राखी बांधेल पण एका अटीवर (अंतिम भाग)

राखी बांधेल पण एका अटीवर...
राखी बांधेल पण एका अटीवर (अंतिम भाग)

त्या कॉल नंतर सुमनच्या मनात एका क्षणात असंख्य भावना दाटून आल्या. दोन वर्षांच्या मौनानंतर आलेला हा फोन प्रेमापोटी नव्हता, तर मतलबापोटी होता, हे तिला लगेच जाणवलं. तिला खूप वाईट वाटलं, पण तिने स्वतःला सावरलं.

"बरं, बोल, काय सही लागते," ती शांतपणे म्हणाली. राजेश थोडा घुटमळला, मग म्हणाला, "ताई, तसं बघायला गेलं तर तुझाही हक्क आहे यात, पण... आई-बाबा गेल्यावर मीच सगळं सांभाळलंय, घर, शेती, सगळं. तुला काय, तुझं दुसरं घर आहे....आणि तू आपल्या घरी सुखी आहेस...

हे शब्द ऐकून सुमनचं मन विषण्ण झालं. जे नातं तिला जपायचं होतं, तेच नातं आता केवळ मालमत्तेच्या मोजपट्टीत मोजलं जात होतं. तिने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, "राजेश, थांब जरा. मला एकदा प्रत्यक्ष भेटून बोलायचंय, फोनवर नाही....आणि सही तिथे येऊनच बोलेल मी याबद्दल.

काही दिवसांनी सुमन माहेरी गेली. यावेळी तिच्या चेहऱ्यावर आधीसारखी आस नव्हती, तर एक शांत ठामपणा होता. राजेश आणि सुनीता दोघेही समोर बसले, चेहऱ्यावर सावधपणा घेऊन जणू सुमन आता हक्कासाठी भांडायला आली आहे अशी त्यांना भीती वाटत होती....

सुमन हळू पण स्पष्ट आवाजात बोलू लागली, "राजेश, मला माहितीये तुम्हा दोघांना भीती वाटतेय की मी हिस्सा मागेन. पण मी आज इथे त्यासाठी आलेली नाही. मला त्या घराचा, त्या जमिनीचा एक इंचही नको आहे. तुम्ही खुशाल सगळे कागद करा, मी लगेच सही करून देते."

हे ऐकून राजेश आणि सुनीता दोघांच्याही चेहऱ्यावरचं दडपण थोडं हलकं झालं, पण आश्चर्यही दाटलं.

सुमनने पुढे म्हटलं, "पण एक विनंती आहे. मला संपत्ती नको, पण माझं माहेर तोडू नकोस. आई-बाबा गेले म्हणून हे नातंही संपवू नकोस. वर्षातून एकदा तरी मला या उंबरठ्यावर हक्काने पाऊल ठेवू दे. रक्षाबंधनाला राखी बांधायला येईन तेव्हा 'लवकर निघ' असं नको म्हणूस. एवढंच मागणं आहे माझं."

तिचे डोळे भरून आले, पण आवाजात कंप नव्हता. "पैसा, जमीन, घर हे सगळं वेळेसोबत विरून जाईल रे पण भावंडांचं नातं हेच खरं धन आहे. ते जपा. माझ्यासाठी नाही, तर आपल्या आई-बाबांच्या आठवणीसाठी तरी जपा."
मागे तुम्ही मला दिलेली वागणूक मी अजूनही विसरली नाही आहे पण यापुढे जर सगळ चांगलं होत असेल तर मी ती वागणं आता लगेच विसरेल...मला तरी तुमच्याशिवाय आता माहेर नाही...

खोलीत क्षणभर शांतता पसरली. राजेशच्या डोळ्यात पाणी तरळलं. त्याने काहीच न बोलता सुमनचा हात हातात घेतला. सुनीताच्याही चेहऱ्यावर प्रथमच खरा पश्चात्ताप दिसल... तिने सुद्धा सुमनची माफी मागितली... त्या क्षणी मालमत्तेचे कागद बाजूला पडले आणि एका बहिणीच्या मायेने पुन्हा एकदा त्या घराचा उंबरठा जोडला गेला...

सुमन जातात जाता म्हणाली या पुढे मी राखी बांधेल पण एका अटीवर....ती अट म्हणजे मला पाहुणचारा मध्ये सुनीताच्या हातचा शिरा हवा...

आणि सगळ घर पुन्हा एकदा हसून खळखळून निघाले...

समाप्त
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि फॉलो करा...

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →