आईपण - भाग -1
रात्रीचे बारा वाजले होते, पण स्मिताच्या डोळ्यानां मात्र झोप नव्हती, डाव्या गालावर उमटलेल्या बोटांच्या खुणा अजूनही जळजळतं होत्या, डोळ्यातून वाहणारे अश्रू ती पदराने पुसत होती, तिच्या मांडीवर अवघ्या दहा महिन्याची तिची मुलगी सानिका शांत झोपली होती, तिच्या चेहऱ्याकडे बघून ती रोज स्वतः ला सावरत होती.
आज अमितने पुन्हा एकदा तिच्या आत्मसन्मानाचे तुकडे केले होते, तू माझ्या पैश्यांवर जगतेस आणि मलाच बोलतेस, तुझी लायकी तरी आहे कां, हे अमितचे शब्द तिच्या मनावर आघात करत होते क्षणभर तिच्या मनात आलं, सगळं संपवून निघून जावं, किंवा जीव द्यावा, पण तेवढ्यात तिच्या मुलीने झोपेतचं तिचं बोट घट्ट पकडलं..... त्या एका स्पर्शाने तिच्या मनातला निर्णय बदलला, ती मनात म्हणाली, नाही मला जगायचं आहे, माझ्यासाठी नाही, तर् माझ्या मुलीसाठी.
स्मिता एका सर्वसामान्य कुटूंबातील मुलगी होती, घरची परिस्थिती बेताची होती, पण आई, वडिलांनीं तिला कधीच कोणत्याही गोष्टीची कमतरता भासू दिली नाही, ती अभ्यासात खूप हुशार होती, शिक्षिका होण्याचं तिचं स्वप्न होतं, पण अमितचं स्थळ आल्यावर वडिलांनीं तिचं लग्न लावून दिलं.
लग्न झाल्यावर सुरवातीला सगळं खूप छान होतं, अमित तिच्यावर जीवापाड प्रेम करायचा, सासूबाई पण प्रेमळ होत्या, पण हळूहळू सगळं बदलायला लागलं.
लग्नानंतर दोन वर्षांनी अमित मित्रांच्या संगतीने दारू पियायला लागला, त्यामुळे त्याचं घरात चिडचिड करणं चालू झालं, छोटया छोट्या कारणावरून तो स्मिताचा अपमान करू लागला होता.
तूझ्या माहेरच्यांनी लग्नात काही दिलं नाही,
तू नोकरी करत नाहीसं म्हणजे तू माझ्यावर ओझं आहेस,
तुला संसाराशिवाय दुसरं काहीच जमत नाही.
अश्या असंख्य शब्दांचे घाव ती रोज सहन करत होती.
तिला अनेकदा वाटायचं, माहेरी निघून जावं, पण आई, वडिलांची परिस्थिती तिच्या समोर यायची, आपल्या दुःखाचं ओझं त्यांच्यावर कां टाकायचं, हा विचार करून ती स्वतःला पुन्हा सावरायची, मग तिच्या आयुष्यात सानिका आली, सानिकाच्या येण्याने तिचं जगचं बदललं, तिच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून स्मिता स्वतःचं दुःख विसरून जायची.
हळूहळू सानिका मोठी होतं होती, ती पाच वर्षांची झाली होती, अमित कधीतरी बरा असे पण पुन्हा मध्येचं दारू पिऊन सानिकासमोरं स्मितावर हात उचलत असे, बिचारी सानिका रडत राहतं असे,
एकदा सानिकाने अमित निघून गेल्यावर स्मिताला मिठी मारून म्हंटल, आई , बाबा कां असे वागतात गं.
स्मिता तिला थोपटत म्हणाली, आपण ही परिस्थिती नक्कीच कधीतरी बदलू हा बाळा, तू रडू नकोसं बरं.
( पुढच्या भागात आपण बघणार आहोत - स्मिताच्या सहनशक्तीचा अंत झाल्यामुळे ती कोणता निर्णय घेते ती...)
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
