राखी बांधेल पण एका अटीवर (भाग४)
त्या रक्षाबंधनानंतर सुमनने खरोखरच माहेरशी संबंध कमी केले. सणवार आले तरी ती जाणीवपूर्वक टाळू लागली.
फोनवरही औपचारिक बोलणं होई. मैत्रिणी विचारत, "अगं भावाकडे का जात नाहीस आजकाल?" सुमन हसून विषय टाळे, पण मनातली जखम कधीच भरून येत नव्हती....
फोनवरही औपचारिक बोलणं होई. मैत्रिणी विचारत, "अगं भावाकडे का जात नाहीस आजकाल?" सुमन हसून विषय टाळे, पण मनातली जखम कधीच भरून येत नव्हती....
दरम्यान राजेश आणि सुनीताच्या आयुष्यात व्याप वाढला होता. मुलांचं शिक्षण, नोकरीतले ताण, घरखर्च या सगळ्यात त्यांना सुमनची आठवण क्वचितच येई. पण एक गोष्ट मात्र त्यांच्या मनात सतत घोळत राहिली ... वडिलांनी मागे ठेवलेली जुनी मालमत्ता, ते घर आणि थोडीशी शेतजमीन.
आई असताना या विषयावर कधी उघड चर्चा झाली नव्हती. आई नेहमी म्हणे, "घरातल्या गोष्टी घरातच राहू द्या, भावंडांत दुरावा नको." पण आता आई नव्हती आणि हळूहळू राजेशच्या मनात एक अस्वस्थता वाढू लागली होती सुमनचाही या मालमत्तेत कायदेशीर हक्क आहे, हे त्याला ठाऊक होतं.
सुनीताने अनेकदा राजेशच्या कानाशी लागून सांगितलं होतं, "तुमच्या ताईंना जर हिस्सा मागायची बुद्धी झाली तर काय करणार? आतापासूनच अंतर ठेवलेलं बरं." या विचारानेच कदाचित त्यांचं वागणं बदलत गेलं होतं ... सुमनला जाणूनबुजून दुरावलं जात होतं, जेणेकरून ती स्वतःहून माहेरपासून तुटेल आणि हक्क मागण्याचं धाडसही करणार नाही....
सुमनला या मागच्या कारस्थानाची कल्पनाही नव्हती. तिला फक्त एवढंच वाटत होतं की भावाचं आणि भावजयेचं प्रेम आटलं आहे आणि त्यामागे तिची काहीतरी चूक असेल. ती स्वतःलाच दोष देत राही. पण खरं कारण वेगळंच होतं ... मालमत्तेची भीती आणि लोभ यांनी नात्यातली माया गिळली होती.
एक दिवस अचानक सुमनच्या मोबाईलवर राजेशचा फोन आला. दोन वर्षांनी प्रथमच त्याने स्वतःहून फोन केला होता. सुमनला आश्चर्य वाटलं, पण मनात एक आशाही पल्लवित झाली ...कदाचित भावाला पश्चात्ताप झाला असेल की आपण चुकीच वागलो ताई शी म्हणून...माफी मागून नातं पुन्हा जुळेल.....असे विचार तिला आले... तिने फोन उचलला, आवाजात कातरता आणून म्हणाली, "बोल राजेश, कसा आहेस?"
पलीकडून राजेशचा आवाज आला पण त्यात प्रेमाऐवजी एक वेगळाच व्यावहारिक रुक्षपणा होता. "ताई, एक महत्त्वाचं बोलायचं होतं....बाबांच्या नावावरच्या मालमत्तेची कागदपत्रं करायचीयेत, तुझी सही लागेल त्यासाठी....कधी जमेल तुला यायला...
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
