Login

माझी आई काय भाजी करते..

आईचा स्वयंपाक
माझी आई काय भाजी करते...


"माझ्या आईच्या हातचं अळूचं फतफतं खाऊन बघ कधीतरी.. हाताची बोटं चाटत बसशील." सलील आपल्या होणाऱ्या बायकोला प्रियाला सांगत होता.

"काय म्हणालास? फतफतं.. आता हे काय नवीन?" प्रियाने कपाळावर आठ्या घालत विचारले.

"तुला फतफतं नाही माहित?" उत्साहाने सलील तिला सांगायला गेला खरा.. पण फतफतं हे अळूचं असतं, त्यापलीकडे त्यालाच काही माहित नव्हतं, मग पुढे बोलणार तरी काय? "अगं, असं काय करतेस? ती अळूची पातळ भाजी असते ना.. त्यात मस्त दाणे टाकलेले असतात.." सलील आता त्याचे वर्णन सांगू लागला.

"अच्छा.. अळूची पातळ भाजी.. मग तसं म्हण ना.. फतफतं काय? हे काय नाव आहे?" प्रियाने हसत विचारले.

"आमच्याकडे याला फतफतंच म्हणतात. माझी आई काय करते म्हणून सांगू?" सलीलची गाडी तिथेच अडकली होती.

"हो का? मलाही येतं करता.. पण आता तू एवढं म्हणतो आहेस तर बघू, तुझी आई कशी करते ते.." प्रिया म्हणाली.

"तू शिकशील का आईकडून ते माझ्यासाठी?" सलीलने जेवढ्या प्रेमाने विचारता येईल तेवढ्या प्रेमाने विचारले. लग्नाच्या आधी इच्छा असूनही प्रिया त्याला नाही म्हणू शकली नाही.

"आता तू म्हणतोच आहेस तर शिकेन बरं.. अळूचं फतफतं.." प्रियाने होकार दिला.

लग्न लागले.. प्रिया नवीन घरात आली. दोघेही हनिमूनला जाऊन आले. आणि महिन्याभरात नवीन संसाराला सुरूवात झाली. प्रियाला संसारात मिळालेला पहिला धडा म्हणजे स्वयंपाक. लग्नाच्या आधी तशी ती सासरी जेवली होती. पण लग्नाच्या उत्साहात ते तेव्हा तिला समजलं नव्हतं. साधीच गोष्ट.. ती पण भाजीची. आता भाजी ही भाजी असली तरी ती बनवण्याच्या पद्धतीत फरक पडू शकतो. उदाहरणच द्यायचे झाले तर तिच्या माहेरी भेंडीची उभी, लाल तिखट, धणेजिरे पावडर टाकून भाजी केली जाई. पण सासरी.. भेंडी गोल चिरून त्यात कोकम, साखर टाकून. आता लग्न झालं आहे म्हटल्यावर काही दिवस तरी तिला ॲडजस्ट करणं भाग होतंच. त्यात सलीलला त्याच्या आईच्या हातच्या भाजीची एवढी सवय झाली होती की त्याला त्याच चवीची, त्याच पद्धतीची भाजी हवी असायची. या गोष्टीचा शोभाताईंना, म्हणजे तिच्या सासूबाईंना फार अभिमान वाटायचा. त्यामुळे बाकीच्या स्वयंपाकात प्रियाला पडायची परवानगी असली तरी भाजी मात्र त्याच करायच्या. आणि ते झालं की रात्री सलील न चुकता ऐकवायचा, 'भाजी करावी तर ती आईनेच..' शेवटी प्रियाने ठरवले की आपणही घरात भाजी करायचीच. पण त्यासाठी आधी शोभाताईंच्या परवानगीची गरज होती. कारण त्या फक्त म्हणायच्या मी शिकवते, पण शिकवायच्या मात्र नाहीत. शेवटी तिने त्याच्या कलाने घ्यायचे ठरवले.

"आई, मी करू का ही अळूची भाजी?" एक दिवस धीर करून प्रियाने विचारले.

"कर की.. आपल्याच घरी विचारायचे कशाला?" शोभाताई हसत म्हणाल्या.

"तसं नाही.. पण ते सलीलला तुमच्या हातची आवडते ना.. मला सांगाल का, कशी करता ते." प्रियाने विचारले.

"त्यात काय विशेष नाही.. भाजी चिरून डाळ दाणे घालून शिजव. त्यात चिंच गूळ टाक. आणि फोडणी दे.. अगं बाई.. त्याला डाळीचं पीठ लाव बरं का.." शोभाताई बोलून तिथून निघाल्या.. समोर अळूची पाने प्रियाला खिजवत होती. माहेरी कधीच अळू न चिरलेली ती, तो कसा चिरायचा याचा विचार करू लागली. शोभाताईंना विचारायचे तर त्या फोनवर बोलत होत्या. शेवटी तिने मोबाईलमध्ये बघून भाजी करायला सुरुवात केली. तिची भाजी करून झाल्यावर शोभाताईंनी फोन ठेवला.

"झाली का गं भाजी?" त्यांनी आत येऊन विचारले.

"हो.. झाली.. जरा चव बघता का?"

"नको.. जेवतानाच बघू.."


झाली असेल का प्रियाची भाजी चवदार? बघू पुढील भागात. तोपर्यंत हा भाग कसा वाटला ते नक्की सांगा.

सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →