Login

आपली माणसं ...!

आपली माणसं
सॉरी आज ठरवूनही लवकर यायला जमलं नाही.
हे काय तुमचं जेवण एवढ्या लवकर आटोपलं पण?
दाराशी सॅन्डेल काढून आत येत अनुजा आपल्या आई वडीलांना म्हणाली.

हो मग ,अनघाने वेळेत स्वयंपाक आटोपला आणि गरम असतानाच वाढले बघ. नेहमीपेक्षा दोन घास आम्हाला जास्तचं गेले.
रिमाताई आपल्या लेकीच्या म्हणजे अनुजाच्या मोठ्या जावेचं अनघाच कौतुक करत म्हणाल्या.

हो आई वहिनी आहेतच तश्या . त्यांच्यामुळेच मी निर्धास्त राहून नोकरी करू शकते. आपल्या रेवाला पण माझ्यापेक्षा जास्त लळा तिच्या काकूंचा आहे.

बस झालं हा माझं कौतुक . आपली माणसं म्हणून हे करणं माझं कर्तव्यच आहे . मी काही वेगळं करत नाहीये अनघाने हसून उत्तर दिले.

अनुजाचे आई वडील आज तिच्या धाकट्या बहिणीच्या साखरपुड्याचे आमंत्रण द्यायला आले होते पण नेमकं तिला यायला उशीर झाला आणि तिच्या जावेने त्यांचा उत्तम पाहुणचार केला.

५ वर्षापूर्वी सासूबाई निवर्तल्या आणि त्यांच्या पश्चात मोठी सून म्हणून अनघाने कुटुंब उत्तमं सांभाळलं होतं. धाकटी अनुजा आणि तिचा नवरा रितेश आपल्या ६ वर्षाच्या रेवाला अनघाच्या हाती सोपवून नोकरी करत होते.
वहिनीवर कामाचा भार नको म्हणून अनुजाने सकाळी लवकर उठून चहा नाश्ता तसेच आपला , नवऱ्याचा आणि मोठ्या दिराचा शैलेशचा डबा तयार करायची जबाबदारी घेतली होती.
तसेच सुट्टीच्या दिवशी पण ती वहिनीला घरकामात हातभार लावत असे.

आणि एके दिवशी या हसत्या खेळत्या कुटुंबाला नजर लागलीच.
वर्षभरापासून विदेशात राहणाऱ्या इंदू मावशी म्हणजे सासूबाईंच्या मोठ्या बहीण कायमच्या भारतात परत आल्या.
एकट्याच राहत असल्यामुळे त्यांची अनघाशी सलगी वाढली.
हळूहळू त्यांनी अनघाच्या मनात अनुजाबद्दल विष पेरायला सुरुवात केली.
सुरुवातीला अनघाने दुर्लक्ष केलं

पण एकेदिवशी मात्र ..

काय गं अनघा आज दुपारी घरी का नाही आलीस ? तुला दोन दिवसाआधी सांगितलं होतं ना की आपल्या कॉलनीतल्या मैत्रिणी दुपारी नाटक बघायला जाणार आहेत.
फोनही उचलले नाहीस वर दाराला पण मोठं कुलूप. कॉलनीत राहणाऱ्या नेहाने अनघाला विचारले.

सॉरी नेमकं आजच रेवाच्या शाळेत मीटिंग होती म्हणून जावं लागलं आणि फोनही सायलेंटवर होता. - अनघा.

नेहा - छान . म्हणजे हे पण आता तूच करतेस का ? अगं कधीतरी स्वतःसाठी वेळ काढ. कधीपर्यंत एकत्र कुटुंबाच्या नावाखाली सर्वांच करत बसणार आहेस?
रेवा आता लहान आहे म्हणून तुझ्या भरवश्यावर चाललंय सगळं. पण उद्या गरज संपली की तुला विचारतील तरी का ?

नेहा काहीही बरळू नकोस. - अनघा तिला रागात ओरडत म्हणाली.

काहीही कुठे खरं तेच बोलतेय ती . त्यांच्या संवाद सुरू असतानाच इंदुमावशी आत आल्या.
अनघा मी पण तुला हेच सांगत होते पण तुला पटलं नाही. तुझ्या शेजाऱ्यांना देखील हेच वाटतं बघं. आतातरी डोळे उघड आणि नीट विचार कर. आपली माणसं आपले कुटुंब करत त्यांनी घरातली आणि मुलीची जबाबदारी तुझ्या गळ्यात मारली आहे. तू मात्र खुशाल करत बसलीस.
अनघाला विचारात टाकून नेहा आणि इंदू मावशी निघून गेल्या.

इकडे अनघावर याचा परिणाम झाला आणि तिचा अनुजाशी एक प्रकारे अबोला सुरू झाला.

शेवटी न राहवून तिच्या नवऱ्याने म्हणजेच शैलेशने अनघाला याचा जाब विचारला.

मला आता सर्वांच करत बसायचा कंटाळा आलाय .
तुमची आणि आपल्या मुलांची जबाबदारी ठीक आहे पण मी त्यांचं काहीही करणार नाही . आपण वेगळे राहू. अनघाने इतके दिवस आपल्या मनात साचलेल्या गोष्टी बाहेर काढल्याच.

मूर्ख आहेस का तू ? एवढं मोठं प्रशस्त घराच्या वाटण्या करून मी काय आयुष्यभर दुसऱ्या घराचे हफ्ते फेडू ? आणि नोकरी करण्याची मुभा तुलासुद्धा आहे पण तू खुशीने घर सांभाळायचं स्वीकारलस.
राहिला प्रश्न अनुजाचा तर ती नोकरी करूनही तुला घरकामात मदत करते.
गेल्यावर्षी हट्टाने तिने पगारातून आपल्या घराचं इंटेरियर केलं. कधी तुला पैशांची गरज असेल तर नकार नाही दिला . तिच्या आणि आपल्या मुलात भेदभाव नाही केला.

अजून काय हवंय तुला ?

शैलेशच्या या उत्तराने अनघाचे समाधान झाले नाही आणि तिने आपला हेका तसाच ठेवला.

काही दिवसांनी...

हॅलो ताई अगं आईला अचानक हार्ट अटॅक आला आहे . आम्ही आताच ऍडमिट केले आहे. ९०% ब्लॉकेज आहेत. डॉक्टरांनी तातडीने ओपन हार्ट सर्जरी करायला सांगितली. मी वरचे पैसे भरले आहेत दीड लाख कमी पडतायंत प्लीज काहीतरी व्यवस्था कर .
पलीकडून अनघाचा भाऊ बोलत होता.
त्याच बोलणं ऐकून अनघा मटकन खालीच बसली.
घरात एवढी रक्कम नाही .आहे तो पैसा FD मध्ये गुंतवलेला त्यात सलग बँकेला जोडून ३ सुट्ट्या. अशा परिस्थितीत काय करावे कोणाला कळेना .

अचानक काहीतरी आठवल्यासारखे करून अनघाने इंदुमावशीला फोन करून मदत मागितली.
अनघा मी समजू शकते पण माझ्या कुटुंबाच्या संमतीशिवाय मला एवढी मोठी रक्कम नाही देता येणार. शिवाय माझा मुलगा आणि सून परदेशात आहेत.असं म्हणून मावशींनी फोन ठेवला.

भरघोस पेन्शन शिवाय उच्चवर्गीय परिस्थिती असणाऱ्या इंदुमावशीने नकार देणं अनघाला खटकलं.

काहीतरी करू म्हणत अनघा आणि शैलेश हॉस्पिटलला पोहोचले.

ताई अगदी वेळेत व्यवस्था झाली बघं पैशांची. थोड्याच वेळात ऑपरेशन होईल. अनघाच्या भावाने सांगितले.

आता मात्र अनघा आणि शैलेशने आश्चर्यचकित होऊन विचारले.
कोणी केली एवढ्या मोठ्या रकमेची व्यवस्था ?

हे काय तुला अनुजाने सांगितले नाही ?
अगं आताच अनुजाने तिच्या आई वडीलांना पाठवले होते. तुमची अडचण अनुजाने त्यांना सांगितली होती म्हणून त्यांनी
धाकट्या मुलीच्या साखरपुड्यासाठी काही पैसे घरी ठेवले होते त्यातलेच दिले. मी नकार दिला तर मला म्हणाले की तुम्ही आपलीच माणसं आहात . तुमच्यासाठी करणं हे आमचं कर्तव्यच आहे. खरंच ताई खूप समजूतदार आणि मोठ्या मनाची माणसं आहेत ती .

आतापर्यंत ऐपत असणाऱ्या ओळखीच्या लोकांना मी विचारणा केली पण कोणीच मदत केली नाही. तू मात्र चांगली माणसं कमावलीस.

भावाच्या उत्तराने अनघाचे डोळे खाडकन उघडले.
शेवटी या कठीण परिस्थितीने तिला आपल्या माणसांची आपल्या कुटुंबाची जाणीव करून दिली होती.
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →