Login

माझी आई काय भाजी करते.. अंतिम भाग

आईचा स्वयंपाक
माझी आई काय भाजी करते... भाग ३





"आईसारखं नाही झालं.." सलीलचे हे वाक्य ऐकताच प्रियाने त्याच्याकडे बघितले.. "पण छान झालं आहे." सलीलने वाक्य पूर्ण केले. जेवण झाल्यावर त्याने न सांगता मागचं आवरण्यात प्रियाला मदत केली.

"आजचं झालं.. उद्यापासून?" प्रियाने प्रश्न विचारला.

"बघू, कसं जमतंय ते.." सलील हसत म्हणाला. प्रिया रोज चुकतमाकत स्वयंपाक करत होती. काही चुकलं तर आरडाओरड न करता सलील तिला समजून घेत होता. आणि एके दिवशी फायनली प्रियाला तिखटामीठाचा अंदाज आला. तो दिवस दोघांनीही आपल्या पद्धतीने साजरा केला. आठ दिवसांसाठी म्हणून गेलेल्या शोभाताई महिनाभर माहेरीच अडकल्या. तसा त्यांचा रोज फोन यायचा.. पण तिथून त्याही खूप विचारू शकत नव्हत्या.. आणि हे दोघेही जास्त काही सांगत नव्हते.

"सलील, उद्या सुट्टी काढ बरं.. मी आणि बाबा उद्याच्या गाडीने येतो आहोत. स्टेशनवर घ्यायला ये आम्हाला." शोभाताईंनी कळवले.

"दुपारीच याल ना? मग तसं प्रियाला सांगतो. म्हणजे ती स्वयंपाक करून ठेवेल." सलीलचं बोलणं ऐकून शोभाताईंना प्रियाने केलेल्या भाजीची आठवण झाली.

"अरे, तिला कशाला उगाच त्रास? मी बघते ना.. नाहीतर इथूनच करून आणते."

"आई, तू इथे येईपर्यंत दुपार होणार. सकाळी तरी तू कधी करून निघणार? आणि इथे येऊन कधी करणार? त्यापेक्षा प्रिया करेल. तू ये.." शोभाताईंना पुढे काहीच बोलू न देता सलीलने फोन ठेवला. शोभाताई आणि मधुकरराव दुसर्‍या दिवशी दुपारी गाडीतून खाली उतरले. सलील गाडी घेऊन आला होता.

"मी काय म्हणते, आपल्या नेहमीच्या हॉटेलमधून आपण खायला घेऊन जाऊ ना." शोभाताईंनी शेवटचा प्रयत्न केला.

"आई.. चल घरी.." सलीलने गाडी घराच्या दिशेने वळवली.

"आपल्या घरी आलं की किती छान वाटतं ना?" न राहवून शोभाताई म्हणाल्या.

"हो.. आपलं घर ते आपलंच." मधुकररावांनी पुस्ती जोडली.

"आईबाबा, फ्रेश होऊन या.. पानं वाढायला घेते." प्रिया पाणी घेऊन आली होती.

"काय केलं आहेस गं?" मधुकररावांनी विचारले.

"समजेलच.." प्रिया स्वयंपाकघरात गेली तर हे दोघे फ्रेश व्हायला. दोघे आले तेव्हा प्रियाने पाने करायला घेतली होती. श्रीखंड, पोळी, कोशिंबीर, बटाट्याची भाजी.. आणि अळूचं फतफतं. बेत बघून मधुकरराव खुश झाले.

"अरे व्वा.. छान बेत केला आहेस.. रंगही जमला आहे." मधुकरराव म्हणाले.

"खाऊन सांगा ना.. चव आली आहे का?" प्रियाने आग्रह केला.

"सुंदर.. हे खाऊन मला माझ्या आईच्या हातच्या भाजीची आठवण झाली. ती सुध्दा भाजीत मक्याचे कणीस आणि काजू घालायची." मधुकरराव म्हणाले. ते ऐकून शोभाताईंचा चेहरा उतरला.

"मला नाही आवडायचा मका ज्यात त्यात. म्हणून तर मी घालणं बंद केलं " त्या म्हणाल्या आणि त्यांनी जीभ चावली.

"पण आई प्रिया मक्याचे पदार्थ काय सॉलीड करते. कॉर्न पॅटिस खाऊन बघ. बोटं चाटत राहशील." सलील म्हणाला. मधुकरराव आणि सलील प्रेमाने जेवत होते. शोभाताईंनी कसंबसं ताटात वाढलेलं संपवलं.

"मला जरा थकायला झालं आहे.. मी पडते आत जाऊन." कोणाचीच वाट न बघता त्या ताटावरून उठल्या. ते बघून सलील आणि मधुकरराव जेवायचे थांबले.

"तुम्ही जेवा. मी आलेच." प्रिया बडीशेप घेऊन शोभाताईंच्या खोलीत गेली.

"आई.." तिने हाक मारताच शोभाताईंनी पटकन डोळ्यातलं पाणी पुसलं.

"काय गं?"

"स्वयंपाक आवडला नाही का?" प्रियाने विचारले.

"आवडला ना.. पण मी जरा दमले होते ना." शोभाताई सावरत म्हणाल्या.

"किती अवघड असतं ना?" प्रिया म्हणाली.

"काय??" शोभाताईंनी विचारले.

"दुसर्‍याच्या हातचा स्वयंपाक पटकन स्वीकारणे. म्हणजे बघा हं.. तुम्हाला माझ्या हातचा स्वीकारणे जड जात आहे.. आजींना कदाचित तुमच्या हातचा स्वीकारायला जड गेलं असेल."

"हो.. त्या असेपर्यंत त्यांनी कधी स्वयंपाकघर सोडलं नाही बघ. त्या गेल्यावरच मला माझ्या आवडीचं काहीतरी करता आलं.. नाहीतर त्या जे करायच्या तसंच खावं लागायचे."

"ही चूक आपण टाळली तर?"

"म्हणजे?" शोभाताईंनी आश्चर्याने विचारले.

"म्हणजे.. एक दिवस तुमच्या पद्धतीने एक दिवस माझ्या पद्धतीने. म्हणजे कोणालाच मन मारून जगायला नको." प्रिया म्हणाली.

"हो.. आणि त्याबरोबर आम्हाला ही रोज वेगवेगळ्या चवीचं खायला मिळेल." मधुकरराव आणि सलील एकदम म्हणाले.
आणि चौघांच्याही चेहर्‍यावर हसू उमटले.


आईने आणि बायकोने केलेला स्वयंपाक.. नवविवाहितांच्या संसारातला पहिला प्रश्न. ना हिला दुखावता येते ना तिला. अश्या वेळेस दोन्ही बाजूंनी समजून घेतलं तर प्रश्न सोडवता नक्कीच येतो. पण तशी इच्छा लागते. हे दाखवण्याचा एक प्रयत्न. तो कसा वाटला हे तुम्ही सांगालच.

साहित्यचोर आणि यूट्युबवर व्हिडिओ बनवणाऱ्यांना साभार नकार.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →