Login

आई एक नाव

आई एक नाव
आई

आई!!! माहेरच्या दारात आल्या आल्या नेहमीप्रमाणे प्राचीने आवाज दिला. त्या आवाजाने प्राचीचा भाऊ प्रसन्न व वहिनी प्रांजल धावतच आले.

" अरे ताई तू ?

अशी अचानक?

अरे आईची खूप आठवण आली रे.

"ये ताई बस"

"प्रांजल, ताई साठी पाणी घेऊन ये."

"बरं आणते. बसा वन्स."म्हणत प्रांजलने पाणी आणले.

तू ही बस प्रांजल.
प्राची म्हणाली.

"अरे प्रसन्न, माझं मन मानायलाच तयार नाही रे. आपली आई आता या जगात नाही म्हणून." बोलता बोलता प्राचीच्या डोळ्यात अश्रूंनी गर्दी केली. ते पाहून प्रसन्नही भावुक झाला.

तेवढ्यात प्राची, प्रसन्नचे बाबा मिलिंदराव घरी आले.

"अरे प्राची कधी आलीस?"
मिलिंदराव म्हणाले.

आताच आले बाबा.

आई शिवाय घर कसं अगदी सुनंसुनं वाटतं नां? मिलिंदराव म्हणाले.

हो बाबा.

प्रांजलने आपल्या सासऱ्यांसाठीही पाणी आणले. आणि ती प्राची जवळ येऊन बसली.

अगं प्राची, मिलिंदराव सांगू लागले. आपलं जुनं कौलारू घर. समोर अगदी मोठ्या माणसाच्या मनासारखं सर्व सामावून घेणारं अंगण. अंगणात वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडं, फळझाडं. कारण तुझ्या आईला झाडांची खूप आवड. तिथेच झाडाखाली तीन-चार खाटा. त्यावर सतत सतरंज्या टाकलेल्या. माझ्या भाऊ बहिणींचा सतत आपल्या घरी राबता. माझे म्हातारे आई वडील. पण तुझ्या आईनं कधी हूं की चूं केलं नाही. सतत आनंदी चेहरा. कधीच तिच्या चेहऱ्यावर नाराजी दिसलीच नाही.

मी तिला नेहमी म्हणायचो,

"चल कुठेतरी जाऊन येऊ चार दिवसासाठी.

पण गावातील घर, शेती, मोकळा परिसर, शुद्ध हवा हे सर्व सोडायला ती तयारच होत नव्हती. आता अलिकडे तर तिला सारखा गुडघेदुखीचा त्रास सुरू झाला होता. म्हणून मी तिला म्हटलं की. अगं मृदुला आता आपण एक छानसं नवीन घर घेऊया. जिथे आपण आपल्या वयानुसार प्रत्येक सोय करून घेऊ. तुलाच नाही तर मलाही वयानुसार शारीरिक त्रास सुरू झालेत आणि याविषयी मी एक प्लॅन सुद्धा तयार केला. घर सुद्धा बघून आलो. त्यामध्ये आर्किटेक्चरला सर्व गोष्टी सुद्धा समजावून सांगितल्या की. आम्हाला फर्निचरची साफसफाई ठेवणं कठीण जाईल म्हणून फर्निचर आटोपशीर ठेवायचं. खोलीतील लाईट फॅन यांचा कंट्रोल अगदी बैठकी जवळच ठेवायचा. जेणेकरून उठबस कमी होईल. घराला कुठलीही पायरी किंवा उंबरठा ठेवायचा नाही. कारण या वयात ठेचकाळून पडण्याची भीती जास्त असते. टॉयलेटमध्ये बसताना उठताना त्यांना त्रास होऊ नये म्हणून जवळच हँडल बसवून घ्यायचं. असं मी तिच्याजवळ वारंवार बोलायचो. किंवा तुला प्रसन्न जवळ जाऊन राहायचे असेल तर आपण तिथेही जाऊन राहू शकतो. पण ती मला म्हणायची "अहो, मला कोणालाच त्रास द्यायचा नाही आणि आपण कोणावरही भारही बनायचं नाही. देवानं तिचं ऐकलं आणि ती आपल्या सर्वांना सोडून निघून गेली.

खूप खाली खाली वाटतं गं घर.आज ती असायला हवी होती. माझे आईवडील देवाघरी गेले. बहीण भावंडं आपापल्या कामी.आतापर्यंत मिलिंद रावांनी मोठ्या संयमाने डोळ्यांच्या पापणीत दडवलेले अश्रू पापण्यांचा बांध फोडून घळाघळा वाहू लागले.

"बाबा रडू नका हो"
मी आहे नां. आता त्या क्षणी तुम्ही चला माझ्यासोबत आणि आता तिथेच रहा. प्रसन्न आपल्या बाबाला धीर देत म्हणाला.

नाही प्रसन्न. आता या घरात मृदुलाच्या आठवणी आहेत. त्या आठवणीं सोबतच मी आता माझे उरलेले आयुष्य काढणार आहे. तुम्ही माझी काळजी करू नका. प्राची, प्रसन्न आणि प्रांजलने मिलिंदरावांना खूप समजावले. परंतु मिलिंदराव आपल्या निर्णयावर ठाम होते.

खरंच कविवर्य फ. मु. शिंदे यांनी म्हटल्याप्रमाणे
आई एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं.
सर्वात असते तेव्हा जाणवत नाही
आता नसली कुठचं, तरी नाही म्हणवत नाही.

सौ. रेखा देशमुख
0