राखी बांधेल पण एका अटीवर (भाग३)
आई गेल्यानंतरचं पहिलं रक्षाबंधन जवळ आलं. सुमनच्या मनात संमिश्र भावना होत्या ...आई नसल्याचं दुःख आणि तरीही भावाकडे राखी बांधायला जाण्याची ओढ. तिने विचार केला, "आई नाही म्हणून काय झालं, राजेश माझा भाऊ आहेच. जाईन, राखी बांधेन, तेवढाच एक धागा टिकून राहील."
तिने आदल्या दिवशी फोन केला, "राजेश, उद्या येते हं राखीला." पलीकडून राजेशचा आवाज काहीसा उदासीन आला, "हो ये, पण जरा लवकर ये कारण आम्हाला बाहेर जायचंय दुपारी."
सुमनला ते वाक्य ऐकून चटका बसला, पण तिने दुर्लक्ष केलं. दुसऱ्या दिवशी ती छान तयार होऊन, राजेशसाठी भेटवस्तू घेऊन माहेरी पोहोचली. दारात पाऊल ठेवताच तिला जाणवलं की या घरात आता पूर्वीची ऊब नाही. सुनीता स्वयंपाकघरात व्यस्त होती, तिने साधं स्मितही केलं नाही धड....
राजेश सोफ्यावर बसून मोबाईल पाहत होता. सुमनने ताट सजवलं, औक्षण केलं आणि राखी बांधली. डोळ्यात पाणी आलं तिच्या आई असती तर किती वेगळं चित्र असतं याची जाणीव तीव्रतेने झाली. राजेशने यांत्रिकपणे ओवाळणी दिली आणि म्हणाला, "बरं ताई,कधी निघणार आहेस तू?आम्हाला वेळेवर निघायचंय."
सुमनला अजून चहाचाही आग्रह झाला नव्हता. ती हिरमुसली मनाने स्वयंपाकघरात गेली, सुनीताला म्हणाली, "जरा पाणी देतेस का?"
सुनीता तुसडेपणाने म्हणाली, "फ्रीजमध्ये बाटली आहे, घ्या ना तुम्हीच....मी काम आवात आह आम्हाला बाहेर जायचे आहे ना...तुम्ही निघाल्या की आम्ही लगेच निघणार आहोत ." हे शब्द ऐकून सुमनच्या काळजाचा ठोका चुकला. हे तेच घर होतं जिथे आई तिला बसवून जेवू घालायची, आग्रह करायची.
तिथेच उभी असलेली भाचीही आत्याकडे फारसं लक्ष देत नव्हती जणू घरातल्या मोठ्यांचा बदललेला स्वभाव लहानग्यांनीही टिपला होता. सुमनला राहवलं नाही, तिने डोळे पुसले आणि निघण्याची तयारी केली. दारापाशी राजेश म्हणाला, "ये, काळजी घे," पण त्या शब्दांत कुठलीही ऊब नव्हती केवळ औपचारिकता होती.
गाडीत बसून सुमन एकटीच रडत राहिली. आज तिला पक्कं कळून चुकलं हे माहेर आता तिचं राहिलेलं नाही. आई गेल्यावर या घराने तिला परकं केलं होतं. त्या दिवशी तिने मनाशी एक निर्णय घेतला ... आता पुन्हा या उंबरठ्यावर पाऊल ठेवायचं नाही, स्वाभिमानाने दूर राहायचं....
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
