Login

आपली माणसं?(अंतिम भाग)

नातं हे दोघांनी सांभाळलं तर ते फुलतं आणि टिकतं.


अंतिम भाग
**************************"
डिलिवरीला एक महिना होऊन गेला. आता मात्र निखिलला नीरजा आणि बाळा शिवाय करमेना झालं. त्याने एक दिवस निरिजाला फोन केला.

" हॅलो...अगं कधी येणार आहेस?"

"तुम्हीं सांगा...तुम्ही याल घ्यायला तेव्हा येईल मी."


"अगं पण तुला तर माहीत आहे नीता वहिनी नाही आता आणि तुला जमेल ना एवढं काम."

"अहो ,आई आहेत की मदतीला त्या आता नाही तश्या वागणार. शेवटी त्यांना नातू झाला आहे."


"बरं ....आठ दिवसात येतो मी घ्यायला.".


"ठीक आहे."


निखिल गेला आणि निरजाला घेऊन आला.

तिचं बाळ फक्त सव्वा महिन्याचं असेल. ती आल्याबरोबर बेडरूममध्ये गेली बाळाला ठेवलं, फ्रेश झाली आणि  मग देवाच्या दर्शन घेतलं आणि सासूबाईंचं पण.


" हे बघ...आता संध्याकाळ होणार आहे त्याआधी तू जेवण बनवलं नाही तर बाळ काहीही करू देणार तूला."

" हो ...त्याला झोपवते."


ती बाळाला झोपवायला बेडरूममध्ये गेली.


" आई, अगं तू करा ना आजच्या दिवस स्वयंपाक बिचारी खूप थकून आली आहे."


"बिलकुल नाही सून आहे ती डोक्यावर घ्यायला मला नाही जमणार तू  घे डोक्यावर तिला."

तो बेडरूममध्ये आला.

" नीरजा  बाहेरून मागवू का काही कारण तू आज खूप दमली आहेस ना. बाळ पण सारखं रडत आहे आज?


"नाही... नको.. करते मी."


तिने बाळाला झोपवलं आणि ती किचनमधे गेली. तिने वरण भात लावला भाजी केली आणि पाच सहा पोळ्या केल्या तो पर्यंत बाळ उठलं.

ती धावतच गेली आणि बाळाला घेतलं. किचन ओटा तसाच पडला होता.

ते बघून सासूबाई चिडचिड करायला लागली.

सासूबाई आणि सासरे यांनी जेवण करून घेतलं.

आता फक्त दोन पोळ्या उरल्या होत्या.


"निखिल, अरे ये जेवायला दोन पोळ्या आहे. बाकी सगळं संपल..तिला म्हणावं कढी आणि खिचडी कर."

असं बोलून सासूबाई निघून गेल्या त्यांच्या रूममधे.

निखिल किचनमधे आला. बाळ काही केल्या चूप रहायला तयार नव्हतं. त्याला कळलं होतं की निरजाला खूप भूक लागली आहे.त्याने डाळ तांदूळ धुतले आणि खिचडी लावली.


खिचडी झाल्यावर  नीरजाला  किचन मध्ये बोलावलं.


" नीरजा ये जेवायला, भूक नाही लागली का तुला?"


\" हो आलेच. तुला खूप काम करावं लागलं ना, काय करू बाळ शांत राहत नव्हतं."


तिने दोन ताट वाढले.

"नीरजा... मी खिचडी खातो तू पोळी घे."

"नाही...नाही...आवडते मला खिचडी तू घे पोळी."
" सव्वा महिन्याची बाळंतीण तू जरा बाळाचा विचार कर."


दोघे जेवले आणि नीरजाने सगळं आवरून घेतलं. आता हे रोजच सुरू होतं, सासूबाईंनी ना बाळ सांभाळायची मदत केली ना घरकामात.  पण निराजने एका शब्दानेही काहीही म्हटलं नाही.

मात्र हे सगळं निखिलच्या लक्षात आले होते. त्याने आईला बऱ्याच वेळा समजून सांगितले की काही दिवस तिला समजून घे.पण आई काहीच ऐकायला तयार नव्हती. तुम्ही तुमचं बघा मला जमणार नाही .मग त्याने बाहेर रूम बघितली आणि एक दिवस घरी जेवतांना म्हणाला,

" आई, अगं मी ना एक दोन दिवसात दुसरीकडे  जाणार आहे रहायला. मला ऑफिस जरा लांब पडत मग घरी यायला उशीर होतो. तिला भूक लागली असते मात्र बाळाला घ्यायला कुणी नसल्यामुळे स्वयंपाकाला खूप उशीर होतो.

"त्यात काय एवढं आम्ही नाही केलं का एकट्याने.आपल्या माणसांना सोडून जाणार तू?"

"आपली माणसं ...खरचं अशी असतात? आपली माणसं!!!! जी दुसऱ्यांची फजिती होत आहे, त्याला त्रास होत आहे पण मदतीचं एक पाऊल पुढे  टाकत नाही फक्त बघतात ती केवळ मज्जा. तुम्ही सगळे तसे वागले तरी मी नाही वागू शकत, ती माझी बायको आहे आणि ते माझं बाळ आहे. हो एक अजून सांगतो, तिला काहीही माहीत नाही यातलं आणि तिने कधीही कंप्लेंट नाही केली तुमच्या बद्दल."


यावर कुणी काहीही बोललं नाही आणि दोन दिवसांनी निखिल ने सामान शिफ्ट केलं.

नातं हे एका बाजूने वाचवण्याचा  खूप प्रयत्न केला तरीही काहीच हाती उरत नाही. नाती ही दोघांनी सांभाळली तरच फुलतात आणि  टिकतात.

माझी ही कथा कशी वाटली नक्की कळवा. धन्यवाद!
समाप्त....
©®कल्पना सावळे




0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →