राखी बांधेल पण एका अटीवर (भाग २)
दोन वर्षांनी आईचीही तब्येत खूप खालावली आणि एका पहाटे ती शांतपणे निघून गेली. सुमनच्या आयुष्यातला दुसरा मोठा आधार गेला. अंत्यसंस्काराच्या वेळी सुमन ढसाढसा रडली आता खरंच आपण पोरके झालो, या भावनेने तिचं मन पोखरून निघालं.
तेराव्याचं विधी आटोपून सुमन सासरी परतली, तेव्हा तिच्या मनात एक भीती दाटून आली होती आता माहेर कसं असेल? पण तिने स्वतःला समजावलं, "राजेश माझा सख्खा भाऊ आहे. रक्ताचं नातं आहे. काही बदलणार नाही."
सुरुवातीचे काही महिने सगळं ठीक वाटलं. राजेश फोनवर बोलायचा, विचारपूस करायचा. पण हळूहळू त्याचा सूर बदलत गेला. आधी जिथे "ताई, कधी येतेस?" असं प्रेमाने विचारलं जायचं, तिथे आता फोनही कमी येऊ लागले.
सुनीताचा स्वभावही आता वेगळाच जाणवू लागला. आधी जी भावजय माहेरवाशिणीच्या स्वागतासाठी उत्सुक असे, ती आता प्रत्येक गोष्टीत हिशोब करू लागली....घरी येत आहे म्हटल की ....या म्हणण्यापेक्षा कशाला हा शब्द असायचा...
एकदा सुमन काही कामानिमित्त माहेरी गेली असता तिला जाणवलं की तिचं आता पूर्वीसारखं स्वागत होत नाही. सुनीता वरवर बोलत होती, पण तिच्या डोळ्यात एक वेगळाच भाव होता जणू सुमन आता 'पाहुणी' झाली होती, या घरातली नाही. आई असताना जे घर तिचं वाटायचं, तेच घर आता परकं वाटू लागलं होतं....
राजेशच्या वागण्यातही एक अढी जाणवू लागली. आई असताना तो प्रेमळ भाऊ भासे, पण आता प्रत्येक संभाषणात कुठेतरी एक हिशोबी सूर डोकावे. "ताई, तुला काय गरज आहे इकडे वारंवार येण्याची? आमची काळजी करू नको तू....स्वतःच कुटुंबाकडे लक्ष दे... असं तो एकदा सहज बोलून गेला, पण त्या वाक्याने सुमनच्या काळजाला चरा पडला.
सुमनला हळूहळू जाणीव होऊ लागली की आई हीच खरी दुवा होती जी हे नातं जोडून ठेवत होती. आईच्या मायेमुळे भाऊ भावजय दोघेही तिच्याशी चांगले वागत होते. आता ती दुवा तुटली होती आणि त्यासोबत नात्यातला ओलावाही आटत चालला होता.
तरीही सुमनने आशा सोडली नव्हती "रक्ताचं नातं आहे, वेळ जाईल तसं सुधारेल," असं ती स्वतःला समजावत राहिली....आईच्या मृत्यूनंतर भावला टेन्शन आले असेल आणि सगळ सांभाळणं कठीण जात असेल म्हणून ते चिडचिड करत असेल...अशी खोटी समजून तिने स्वतःची केली होती...
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
