आई चा राजीनामा (भाग १)
घर म्हटल की कामं किती असते हे आपल्याला माहीतच आहे ..आणि या कामात आपल्या आई ची भूमिका सर्वात मोठी असते.. तिचं जग विसरून ती आपल्या कुटुंबासाठी झटत असते आणि एवढ करूनही जेव्हा तिला गृहीत धरले जाते तेव्हा काय होईल.....
नेहमीप्रमाणे सकाळी ७ वाजता घरामध्ये युद्धाची परिस्थिती होती... किचनमध्ये मिक्सरचा आवाज, कुकरच्या शिट्ट्या आणि बाहेर तिघांचा ओरडण्याचा आवाज चालू होता.
"अलका, माझा निळा शर्ट कुठेय? इस्त्री नीट नाहीये त्याची!" सतीश हॉलमधून ओरडले.सतीश म्हणजे अलका चा नवरा आणि अलका म्हणजे आपले मुख्य पात्र...
"आईsss, माझा प्रोटीन शेक बनवलास का? जिमची वेळ झालीये!" चिन्मयने खोलीतून फर्मान सोडलं.
"मम्मी, प्लीज मला नाश्त्यात उपमा नकोय डाएट करत आहे मी....सँडविच बनव ना!" अनन्या आरशासमोर उभी राहून तयार होत म्हणाली.
अलकाचे हात मशीनसारखे चालत होते. एका हाताने चहा गाळत, दुसऱ्या हाताने चिन्मयचा डबा भरत तिने सतीश यांच्या शर्टची घडी नीट केली. ९ वाजता तिघेही आपापल्या जगात निघून गेले. जाताना कोणी 'थँक्यू' सुद्धा म्हटलं नाही.
दुपारी अलकाने जेवायला ताट वाढलं. भाजीमध्ये मीठ थोडं कमी होतं. तिने स्वतःशीच विचार केला, 'सकाळी एवढी घाई होती, राहिलं असेल गडबडीत..पण तिची हिंमत नाही झाली उठून मीठ घ्यावे अशी कारण ती खूप थकली होती...
संध्याकाळी सगळे एकत्र आले. सतीश जेवताना चिडले, "अलका, काय भाजी केलीये ही? अळणी एकदम! बँकेत एवढं टेन्शन असतं, घरी आल्यावर सुखाचं जेवणही मिळत नाही... हे ऐकून अलका एकदम शांत झाली...
चिन्मय मोबाईल स्क्रोल करत म्हणाला, "आई, खरंच यार! आज डब्यात चपाती पण खूप वेगळी झाली होती. कलीग्स समोर इम्प्रेशन डाऊन होतं माझं."
अनन्याने तोंड वाकडं केलं, "मम्मी, तुला नवीन रेसिपीज ट्राय करायला काय होतं? रोज तेच तेच खाऊन कंटाळा आलाय....बाकीच्या मैत्रिणीच्या आई मस्त नवीन पदार्थ बनवतात...
अलकाने शांतपणे तिघांकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात पाणी होत पण कुणीही तिच्याकडे लक्ष दिले नाही...तिच्या मनात विचार सुरू झाले... यांना माझ्या कामांची किंमत कधीच का बर नसते...हे सगळ ऐकून मन बैचेन होऊन जातं...अस वाटत की आपण एवढे शुल्लक आहोत का??की हे आपल्याला गृहीत धरायला लागले...काहीतरी विचार करून ती उठली, तिने स्वतःचं अर्धवट जेवलेलं ताट बेसिनमध्ये ठेवलं आणि हॉलमध्ये आली.
तिने हॉलमधला टीव्ही बंद केला....तिघेही चिडून तिच्याकडे बघू लागले. अलकाने हातात एक छान डायरी घेतली होती.
"ऐका," अलकाचा आवाज एकदम शांत पण करारी होता. "आज तारीख १२ मे. उद्या १३ मेपासून ते २८ मे पर्यंत... म्हणजेच पुढचे १५ दिवस, मी 'घरकाम आणि आई' या पदावरून अधिकृतपणे राजीनामा देत आहे!"
"व्हॉट??" तिघेही एकाच वेळी ओरडले.
"काय वेडेपणा आहे अलका? डोकं ठिकाणावर आहे का?" सतीश म्हणाले.
"अगदी ठिकाणावर आहे," अलकाने डायरी उघडली.
"या १५ दिवसांत मी स्वयंपाक करणार नाही, कपडे धुणार नाही, कोणाला पाण्याचा ग्लासही देणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं... माझी खोली वेगळी असेल. मला कोणी 'आई' किंवा 'मम्मी' म्हणून हाक मारायची नाही. हा घराचा नियम आहे.... जर कोणी नियम तोडला, तर त्याला पाच हजार रुपये फाईन बसेल."
"मम्मी, मग आमचं काय? आमचं जेवण, कपडे?" अनन्याने विचारलं.
"चिन्मयला कॉर्पोरेटमध्ये 'प्रॉब्लेम सॉल्व्हिंग' शिकवतात ना? मग घरातला प्रॉब्लेम सॉल्व्ह करा......
सतीश, तुम्ही मॅनेजर आहात, घर मॅनेज करा......
आणि अनन्या, तू रील बनवून इन्स्टावर मॅनेज करतेस, तसं स्वतःला मॅनेज कर. ऑल द बेस्ट!"
अलका आपल्या खोलीत गेली आणि तिने दरवाजा आतून बंद केला. तिघांना वाटलं की हा फक्त एका दिवसाचा राग आहे, उद्या सकाळी सगळं ठीक होईल. पण खेळ तर पुढे होता!
