब झाला! आता दिवसभर फ्रेश वाटतं मला. आरोग्याची गुरुकिल्ली महागड्या प्रोटीन शेकमध्ये किंवा जिममध्ये नाही, तर तुझ्या हाताच्या सात्विक जेवणात आणि व्यायामात आहे. थँक्यू आजी!
आजी: (प्रेमाने पाठीवरून हात फिरवत) असंच कायम
आपले आरोग्य जप!
©️ ज्योती सिनफळ
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
