मौनाचा फुटला बांध
सुनंदाच्या घरी आज पाहुणे येणार होते.......किचनमध्ये सुनंदा घाईघाईने पोहे करत आहे. सासूबाई सोफ्यावर बसून टीव्ही बघत आहेत आणि रुपाली तिच्या जवळ बसून मोबाईलमध्ये मग्न आहे....रुपाली म्हणजे आपल्या नायिकेची म्हणजे सुनंदा ची नणंद....लग्न होऊन गेले पण जेव्हा वेळ मिळेल तेव्हा माहेरी असते...जवळच असते राहायला...
सासूबाई: "अगं सुनंदा, पोह्यांत शेंगदाणे जरा जास्तच दिसतायत.... एवढे शेंगदाणे खाल्ले की पित्त होतं, हे तुला अजून कळलं नाही का?"
सुनंदा: "आई, तुम्हीच तर मागच्या वेळी म्हणाला होतात की पोह्यांत शेंगदाणे कुरकुरीत हवेत, आणि जास्त टाकत जा म्हणून ... म्हणूनच जास्त घातलेत."
रुपाली: (हसत, सासूला डोळा मारत) "आईला आता विसरायची सवय झालीये, तिला हे पण नाही आठवत की तिनेच हे सांगितलं होतं! अगं वहिनी, पोहे थोडे मोकळे असायला हवेत, हे बघ कसे चिकट झालेत.... आम्ही अगदी कापसासारखे मोकळे पोहे करतो."
सुनंदा: (मनात: काय काय सांगावं आता?) "हो रुपाली, प्रयत्न करतेय. आज जरा गॅसचा फ्लेम कमी-जास्त होत होता."
सासूबाई: "गॅसचं कारण कशाला? स्वयंपाक येणं ही एक कला आहे. रुपाली, जरा बघ तर ग ती चहाची पातेली धुतलीये का चांगली? गेल्या वेळी कपाच्या कडांना काळा थर होता ते पण बघ जरा....तुझ्या आत्या कडील पाहुणे येणार आहे बाई...उगाच बोलणं मला खावे लागेल."
रुपाली: (किचनमध्ये जाऊन) "आई, कप तर साध्या पाण्याने धुतलेत वाटतं. वहिनी, तुला अजूनही साध्या आणि गरम पाण्यातील फरक कळत नाही का? पाहुणे येणार आहेत, जरा नीट लक्ष दे."
(सुनंदाची तारांबळ उडाली आहे. एका हाताने चहा ठेवलाय, दुसऱ्या हाताने पोहे ढवळतेय, त्यातच दाराची बेल वाजते.)
(सुनंदाची तारांबळ उडाली आहे. एका हाताने चहा ठेवलाय, दुसऱ्या हाताने पोहे ढवळतेय, त्यातच दाराची बेल वाजते.)
सासूबाई: "सुनंदा जा ना उघडायला! आता आरशात तोंड बघत बसू नकोस....आधीच केस विस्कटलेले आहेत तुझे, थोडी नीटनेटकी तरी तयार झाली असती आज."
रुपाली: "आणि वहिनी, साडीचा पदर नीट घे. पाहुण्यांसमोर साधी तरी नीटनेटकी दिसणं ही सुद्धा मोठी गोष्ट आहे."
(सुनंदा पळत पळत दाराकडे जाते, वाटेत साडी अडकते...आणि तिकडे किचन मध्ये चहा उतू जातो. किचनमधून वास येतो... पण या दोघी काही जाऊन गॅस बंद करत नाही....)
सुनंदा: (ओरडत) "आई, चहा उतू गेला!"
सासूबाई: "अगं देवा! सावरून घेता येत नाही का तुला? रुपाली, तू जरा मदत कर ना गं तिला, नाहीतर आज पाहुण्यांसमोर आमची नाचक्की व्हायची."
रुपाली: "आई, मी कशी येणार? माझे कपडे खराब होतील ना! वहिनी, तू हे सगळं मॅनेज करायला शिकलं पाहिजे. आम्ही तुझ्या वयाचे असताना १० पाहुण्यांचा स्वयंपाक एका तासात करायचो."
(सुनंदाने कसेबसे पाहुण्यांना आत घेतले, पाणी दिले आणि किचनमध्ये परतली. चहाचा गॅस बंद केला, पण ओट्यावर सांडलेला चहा आणि जळलेले पोहे पाहून तिचा संयम सुटला. त्याच वेळी सासू आणि रुपाली किचनमध्ये आल्या.)
सासूबाई: (किचनमध्ये डोकावत) "सुनंदा, चहाचा रंग बघ किती फिका आहे! आणि हे पोहे? हे खाण्यालायक आहेत का? पाहुण्यांना काय तोंड दाखवायचं आता?"
रुपाली: "आई, हे बघ, साखरेचा डबाही उघडाच ठेवलाय. वहिनी, तुला कामाची शिस्त कधी लागणार? हे असं वागून घर कसं सांभाळणार?"
(सुनंदाने शांतपणे चहाची गाळणी खाली ठेवली. तिचे हात थरथरत होते, पण डोळ्यांत एक प्रकारची ठिणगी पेटली होती आता.... तिने श्वास घेतला आणि सासूच्या डोळ्यांत थेट बघून बोलण्यास सुरुवात केली.)
सुनंदा: (शांत पण स्पष्ट आवाजात) "आई, आता पुरे झालं.... मदत तर सोडाच...सकाळपासून तुम्ही आणि रुपाली ताई दोघीजणी मिळून फक्त चुका काढताय... तुम्हाला जर माझ्या कामावर इतकाच आक्षेप आहे, तर स्वयंपाक तुम्हीच का केला नाही? रुपालीचे पोहे 'कापसासारखे' मऊ होत असतील, तर मग तुम्ही मला हे सांगण्याऐवजी तिलाच स्वयंपाकाची जबाबदारी का दिली नाही?"
सासूबाई: (आवाक होऊन) "अगं, तू काय बोलतेयस? बाहेर पाहुणे आहेत...आणि माझी लेक कशाला इथे कामे करेल...आम्ही तुझाच मान वाढवा पाहुण्यांसमोर म्हणून....(असे बोलतच होती....)
सुनंदा: (सासूला मध्येच तोडत) "चांगुलपणा नाही आई, हा निव्वळ छळ आहे.... एका बाजूला पाहुण्यांची धावपळ, तर दुसऱ्या बाजूला तुमची जुगलबंदी! मी ही यंत्र नाही.... मलाही भावना आहेत. रुपालीताई तुम्हाला कप धुवायला जमत नाही आणि आई, तुम्हाला पोह्यातले शेंगदाणे कमी-जास्त वाटतात, तर आजपासून स्वयंपाकाची जबाबदारी तुम्ही दोघी घ्या. मी फक्त पाहुण्यांना जेवायला वाढायला येईन."
रुपाली: (खजील होऊन) "वहिनी, मी तर फक्त मदत करायच्या हेतूने बोलत होती ग."
सुनंदा: "फक्त काय? फक्त मला कमी लेखून तुम्हाला आनंद मिळतो, बरोबर? रोजचे काही न काही असते तुमचे...अमुक चुकले...तमुक चुकले...आमच्याकडे असे नाही होत...पण आज माझी सहनशक्ती संपली आहे. यापुढे घरातलं कोणतंही काम करताना मला तुमच्या या टोमण्यांची गरज नाही. काम करायला मी आहे, पण मला गृहीत धरणं आता बंद करा....आणि जर अती कराल तर सरळ माझ्या नवऱ्याला सांगेल की दिवसभर तुम्ही दोघी मला कश्या त्रास देता ते....त्यांना माहित आहे तुमचे स्वभाव...मग ते काही बोलले तर मला सांगू नका....
लग्न होऊ १ वर्ष झाले...आजपर्यंत तुम्ही कधी मी चांगल कामं केले हे म्हटले नाही...फक्त चुका तेवढ्या काढल्या... आता मी चालली पाहुण्यांकडे.. करा आता तुमच्या पद्धतीने सगळं.... पोह्यात शेंगदाणे घाला नाहीतर शेंगदाण्यात पोहे टाका....चहा मध्ये कलर टाका नाहीतर त्यांना कॉफी द्या...मी येणार नाही किचन मध्ये...
सुनंदाने एप्रन काढला आणि किचनच्या ओट्यावर फेकला....ती पाहुण्यांकडे जायला निघाली. सासू आणि रुपाली दोघीही एकमेकींकडे बघत स्तब्ध उभ्या राहिल्या. आज पहिल्यांदाच सुनंदाने त्यांच्या 'टोमणे-संस्कृतीला' सडेतोड उत्तर दिले होते....
समाप्त
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
