ओझं मंगळसूत्राचं(भाग १)

झालं मंगळसूत्राच ओझं...
ओझं मंगळसूत्राचं(भाग १)

लग्नाला जेमतेम सहा महिने झाले होते. मंगला अजूनही नवीन संसाराशी जुळवून घेत होती. विनोद तसा बोलण्या चालण्यात बरा वाटायचा, पण महिन्यातून एखाद्या रात्री तो उशिरा घरी यायचा, तोंडाला पानाचा वास मारून दारूचा वास लपवायचा प्रयत्न करायचा. मंगलाला जाणवायचं, पण ती गप्प बसायची "नवीन आहे संसार, उगीच वाद कशाला," असं स्वतःला समजावायची...

हळूहळू हे लपून छपून दारू पिणे कमी होत गेल... एक दिवस विनोद स्पष्ट झोकांड्या खात घरी आला. मंगलाने घाबरून विचारलं, "हे काय, तुम्ही प्यायलात?" त्यावर तो हसून म्हणाला, "अगं थोडंच, मित्रांबरोबर होतो. एवढं मनावर घेऊ नकोस." मंगलाला वाटलं, कदाचित हे तात्पुरतं असेल. पण पुढच्या महिन्यात हे दोनदा-तीनदा झालं, आणि प्रत्येक वेळी तो लपवण्याचा प्रयत्न करायचा ..कधी बूट बाहेरच काढून हळू पावलांनी आत यायचा, कधी सरळ बाल्कनीत जाऊन झोपून जायचा....

लग्नाला वर्ष पूर्ण होत आलं, तेव्हा मंगलाला दिवस गेले. त्या काळात विनोदने काही महिने खरंच कमी प्यायलं, आणि मंगलाला वाटलं, आता संसार स्थिरावेल. पण मुलगी झाल्यानंतर काही महिन्यांतच त्याचं पिणं परत सुरू झालं आणि आता ते लपवण्याची तोसुद्धा त्याने सोडून दिली. रात्री उशिरा दार वाजवायचा, मोठ्याने बडबडायचा, कधी हसायचा तर कधी विनाकारण चिडायचा. मंगला मुलीला कुशीत घेऊन भीतीने जागी राहायची....

एक रात्री तो असाच तर्र होऊन आला आणि मुलीच्या रडण्याने चिडून त्याने भिंतीवर मुठीने ठोसा मारला. मंगला थरथरत उभी राहिली. तिला त्या क्षणी जाणवलं की हा आता "क्वचित घडणारा प्रसंग" राहिला नव्हता, हे रोजचं वास्तव बनत चाललं होतं. लग्नाला दीड वर्ष होत आलं होतं, आणि जो माणूस लग्नाआधी "फक्त थोडंफार पितो" म्हणून सांगितला गेला होता, तो आता उघडपणे रोज पिऊन घरात दहशत निर्माण करत होता. मंगलाच्या मनात पहिल्यांदा एक भीतीयुक्त प्रश्न उभा राहिला "हे इथेच थांबेल, की अजून वाढेल?"


आता विनोदचं पिणं लपून राहिलं नव्हतं. गल्लीतल्या लोकांसमोरही तो झोकांड्या खात यायचा, कधी रस्त्यातच मोठ्याने बडबडत बसायचा. घरात आला की तमाशा ठरलेला असायचा.. भांडी फेकणं, शिवीगाळ करणं, कधी मंगलावर हात उचलणं. एक रात्री त्याने जेवणाचं ताट भिंतीवर भिरकावलं, आवाजाने सासू-सासरे बाहेर आले. मंगला थरथरत म्हणाली, "बाबा, रोज हेच होतंय आता." सासूबाई तिच्याकडे वळून करवादल्या, "तू काय बोलली असशील त्याला आधी तेच सांग! आमचा मुलगा असा नाहीये." सासरे म्हणाले, "जेवण वेळेवर दिलं नसेल, म्हणून चिडचिड झाली असेल. पुरुष आहे तो, समजून घे."
सासू म्हणाली," तुला मुलगी झाली म्हणून तो जास्त प्यायला लागला आहे...तुला मुलगा जन्माला घालता नाही आला का?"

दुसऱ्या दिवशी शेजारच्या काकूंनी रात्रीच्या आवाजाबद्दल विचारलं, तर सासूबाई पुढे सरसावून बोलल्या, "काही नाही हो, सुनेचा स्वभाव जरा तापट आहे. विनोद तसा शांतच आहे." मार खाणारीला "तापट" आणि मारणाऱ्याला "शांत" ठरवलं जात होतं....

याच सुमारास मंगलाने माहेरी फोन करून सगळं सांगितलं. सुरुवातीला तिच्या आई-वडिलांनीही तिलाच समजावलं "अगं, घरोघरी असंच असतं. पुरुष माणूस थोडीफार दारू पितोच, तू जरा जुळवून घे, टोकाचं पाऊल उचलण्याइतकं काही नाहीये अजून." मंगलाला वाटलं, इथेही तिलाच सहन करायला सांगितलं जातंय.... तिच्या घरचांनी तिच्या भावाला काही सांगू नको त्याला टेन्शन देऊ नको त्याला दुसऱ्या शहरात राहून काम करावे लागते असे सांगितले त्यामुळे तिने भावाला सुद्धा कॉल केला नाही..

काही आठवड्यांनी विनोदने पैशांसाठी मंगलाचे दागिने चोरून विकले. सासूबाईंना कळल्यावर त्या मंगलाकडेच वळल्या "दागिने तुझ्या कपाटात होते, तूच नीट सांभाळले नाहीस. सुनेचं काम असतं घर सांभाळणं, नवऱ्याला वळणावर आणणं." मंगलाने विचारलं, "पण चोरी तर त्यांनी केली?" यावर सासूबाई तुसडेपणाने बोलल्या, "बोलू नकोस जास्त. तुला इथे घर सांभाळायला आणलंय, तोंड चालवायला नाही." त्या क्षणी मंगलाला पूर्ण उमगलं ... या घरात तिची किंमत फक्त काम करणारी बाई इतकीच होती....

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →