Login

आपली माणसं? (भाग १)

नातं हे दोघांनी सांभाळलं तर फुलतं आणि टिकतं.


भाग १
*******************************
नीरजा आणि निखिल दोघांचं अरेंज मॅरेज. नीरजा दिसायला एकदम सुंदर, शिकलेली मात्र कामात जरा हळू म्हणजे यायचं तिला सगळं मात्र तिला थोडा वेळ लागायचा.

निखिल अत्यंत हुशार, दिसायला राजबिंडा आणि कामात तर त्याचा कुणी हात धरू शकणार नाही असा.नीरजा वर जीव ओवाळून टाकणारा.

लग्न झाल्यावर नीरजाला प्रत्येक कामात वेळ लागायचा त्यामुळे सासूबाईंनी चिडचिड करायला सुरुवात केली. तिने तिच्या मोठ्या सुने जवळ बोलून दाखवलं.

"हिला लग्न करून घरी आणली, काहीही येत नाही. नशीब फुटलं बाई लेकाचं."

नीरजाने हे ऐकलं ,ती  काहीच बोलली नाही मात्र तिला खूप वाईट वाटलं.


संध्याकाळी  निखिल घरी आला. तिचा पडलेला चेहरा बघून त्याला वाटलं घरात काहीतरी घडलेलं आहे. जेवण झाली आणि नीरजा सगळं आवरून बेडरुममधे गेली.

निखिलने नीरजाचा हात हातात घेतला आणि  म्हणाला,

" तू काही नाही बोललीस तरीही तुझा चेहरा सगळं सांगून जातो...काय झालं?"

हे ऐकून तिच्या डोळ्यांत पाणी आलंl.त्याने तिला घट्ट मिठी मारली. कारण त्याला माहित होत त्याची आई आणि वहिनी कशी आहे.
साधारण सहा महिने झाले आणि नीरजा गरोदर राहिली. तिला वाटलं आता तरी घरातली माणसं आपल्याशी चांगली वागतील.  एकदा डॉक्टरांकडून कन्फर्म करायचं होतं  म्हणून डॉक्टर कडे जाण्यासाठी निखिलने सुटी घेतली.

" काय निखिल! आज काही विशेष  म्हणजे  ऑफिसला नाही गेलास म्हणून विचारलं?"


तो काही बोलायच्या आतच..वहिनी म्हणाली,

" बायकोने म्हटले असणार घरी राहा, जरा बाहेर जाऊ."


" अरे वा!!! वहिनी ...तुम्हाला बरं माहीत  आणि हो अगदी बरोबर बोललात."

" आई आम्ही जरा डॉक्टरकडे जाऊन येतो. नीरजाला घेऊन जातो दवाखाण्यात."


" तिला काय धाड भरली आहे भरल्या घरात आता."


" आई अगं तिला जरा उलट्या होत आहेत म्हणून."


" बरं झालं रात्री काही उशिरा जेवत नाही. कधी कधी तर तुझ्या आधीच खाऊन घेते."

निखिल काहीही न बोलता आत गेला आणि दोघे रेडी होऊन बाहेर निघाले.


गाडीत बसल्यानंतर...


" सॉरी....निखिल."

" का गं ? काय झालं?"


" माझ्यामुळे तुला घरच्यांची बोलणी खावी लागली. तू उगाच मला पसंत केलं. मी कामात खूप स्लो आहे, मला कुणाशी बोलता येत नाही. तुझंही आयुष्य बरबाद केलं मी."

" तुझं तू ठरवणार आहेस का? की मी काही बोलू?"

बोलता बोलता हॉस्पिटल आलं .दोघे हॉस्पिटल मध्ये गेले.


डॉक्टरांनी तिला तपासलं.

" अभिनंदन नीरजा आणि निखिल, आई बाबा होणार आहात. पण जरा काळजी घ्यायला हवी. नीरजा तू जास्त काम करू नको आणि काही जड उचलू नको. म्हणजे साधारण  चार पाच महिने मग सगळं एकदम ओके."


"हो... नक्की तिची काळजी घ्यायला बरीच माणसं आहेत घरात."



दोघेही खूप खूश झाले. घरी आले , निखिल आल्याबरोबर ओरडला,


" आई...आई.. अगं कुठे आहेस? अगं मी बाबा होणार आहे."

" मग यात नवीन काय आहे? लग्न झाल्यावर सगळेच आई बाबा होतात. बस झालं कौतुक, आत जा नीरजा पोळ्या लाटून घे.आज काहीच काम केले नाहीस तू."


निखिल काही बोलणार त्या आधी नीरजा बोलली,


" हो...मलाही खूप भूक लागली आहे. लगेच करते."

साधारण तीन महिने झाले असतील. नीरजाला  जरा बरं वाटतं नव्हतं तर म्हणून ती उशिरा उठली आणि निखिल पण ऑफिस कामानिमित्त बाहेरगावी गेला होता.
नीरजाला बघत तिची जाऊ बोलली,

" उठल्या का महाराणी? .... अगं काही लाज बीज आहे का नाही..माहेरी नाही तू."

नीरजा काही न बोलता ब्रश करून  किचनमधे गेली आणि काहीतरी खायला शोधू लागली


" नीरजा डोक फिरल़ं का? आधी आंघोळ करून घे आणि नाष्टा कर." सासूबाईंनी मोठे डोळे केले.


" पण मला खूप भूक लागली आहे."


"आंघोळ करेपर्यंत काही मरणार नाही बाळ."

हे ऐकून  निरजाच्या काळजात धस्स झालं. ती आंघोळीला निघून गेली. बाथरूममध्ये गेल्या बरोबर तिला चक्कर आली आणि ती खाली पडली.


सासरे जोरात ओरडले,

"अरे बघा तिला जरा दोन जीवाची बाई आहे ती."

"गप्प बसा उंटावरून शेळ्या हाकु नका. जा मग एवढी काळजी आहे तर."

"गेलो असतो गं पण मला खाटेवरून उठता आले असते तर."


जाऊ बाई गेली तिला हात धरून बाहेर आणलं.

काय होईल पुढे? नीरजा सोबत सासरची माणसं वागतील का चांगली की नाही?? ... बघू पुढच्या भागात.
धन्यवाद!
क्रमशः...
©®कल्पना सावळे
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →