Login

आई वडिलांची खुशहाली- 1

वहिनी आल्यापासून माहेरी आपल्या आई वडिलांचं भेदरून राहणं रुपालीच्या नजरेतून सुटलं नाही
नवीन वहिनी आल्यापासून माहेरी भेदरलेल्या आई वडिलांचा चेहरा रूपालीच्या नजरेतून सुटला नव्हता. एरवी हसतमुख आणि मोकळ्या मनाने वावरणारे आई वडील आता मन मारून एका जागी बसून असायचे, घरभर फिरून सतत काहीना काही काम करणारे तिचे बाबा आता एका जागी बसून असत. देवपूजा आणि बगीच्यात वावरणारी आई आता सोफ्यावर बसून फक्त बांगड्या मोजत असे.

रुपालीची नवीन वहिनी घरात आली होती. भावाच्या लग्नाला जेमतेम सहा महिने झाले होते. लग्न उरकलं आणि सत्यनारायण पूजा करून रुपाली सासरी परतली होती. सासर बरंच लांब असल्याने माहेरी फारसं येणं जाणं नसे. माहेरी लुडबुड नको म्हणून ती आधीसारखं जास्त फोनही करायची नाही. फार तर आठवड्यातून एकदा. असंच एकदा माहेरी फोन केला, आईने उचलला..

"हॅलो आई, कशी आहेस?"

"मी मजेत, तू बोल.."

"काय चाललंय नव्या वहिनीचं, स्वयंपाक करत असेल ना यावेळी?"

"हा..म्हणजे..."

तेवढ्यात पलीकडून आवाज आला,

"आई मला कमी तिखट लागतं, काल फारच तिखट झालेलं.."

रूपालीला समजलं, की स्वयंपाक आईच करतेय..

"काय गं आई? स्वयंपाक तूच करतेस वाटतं.."

"हो, अगं ती ऑफिसमधून दमून येते ना, मग मला तरी दुसरं काय काम असतं?"

"खरंय, वहिनी दमून येत असेल.. बरं आहे तू तिला मदत करतेस ते.."

"हो, आणि बाकीचं आवरतेच की ती.."

हे बोलणं चालू असताना वहिनीने आईकडून फोन घेतला आणि रुपालीशी बोलू लागली,

"काय म्हणताय ताई? स्वयंपाक कोण करतंय हेच विचारताय ना?"

"सहज फोन केलेला गं, ऑफिसमधून आल्यावर तुला स्वयंपाक करावा लागत नाही, चांगलं आहे की..नाहीतर आजकालच्या सासवा.."

"त्यात काय मग एवढं?? मीही तुमच्या भावाइतकंच कमावते की, मग कशाला काम करू मी??"

वहिनी इतकी फटकळ असेल हे रूपालीला माहीत नव्हतं. तिने गोड शब्दात तिला समजावून फोन ठेवला पण मनात मात्र काहूर माजलं.

नुसते दोन मिनिटं फोनवर बोलले तर वहिनीचा असा सूर होता, तिकडे कायमस्वरूपी आई वडिलांसोबत राहून ती काय गुण उधळत असेल? एक तर आई बाबांनी आपली सगळी जमापुंजी भावाच्या शिक्षणावर खर्च करत ते पूर्णपणे भावावर अवलंबून राहिले होते. याच गोष्टीचा फायदा वहिनी घेत होती आणि आई वडिलांना सतत उपकाराची जाणीव करून देत होती.

वहिनी घरातल्या एक कामाला हात लावत नसे, एकदा सासूने तिला कामाबद्दल विचारलं तेव्हा तिने आकांडतांडव केलेला तेव्हापासून मुलाचा संसार वाचावा म्हणून सासू झेपत नसताना कामं करत होती.

असेच दिवस जात होते, वहिनीला तिच्या माहेरहून तिच्या काकांनी गव्हाची पोतडी पाठवली होती....

त्यावरून काय घटना घडली?
वाचा पुढील भागात
क्रमशः

पुढील भाग खालील लिंकवर

https://irablogging.com/blog/aai-vadilanchi-khushhali-2-antim_49156

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →