लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल 2026
विषय- एक अनोळखी भेट
शीर्षक- आई डेटवर जातेय...
"आई कुठे चाललीस?" अनिकेतने मालतीला विचारले.
"मी बाहेर जातेय." मालती पाठीमागे वळून बघत बोलल्या.
"तेच कुठे?" अनिकेतने परत प्रश्न केला.
"मलाही माझं आयुष्य आहे. मी तुझ्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर द्यायला बांधील नाही. आजपर्यंत तू कुठे कुठे जातोस ते मला सांगायला तसदी घेतलीस का? नाही ना? मग मीही माझी मी जातेय." हातातली पर्स घट्ट पकडून घेत मालती बोलल्या.
आजपर्यंत कधीच त्यांनी आवाज वाढवला नव्हता. त्यामुळे पहिल्यांदाच आईचे हे रूप पाहून अनिकेत थक्क झाला.
"आई, मला तुझी काळजी वाटतेय म्हणून बोलतोय." अनिकेत वरमला.
"माहितीये किती काळजी आहे..." सुनबाईकडे कटाक्ष टाकून मालती पुटपुटल्या. अनिकेतने मात्र मान नकारार्थी हलवली.
"आई, खरं खरं सांग कुठे जातेय..." अनिकेतने नजर रोखून विचारले.
"मी माझ्या एका फेसबुक फ्रेंडला भेटायला जातेय. आमची डेट आहे आज, ऐकलं? झालं समाधान? आता मी जाते." मालती बोलल्या; पण ते ऐकून अनिकेतचे डोळेच विस्फारले.
"आई..." अनिकेत अविश्वासाने मालतीकडे पाहत थोडा चढ्या आवाजात बोलला.
"अहो, जरा शांत व्हा." समीक्षा अर्थात मालतीच्या सुनेने मध्यस्थी केली.
"आई, जा तुम्ही... इंजॉय करा आणि लवकर या, आम्ही वाट पाहतोय." समीक्षा मालतीला बोलली.
"ह्म्म." मालती हुंकार भरून निघून गेल्या. अनिकेत मात्र पाहत राहिला.
"अगं काय हे? तू असं कसं आईला जाऊ दिलं? तू ओळखते का आईच्या त्या फेसबुक फ्रेंडला? माहिती नाही का हे जग किती फसवं होत चाललंय ते... अशी कशी आई अनोळखी व्यक्तीची भेट घ्यायला जाऊ शकते?" आई जाताच अनिकेत समीक्षावर भडकला.
"हो, मला माहीत आहे जग फसवं आहे; पण आई लहान आहेत का? त्यांनाही दुनियादारीची समज आहे. शिवाय अनोळखी कुठे? आई बोलल्या ना की त्या त्यांच्या फेसबुक फ्रेंडला भेटायला जात आहेत! म्हणजे ती व्यक्ती आईची फ्रेंड आहे, अनोळखी नाही." समीक्षा शांतपणे बोलली.
"अगं पण..." अनिकेत मात्र वैतागला होता.
"काळजी नका करू ओ, आई फक्त डेटवर तर गेल्या आहेत." समीक्षा खांदे उडवत बेफिकीरपणे बोलली.
"आणि हे तू इतक्या सहज बोलतेय?" अनिकेतला समीक्षाचे नवलच वाटले. तो तिच्याकडे प्रश्नार्थक नजरेने पाहत होता.
"होय! आता जास्त काळजी करू नका आणि चला आवरा बरं. आपल्यालाही जरा बाहेर जायचंय. आपणही डेटवर जातोय." समीक्षा बोलली आणि क्षणात खोलीत निघूनही गेली.
"समीक्षा..." अनिकेतने मात्र वैतागून केसांत हात फिरवला.
.........
.........
इकडे मालती एका हॉटेलमध्ये बसून त्यांच्या 'फेसबुक फ्रेंडची' वाट बघत होत्या. पहिल्यांदाच न पाहिलेल्या पण मनाने निवडलेल्या त्या अनोळखी व्यक्तीशी भेटायला मालती फार आतूर होत्या. आनंद, उत्साह असला तरी अनामिक हुरहुरदेखील होतीच म्हणून शांतपणे त्या वाट बघत होत्या. तेवढ्यात समीक्षा आणि अनिकेत तिथे आले. त्यांना समोर बघून मालतीच्या कपाळावर आठ्या पसरल्या. त्यांनी एक रागीट कटाक्ष समीक्षावर टाकला आणि त्यांनी मान वळवली.
'हे दोघे माझा पाठलाग करत इथे आले... समीक्षाच अनिकेतला घेऊन आली असेल. जरा म्हणून एकांत मिळणार नाही का मला?' मालती मनातच खडे फोडत होत्या.
तेवढ्यात समीक्षा आणि अनिकेत मालतीच्या पुढे असलेल्या खुर्च्यांवर बसले.
"तुम्ही दोघे दुसरीकडे बसा. मी बोलले ना मी माझ्या फेसबुक फ्रेंडला भेटायला आले आहे. ती आणि तिचा नवरा येईलच इतक्यात त्यामुळे तुम्ही दुसरीकडे बसा. मला माझा एकांत हवा." मालती अनिकेत आणि समीक्षाला स्पष्ट शब्दात बोलल्या.
"आई, तुमची फेसबुक फ्रेंड प्रार्थना मीच आहे." समीक्षा गालात हसत बोलली. अनिकेतच्याही ओठांवर हसू होते.
"काय?" मालती अविश्वासाने उठून उभ्या राहिल्या.
"हो." समीक्षा उत्तरली.
"म्हणजे तू माझ्याशी खोटं बोललीस? तू मुद्दाम माझ्यावर पाळत ठेवलीस? माझ्याशी मैत्री करण्याचं सोंग घेतलंस? थोडक्यात तुला माझ्याच मुलाच्या नजरेत मला पाडायचं होतं का? म्हणून मला असं भेटायला बोलावलंस का? आणि अनिकेत तू... तूसुद्धा यात सामील होतास? तू हिची साथ दिलीस?" मालतीला भरून आले.
"आई, मलाही आजच आणि थोड्या वेळापूर्वीच कळलंय सगळं... पण निदान समीक्षाचा हेतू काय होता, हे सांगायला तिला संधी तरी देणार आहेस का तू?" अनिकेत आईला शांतपणे समजावत होता.
"काय हेतू असणार आहे..." मालती तिरकसपणे बोलल्या.
"तू शांतपणे ऐकून घेशील तर कळेल ना!" अनिकेत बोलला. मालती मात्र जळजळीत कटाक्षाने समीक्षाकडे बघत होत्या.
"आई, तुम्ही समजताय तसं काही नाही. तुम्ही शांत बसा मग मी सविस्तर सांगते." समीक्षा शांतपणे सासूबाईंचा हात हातात घेत बोलली.
"मला काहीच ऐकून घ्यायचं नाही." मालती समीक्षाचा हात झिडकारून बोलल्या.
"आई, प्लिज!" अनिकेतने विनंती केली. आता मालतीचा लेकापुढे नाईलाज झाला.
"ह्म्म." हुंकार भरत त्या अनिच्छेने बसल्या.
अनिकेत आणि समीक्षाही बसले. त्यानंतर समीक्षा बोलायला लागली.
"एक महिन्यापूर्वी आपलं छोट्याशा कारणावरून भांडण झालं. वाद क्षुल्लक होता; पण तरीही सगळं किचकट झालं होतं. एरवीही खटके उडायचे; पण त्या भांडणात अनिकेतने माझी बाजू घेतली आणि तुम्हालाच चार गोष्टी ऐकवल्या." समीक्षा बोलत होती, तसे मालतीलाही तो प्रसंग आठवला आणि त्यांचे मन गहिवरून आले; पण त्यांनी स्वतःला सावरले.
"ते सगळं झाल्यानंतर मला माझ्या आईचा फोन आला. आईने सांगितलं की तिचंही वहिनीसोबत जरा भांडण झालं आणि दादाने वहिनीची बाजू घेतली. त्यामुळे आई साधारण अर्धा तास तिचं दुःख सांगत राहिली मला... मीही ऐकून घेत होते. मला माझ्या आईसाठी खूप वाईट वाटलं. वहिनी तिला समजून घेत नाही याचा राग आला; पण आईशी बोलून झाल्यावर मी फोन ठेवला आणि एकाएकी मला तुमचा विचार आला." समीक्षा बोलली; पण ते ऐकून मालतीच्या भुवया उंचावल्या.
"म्हणजे?" मालती समीक्षाकडे संशयास्पद नजरेने बघत होत्या.
"माझ्या आईला मुलगी आहे म्हणून बाबा वारले असले तरी तिला माझा आधार आहे. त्यामुळे वहिनीशी खटके उडाले की ती तिचं मन माझ्याजवळ मोकळं करते; पण तुम्ही... तुम्हाला तसं मोकळं होण्यासाठी कोणाचा आधार नाही. माझ्या आणि अनिकेतव्यतिरिक्त एखादी हक्काची व्यक्ती तुमच्या आयुष्यात नाही. अनिकेत खूप लहान असताना बाबा वारले. अनिकेत आणि तुमचं बॉंडींग चांगलं असलं तरी कधीकधी मतमतांतरे झाली की तुमची घुसमट होते. अनिकेतला बहीण नाही म्हणून कितीतरी वर्षांपासून तुम्ही हा एकाकीपणा अनुभवत आहात याची मला जाणीव झाली." समीक्षा बोलली.
"देव पावला म्हणायचा..." मालती मात्र तिरकसपणे बोलल्या.
"ह्म्म तसंच काहीसं... त्या दिवशी तर मी माफी मागितली होती घडलेल्या प्रकाराला; पण तरीही तुमचा एकाकीपणा कसा दूर करता येईल हा प्रश्न होताच. मी कितीही झालं तरी तुमची सूनच... आई आणि मुलीमध्ये जे नातं असतं त्याची सर कशाला नाही. शिवाय नाही म्हटलं तरी आपण म्हणा किंवा समाजाने म्हणा एक भिंत निर्माण केलीये सासू आणि सुनेच्या नात्यात, तर ती भिंत मोडून तुम्ही माझ्याजवळ मन मोकळं कराल अशी काही चिन्हे मला दिसली नाही. तेवढ्यात मला आठवलं की त्याच दिवशी सकाळी तुम्ही फेसबुक जॉईन केलं सहज विरंगुळा म्हणून... मग मी ठरवलं की मी तुमची फेसबुक फ्रेंड होणार... त्या अनुषंगाने मी माझ्या माहेरच्या नावाने फेसबुक अकाऊंट उघडले आणि मी तुम्हाला फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली. तुम्हीही सहज रिक्वेस्ट ॲक्सेप्ट केली. पुढे आपला संवाद घडत गेला आणि आज एक महिन्यानंतर आपली म्हणजे मालू आणि प्रार्थनाची अशी अनोळखी भेट घडली." समीक्षाने उलगडा केला. मालती मात्र ते ऐकून आश्चर्यचकित झाल्या होत्या.
"आई, मला तुमच्या फिलिंग्सचा गैरफायदा घ्यायचा नाही किंवा तुमच्या एकाकीपणाची मस्करीही उडवायची नाही. मला फक्त आपल्यात आडपडदा ठेवावासा वाटला नाही. तुम्ही चॅट करताना सगळं इतकं हक्काने माझ्याशी शेअर करत आलात म्हणून या आगळ्यावेगळ्या आणि अनोळखी भेटीच्या निमित्ताने मलाही माझं हे मोठं सिक्रेट तुमच्याशी शेअर करायचं होतं; पण यामुळे तुम्ही हर्ट झाल्या असाल तर मला खरंच माफ करा. तुम्हाला दुखावण्याचा हेतू नव्हताच. फक्त तुमचं दुःख समजून घेण्याची तगमग होती बस इतकंच..." मालतीच्या हातावर हात ठेवून त्यांच्या डोळ्यात बघत समीक्षा भावूक होत बोलली.
"परमेश्वरा कोणतं पुण्य केलं मी म्हणून इतकी गुणी, मायाळू आणि प्रेमळ सून मिळाली मला! अगं समीक्षा रडतेस काय? मला आवडला तुझा हा प्रयत्न... खूप आधार वाटला मला तुझा! माझी सखी झाल्याबद्दल खूप खूप आभार तुझे..." मालती खुर्चीवरून उठून समीक्षाला मिठी मारत बोलल्या.
"आई आभार काय यात... मी जे केलं ते हक्काने आणि आनंदाने!" मिठी घट्ट करत समीक्षा बोलली.
"ह्म्म." मालती मिठी सैल करून हुंकार भरत हसल्या.
"बरं आई, आपण असेच कायम फेसबुक फ्रेंड राहूयात! म्हणजे आपलं घरी जे सासू-सुनेचं नातं आहे ना ते तसंच राहू दे... पण आपल्यात खटके उडाले किंवा माझं काही तुम्हाला पटलं नाही तर तुमची 'एस ओ एस' कायम मीच असेल. तुम्ही तुमच्या प्रार्थना नावाच्या या 'फेसबुक फ्रेंड'ला तुमच्याबद्दल सगळं सांगायचं, त्यात काही कॉम्प्रोमाईज केलं जाणार नाही. शिवाय मलाही माझ्या सासूबाई आणि नवऱ्याची तक्रार करायला मला माझी 'मालू' नावाची फेसबुक फ्रेंड हवी बरं!" समीक्षा खट्याळ हसून डोळे मिचकावत बोलली.
"लबाड! चालेल मला..." तिचे गाल खेचत मालती बोलल्या.
"अहंम! मीही आहे इथे... स्वतः खुदूखुदू हसताय आणि मला वाळीत टाकलंय..." अनिकेत घसा खाकरत गाल फुगवून बोलला.
"तू राहूच दे! प्रार्थना, तुला सांगितलेलं ना माझ्या सूनेपेक्षा माझा लेकच परका आहे मला... सारखा चिडचिड करतो..." समीक्षाचा हात हातात घेत मुद्दाम मालती बोलल्या.
"मालू, मीही सांगितलेलं ना तुला... माझ्या सासूपेक्षा माझे अहोच हेकेखोर आहे हो... सारखी किरकिर सुरू असते त्यांची..." समीक्षाही मुद्दाम अनिकेतला चिडवत बोलली.
"आई... समीक्षा..." अनिकेतचे डोळे बारीक झाले आणि तो त्या दोघींकडे गाल फुगवून बघू लागला.
मालती आणि समीक्षा मात्र खळखळून हसल्या. त्यांना हसताना बघून अनिकेतही हसला. त्यानंतर त्या तिघांनीही हॉटेलमध्येच जेवण केले. थोडा वेळ बागेत फिरले, थोडी खरेदी केली आणि शेवटी ते तिघेही एकत्र घरी गेले.
अशाप्रकारे फेसबुक फ्रेंडला भेटायला आलेल्या मालतीची अनपेक्षितपणे आज त्यांच्याच सुनेशी आणि मुलाशी एक अनोळखी भेट झाली. शिवाय त्या एका अनोळखी भेटीत मालतीला ही खात्रीदेखील पटली की त्यांचे प्रेम, त्यांचे प्रयत्न एकतर्फी नाहीत. त्यांच्या मुलाचे आणि सुनेचेही त्यांच्यावर तितकेच प्रेम आहे. ते दोघे कृतघ्न नाहीत तर कृतज्ञ आहेत व त्यांना मालतीची मनापासून काळजी आहे.
समाप्त.
© सेजल पुंजे.
२७/०४/२०२६.
२७/०४/२०२६.
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
