Login

माझी आई काय भाजी करते.. भाग २

आईचा स्वयंपाक
माझी आई काय भाजी करते.. भाग २



"झाली का गं भाजी?" त्यांनी आत येऊन विचारले.

"हो.. झाली.. जरा चव बघता का?"

"नको.. जेवतानाच बघू.." शोभाताई म्हणाल्या. प्रियाचा चेहरा उतरला. तिने स्वतःच मग चव बघितली. भाजी ओके वाटत होती. सगळे जेवायला बसले. प्रिया जेवायला वाढू लागली.

"खूप भूक लागली आहे. काय आहे जेवायला?" सलीलने विचारले.

"आज प्रियाने स्वयंपाक केला आहे. तिच सांगेल." शोभाताई म्हणाल्या.

"अरे व्वा.. आज वेगळं काहीतरी खायला मिळणार." मधुकरराव, सलीलचे बाबा म्हणाले. ते ऐकून प्रियाला बरं वाटलं. भाजीचा रंग बघून सलीलच्या चेहर्‍यावरचा रंग मात्र उडाला.

"काय रे काय झालं?" प्रियाने विचारले.

"भाजी हिरवी का दिसते आहे?"

"मिरची टाकली म्हणून.."

"पण मिरची का टाकलीस?" शोभाताईंनी विचारले.

"मग काय टाकायचे होते?" निराश होऊन प्रियाने विचारले.

"अगं.. मी तिखट टाकते ना.."

"मग तू सांगितलं का नाही?" मधुकररावांनी बायकोला विचारले.

"सांगितलं तर होतं.. जे जे विचारलं ते. आता मला काय माहीत ही मिरची टाकेल म्हणून." शोभाताई म्हणाल्या.

"बरं.. मिरची असो वा तिखट.. खा आता. पानावर बसून अन्नाला नावे ठेवू नकोस." मधुकरराव म्हणाले. नाईलाजाने सलीलने जेवायला सुरूवात केली.

"हे काय? भाजी सगळी तोंडात येते आहे. कशी चिरली आहे?" सलीलने परत तोंड वाकडे केले.

"सलील, मी पहिल्यांदाच चिरली आहे. तुला आवडते म्हणून मी ही भाजी केली."

"करायची तर नीट करायचीस ना? ही अशी काय?" सलील पानावरून उठू लागला.

"दिवसभराचा उपाशी तू भरल्या पानावरून उठू नकोस.. थांब मी पटकन पिठलं करून आणते." शोभाताईंनी पटकन पिठलं करून आणलं. सलीलने अळूच्या भाजीकडे बघितलं देखील नाही. प्रिया कशीबशी जेवून उठली. तिच्या डोळ्यात पाणी होते. सगळं आवरून ती बेडरूममध्ये गेली. सलील हातात मोबाईल घेऊन बसला होता. प्रिया काही न बोलता बेडच्या दुसर्‍या बाजूला जाऊन झोपली. तिच्या हुंदक्यांचा आवाज ऐकून सलीलला कसेतरी वाटले.

"का रडते आहेस?" त्याने हळू आवाजात विचारले.

"का नको रडू? मी इथे कामावरून येऊन स्वयंपाक करायचा.. तो ही तुला आवडतो तसा. तू मात्र त्याला नावं ठेवणार. वर इथे येऊन मोबाईल खेळत बसणार. मी आवरते आहे तिथे.."

"अगं पण.. आईच करते ना सगळं.." सलीलने विचारले.

"त्या करायच्या. आपल्या लग्नानंतर त्यांनी ही आवराआवर माझ्या गळ्यात मारली आहे."

"हो का.."

"हो.. आणि एवढं सगळं करून तू मी केलेल्या भाजीला नावं ठेव." प्रिया डोळे पुसत म्हणाली.

"अगं पण मला वेगळं काही आवडत नाही.." सलीलने बाजू मांडली.

"आवडत मलाही नव्हतं. पण मी नाही ॲडजस्ट केलं. आणि मगाशी काय म्हणालास? भाजी कशी चिरली आहे? जसं काय लग्नाच्या आधी मी भाजीच चिरत होते."

"अगं मग शिकून घे ना आईकडून." सलील समजावणीच्या स्वरात म्हणाला.

"ठिक.. मी स्वयंपाक शिकते.. तू नंतरची आवराआवर शिक." तोंड फुगवत प्रिया म्हणाली आणि दुसरीकडे तोंड करून झोपायला गेली. आपल्या स्वयंपाकाची उडवलेली टर बघून तिने नंतर काही बनवायचा प्रयत्न केलाच नाही. अगदी वाटलंच तर ती आईकडे जाऊन करायची आणि खाऊन यायची. दिवस जात होते. एक दिवस अचानक शोभाताईंना त्यांच्या माहेरी जावे लागले.

"मामाचा अपघात झाला आहे. मला आठ दिवस तरी तिथे रहावं लागेल." शोभाताई रडवेल्या झाल्या होत्या.

"आई, तिथे जेवढी गरज आहे तितके दिवस रहा. इकडची काळजी करू नकोस." सलील म्हणाला.

"आम्ही दोघे नसताना घर सांभाळाल का?" मधुकररावांनी विचारले.

"बाबा, इकडची कसलीच चिंता करू नका."

"तुझ्या जेवणाचे काय मग?" शोभाताईंनी काळजीने विचारले.

"आई, प्रिया आहे ना.. आम्ही दोघे करू काहीतरी मॅनेज." सलीलचे हे वाक्य ऐकून प्रियाने आश्चर्याने त्याच्याकडे बघितले. सलील मात्र शोभाताई आणि मधुकररावांच्या प्रवासाच्या तयारीला लागला. त्या दोघांना बसस्थानकावर सोडून तो घरी आला. प्रियाने त्याला पाणी आणून दिले.

"मी जेवायला चकुल्या केल्या आहेत. चालणार आहेत का?"

"आता हे काय नवीन?"

"खाऊन बघ.. आवडल्या तर ठिक.. नाहीतर बाहेरून मागव काहीतरी." प्रिया तशीच आत निघून गेली. सकाळीच फोन आल्यामुळे कसातरी फक्त ब्रेडबटरचा नाश्ता केला होता. तिथे मामाकडे जाऊन आईबाबा छान जेवतील. हाल आता आपलेच होतील का? या विचारात असतानाच प्रिया आतून ताटं घेऊन आली. त्या वासाने सलीलची भूक अजूनच चाळवली. गरमागरम चकुल्या, त्यावर तुपाची धार, त्याच्या तोंडाला पाणी सुटले.

"ही तर वरणातली फळं.." तो म्हणाला.

"पदार्थ एक नावे अनेक.." खायला सुरुवात करत प्रिया म्हणाली. सलीलने सुद्धा जेवायला सुरूवात केली.

सलीलला आवडेल का प्रियाच्या हातचे जेवण आतातरी? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →