आनंदाचे डोही, आनंद तरंग...

आनंदाचे डोह,ी आनंद तरंग...

स्पर्धा
लघुकथा
आनंदाचे डोही, आनंद तरंग...

अरूणा आज आॅफिसमधून थोडी लवकर घरी आली.आज सकाळपासूनच तिचा मूड ठीक नव्हता. नवरा, मुलं अजून घरी यायची होती. काय करावं तिला सुचेना.

कधी कधी असं होतं, की कामाचा जाम कंटाळा येतो. घरची कामं, ऑफिसची कामं, मुलांचा अभ्यास तेच ते. यात काहीतरी बदल नक्की हवा असतो. कुटुंबासोबत कुठे जायचं म्हटलं, की ते ही बरेचदा शक्य होत नाही. अरूणाला सुद्धा आज असंच वाटत होतं. आता आर्यालाच घरी बोलावून घेते असे म्हणत तिने तिची मैत्रीण आर्याला फोन लावला व घरी बोलावून घेतले.

बरं झालं तू आलीस आर्या. आज माझा मूड ठीक नाही गं आणि कामाचाही खूप कंटाळा आला गं.अरूणा म्हणाली.
बस एवढंचं चल, बाहेर कुठेतरी जाऊन येऊ. बर्डीवर जाऊ. चलतेस? आर्या म्हणाली.

अगं घरी एवढ्या वस्तू झाल्या आहेत, की त्या आपापसात नुसत्या भांडत असतात. साडी, ड्रेस घ्यायचे म्हटलं तर घरी कपाटात एवढ्या साड्या, ड्रेसेस आहेत, की कपाट उघडताच ते सर्व टुणकन उड्या मारत आपल्या अंगावर येतात.

अगं वेडाबाई मार्केटमध्ये गेलं तर काही घ्यायलाच हवं का? तू आधी चल बघू माझ्याबरोबर. आर्या म्हणाली.

अरूणाने चप्पल घातली. कुलुप लावले व दोघी मार्केटमध्ये आल्या. दोघींनीही अगदी जुजबी अशी टिकली पाकीट, बांगड्या, की चेन अशी थोड्याफार वस्तूंची खरेदी केली. छान आईस्क्रीम वगैरे खाऊन त्या दोघी घरी आल्या आणि खरंच अरुणाला एकदम फ्रेश वाटायला लागलं. लगेच आर्या आपल्या घरी निघून गेली.

खरंच कधी कधी आपला मेंदू काम करून थकून जातो. अशावेळी असे आनंदाचे थांबे गरजेचे असतात. प्रसिद्ध लेखक प्र.के. अत्रे नेहमी म्हणायचे, की माझं मन जेव्हा उदास होतं तेव्हा मी समुद्रकिनारी किंवा एखाद्या घनदाट वृक्षराजीत जाऊन बसतो. झाडांशी बोलतो. समुद्राच्या लाटांशी हितगुज करतो. खरंच असंच करायला पाहिजे.

कधी कधी भाजी मार्केटमध्ये जाणं सुद्धा आपला मूड फ्रेश करणारं ठरतं. 'घ्या, घ्या दहा रुपयाची मेथीची जुडी, वीस रुपये किलो टमाटे, घ्या, घ्या ६० रुपये किलो आंबे, १०० ला दोन किलो लावले. घ्या, घ्या." आता सांगा त्या भाजी विक्रेत्या स्त्री-पुरुषांना काय घरच्या चिंता नसतील ? पण त्या सर्व विसरून ते जोरा जोरात ओरडत वस्तू विकत असतात. हसत हसत ग्राहकांशी बोलत असतात. एकमेकांची थट्टामस्करी करत असतात. त्यांच्याकडे पाहिलं, की आपण आपली उदासिनता विसरून जातो.

म्हणूनच अधून मधून स्ट्रीट फूड वर जाणे, फेरीवाल्या जवळच्या वस्तू घेणं. उगाचचं थोडी घासाघीस करणं. यामुळे सुद्धा आपल्या मूड मध्ये बदल होतो व थोड्या वेळासाठी का होईना आपलं मन आनंदीत होतं.फक्त याकरिता कोण काय म्हणेल? ही अहंकाराची झूल बाजूला ठेवावी लागते. कारण आनंद आपल्याला स्वतः ला मिळवायचा असतो. इतरांना नाही. बागेत एखाद्या झाडाजवळ जाऊन बसणे, झाडाशी बोलणे, त्याला मनातल्या गोष्टी सांगून मन हलके करणे. यातूनही आपण आनंद शोधू शकतो.
संत तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे.
आनंदाचे डोही, आनंद तरंग
आनंदाचि अंग, आनंदाचे.

सौ. रेखा देशमुख

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →