जश्यास तसे(भाग १)
आपली नायिका रश्मी सकाळी सहा वाजता उठायची... आधी स्वयंपाकघरात जाऊन चहा-नाश्ता बनवायचा, डबे भरायचे, सासू-सासऱ्यांचा नाश्ता तयार करायचा, आणि मग स्वतः आवरून ऑफिसला धावायचं. संध्याकाळी परत आल्यावरही तिच्यासाठी विश्रांती नव्हतीच. भाजी चिरणं, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, कपडे धुणं सगळं तिच्याच वाट्याला यायचं.
आपली नायिका रश्मी सकाळी सहा वाजता उठायची... आधी स्वयंपाकघरात जाऊन चहा-नाश्ता बनवायचा, डबे भरायचे, सासू-सासऱ्यांचा नाश्ता तयार करायचा, आणि मग स्वतः आवरून ऑफिसला धावायचं. संध्याकाळी परत आल्यावरही तिच्यासाठी विश्रांती नव्हतीच. भाजी चिरणं, स्वयंपाक करणं, भांडी घासणं, कपडे धुणं सगळं तिच्याच वाट्याला यायचं.
सासूबाई मात्र नेहमी टोमणे मारायला विसरायच्या नाहीत. "आमच्या शेजारच्या सुनबाईंकडे बघा, नोकरीही करते आणि घरही तितक्याच व्यवस्थित सांभाळते. आमच्या नशिबातच अशी सून आली की जिला दोन्ही जमत नाही," असं त्या हमखास बोलायच्या. रश्मी काहीच बोलायची नाही, फक्त मान खाली घालून काम करत राहायची.
सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे नवरा विशाल सुद्धा आईच्याच बाजूने बोलायचा. "अगं जरा नीट कर सगळं, आईला काय वाटेल," असं म्हणून तो नेहमी रश्मीलाच समजावायचा. तिच्या थकव्याची, तिच्या मेहनतीची कुणालाच कदर नव्हती. ती रोज रात्री बारा वाजता जेवायची, कारण तोपर्यंत सगळ्यांची कामं संपवून तिचा नंबर यायचा.
एक दिवस मात्र सगळं बदललं.....सतत होणाऱ्या दगदगीमुळे आणि तणावामुळे रश्मी अचानक आजारी पडली. तिला जोरदार ताप आला, अंगात त्राण उरलं नाही, आणि शेवटी तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागलं. काही दिवस ती बेडवर होती, सलाईन लागलेली, अशक्त झालेली.
विशालला हॉस्पिटलचा खर्च करावा लागला... काही पैसे रश्मी ने सुद्धा दिले होते पण पैसे खर्च झाल्याचं दुःख नवऱ्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होतं, पण बायकोच्या तब्येतीची काळजी मात्र तितकीशी जाणवत नव्हती. घरी आल्यावर तर परिस्थिती आणखी वाईट झाली. सासूबाई पुन्हा तेच बोलणं सुरू केलं "इतके पैसे गेले, आणि वर काम पण होत नाही तुझ्याने धड. माझ्याने आता तुझं होणार नाही....., तू काही दिवस माहेरी जाऊन ये."
हे शब्द ऐकून रश्मीच्या मनात काहीतरी तुटलं. इतकी वर्षं ती राबत होती, कधी तक्रार केली नाही, कधी उलट उत्तर दिलं नाही. आणि आजारी असतानाही तिला हेच ऐकावं लागलं की तिची इथे सोय होणार नाही, की ती ओझं आहे. नवराही गप्प उभा होता, आईच्या शब्दांना विरोध करायचं धाडस त्याच्यात नव्हतं.
डोळ्यात पाणी आणून, पण चेहऱ्यावर एक वेगळाच ठामपणा घेऊन रश्मीने बॅग भरली आणि माहेरी जायला निघाली. जाताना तिने मागे वळून एकदाही पाहिलं नाही. तिच्या मनात एक नवीन विचार जन्म घेत होता... आता पुरे झालं,आता स्वतःसाठी जगायचं.
माहेरी पोहोचल्यावर आई-वडिलांनी तिला मायेने जवळ घेतलं. तिथे तिला विश्रांती मिळाली, प्रेम मिळालं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःचा विचार करायला वेळ मिळाला. या काही दिवसांत रश्मी मनातून पूर्णपणे बदलून गेली. आता तिने ठरवलं होतं परत गेल्यावर गोष्टी वेगळ्या असतील.
