Login

गुन्हेगाराची आई आणि तिचा आक्रोश

Aakrosh


गुन्हेगाराची आई...


    प्राथमिक आरोग्य केंद्रातल्या एका नर्सने दरवाजा ठोठावला,  तेव्हा पहाटेचे सहा वाजले होते. मालतीताई  झोपेतच होत्या, दार उघडलं, आणि त्यांनी नर्सचा चेहरा पाहिला, आणि तीने त्यांच्याकडे पाहत म्हंटल, प्रज्ञा कशी आहे असं म्हणतं ती प्रज्ञा जवळ गेली, नर्स रुटीन चेकअपला आली होती.

    अहो काकी, प्रज्ञा गेली आहे अहो, नर्स बोलली, मालतीताईनीं जोरात रडायला सुरवात केली, आणि त्या हरामखोराच्या प्रतीकच्या नावाने शिव्या घालू लागल्या, प्रज्ञाची बॉडी घरी आणण्यात आली, सगळा परिसर हळहळत होता.


    आजूबाजूच्या गावांतले लोक आले होते. ओळखीचे, अनोळखी, काही रडत होते, काही नुसतेच गप्प उभे होते, पण सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच भाव होता, त्या नालायकाला शिक्षा व्हावी.


           मालतीताईनी त्या दिवशी काहीही खाल्लं नाही, भिंतीला टेकून बसून राहिल्या, शेजारणी आल्या, नातेवाईक आले, कोणी पाणी दिलं, कोणी हात धरला,  त्यांना काहीच जाणवलं नाही.


    मालतीताई मध्येच बोलू लागल्या,"माझ्या पोरीला खूप मोठं व्हायचं होतं. शिकून स्वतः च्या पायावर उभं राहायचं होतं, नर्स व्हायचं स्वप्न होतं तिचं, पण आज ही वेळ आली माझ्या लेकीवर, असं बोलून त्यांनी हंबरडा फोडला, वडील,  बहीण - भाऊ सगळे रडतं होते.


      प्रज्ञा तेरावीला शिकणारी एक मुलगी, गावातील एका गुंड मुलाने तिच्यावर बलात्कार केला होता, आणि तिला दूर झाडीत फेकून दिले होते, तिच्यावर त्याचं प्रेम होतं, पण त्या गुंडाला प्रज्ञा हो बोलत नव्हती म्हणून त्या रागाचा वचपा काढण्यासाठी त्याने तिच्यावर अत्याचार केले होते.


      संध्याकाळी उशिरा एका बाईने तिला शेतात बघितलं आणि मग सगळ्यांना कळवलं, प्रज्ञाची अवस्था वाईट होती, पण तीने शुद्धीत असताना प्रतीकचं नाव घेतलं, आणि त्यानंतर ती अजूनच आजारी पडली, आता आठ दिवस ती कोमात होती, आठ दिवसांनी तीने प्राण सोडला, प्रतीकला अटक झाली.


       प्रतीकचे वडील दारू पिऊन त्याच्या लहानपणीचं वारले होते, त्याच्या आईने गंगाबाईने लोकांच्या घरची धुणी - भांडी करून प्रतीकला वाढवले होते, पण गंगाबाई कामासाठी दिवसभर बाहेर असायच्या, प्रतीकला घरी ओरडायला कोणीच नव्हतं, मग तो मित्रांच्या वाईट संगतीने वाया गेला.

    
    
      इकडे प्रज्ञाचं प्रेत नेण्यातं आले, प्रतीकची आई दुरून पाहत होती, तिच्या प्रेताकडे बघून लांबूनच मनातल्या मनात म्हणाली, बाई, चूक झाली गं, माफ कर प्रतीकला, माझ्या पोराच्या वतीने मी तुझी क्षमा मागते. तुझ्या देहाची राख होणार आज आणि माझ्या आयुष्याची पण वाट लावून गेलाय तो नालायक पोरगा...


    त्यांनी लांबूनच त्या पांढऱ्या वस्त्राकडे पाहिलं. हात जोडले, डोळे मिटले, त्या परत फिरल्या, आणि घरी येऊन खूप रडल्या, तीन दिवस गेले, त्या जेवल्या नाहीत, रडून दिवस काढत राहिल्या.


     प्रतीक पोलीस कोठडीत होता. तालुक्याच्या ठाण्यात होता, त्या एकदाही त्याला भेटायला गेल्या नव्हत्या. जाण्याची इच्छा नव्हती की शक्ती नव्हती हे त्यांनाच माहीत नव्हतं.


     तीन महिन्यांनी एके दिवशी सकाळी कोणीतरी दरवाजा ठोठावला, समोर प्रकाश होता, प्रतीकचा जुना मित्र......"मावशी, प्रतीक तुझी खूप आठवण काढतो. चूक झाली म्हणतो." प्रकाश म्हणाला.


    "आता काय उपयोग त्याचा." त्यांचा आवाज कोरडा होता. "मला तो मेला." गंगाबाई रडतं बोलल्या.


   प्रकाश खाली पाहत राहिला. मग हळूच म्हणाला,"तसं नाय मावशी. पण म्हणाला, पैशाची सोय झाली तर सुटू शकतो. कोणी प्रत्यक्ष साक्षीदार नाही ना...


मालतीबाईंनी त्याच्याकडे पाहिलं.
"म्हणजे?"
"म्हणजे,  वकील म्हणतो, केस कमकुवत आहे. पैसे लागतील,  पण सुटायची शक्यता आहे."


    त्यांच्या डोळ्यासमोर प्रज्ञाचा पांढऱ्या वस्त्रातला देह आला.....त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही.

प्रकाश उठला आणि निघून गेला.

      कोर्टात प्रतीकला पेश करणार होते त्या दिवशी गंगाबाई तयार झाल्या....का गेल्या, हे त्यांनाही माहीत नव्हतं. कदाचित आईपण सुटत नाही इतक्या सहज, कदाचित त्यांना एकदा त्याचा चेहरा पाहायचा होता.


     कोर्टाच्या आवारात माणसांची गर्दी होती. वकील, पक्षकार, पोलीस, आणि नुसतेच पाहायला आलेले. अशा प्रसंगी गर्दी होतेच, कोणाचंही दुर्दैव पाहायला माणसांना वेळ असतोचं.


पोलिसांची गाडी आली.


प्रतीक उतरला, हात बांधलेले, भोवती पोलिसांचं वर्तुळ. त्याने आईला पाहिलं. त्याचा चेहरा....तोच चेहरा जो गंगाबाईंनी अठरा तास कळा सोसून जन्माला घातला होता,  त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र भाव आला. आनंद? आश्चर्य?


तो ओरडला.. आई.. आई....तू आलीस...


गंगाबाईंच्या पोटात गोळा आला, सगळं जग भोवती फिरतंय असं वाटू लागलं.


       हात बांधलेले असूनही, पोलिसांच्या गराड्यातही, तो चालत आईकडे आला. त्यांनी त्याच्याकडे पाहिलं एकवार, वरून खाली, आणि गंगाबाईच्या आत काहीतरी तुटलं आणि त्यांनी त्याच्या जोरात कानाखाली मारली आणि बोलल्या पुन्हा तूझ्या तोंडातून आई बाहेर आलं नाही पाहिजे, मेली तुझी आई केव्हाचं, असं बोलून त्या त्याला अजून मारायला त्याच्या अंगावर धावून जाऊ लागल्या, त्याच अवधीत एका पोलिसाने धक्का दिला.


     कृश, थकलेल्या गंगाबाई धाडकन खाली पडल्या, तो पोलीस त्यांच्याकडे पाहत उभा राहिला, काय करायचं हे न सुचल्यासारखा, आणि गंगाबाई तशाच पडून राहिल्या, उठायची इच्छाच नव्हती, मग त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले, आतून, खोलातून. ते कोणालाच थांबवता येईना.


" प्रतीक तूझ्याबरोबर मी पण अडकले रे. या आयुष्यात.,  देवा, मला सोडव यातून. मी आता काय करू?

     उरलेलं आयुष्य गुन्हेगाराची आई म्हणून घालवू कां मी.....त्या जोरात आक्रोश करू लागल्या...


   तो आक्रोश जमलेल्या माणसाचं आतडं पिळवटून टाकणारा  होता, त्यांचा कोर्टाच्या आवारात घुमला. माणसं थांबली. कोणी पुढे झाले, कोणी बाजूला सरले. एक वकील मध्येच थांबला,  त्याच्या हातातले कागद तसेच राहिले.


    दोन पोलिसांनी प्रतीकला पुढे नेलं,  लगेच, घाईघाईने.

    प्रतीकच्या कानापर्यंत ती हाक पोचली की नाही कोणास ठाऊक? त्याने मागे वळून पाहिलं का, कोणी पाहिलं नाही.


    रडणाऱ्या गंगाबाईना उचलायला एक कोर्टातली टायपिस्ट मॅडम पुढे आली आणि हळूच म्हणाली.......

"आत्तापर्यंत किती मुलींच्या आयांनी आक्रोश केला असेल, आणि किती गुन्हेगारांच्या आयांनी हाय खाल्ली असेल. पण त्यांचं दुःख, ते कधी त्या पोरांपर्यंत पोचतच नाही, जवानीची मस्ती, गुर्मी ह्यातं आईचा आवाज बुडून जातो. कधी पोचेल तो आवाज, कोणास ठाऊक.

कदाचित हीच मोठी शिक्षा असते एका आईला,  मुलाच्या गुन्ह्याची शिक्षा कायदा देत नाही, पण आयुष्य देतं..रोज. थेंब थेंब.


समाप्त.


सौ. सोनल गुरुनाथ शिंदे
देवरुख
0