राखी बांधेल पण एका अटीवर(भाग १)
"आई SS, दार उघड गं, मी आले!" दारात रिक्षा थांबताच सुमनने मोठ्याने हाक मारली, हातात राखीचं ताट सावरत....
आतून लगबगीने पावलांचा आवाज आला. "आले आले!" म्हणत आईने दार उघडलं आणि क्षणात सुमनला मिठीत घेतलं. "किती वाट बघत होते गं तुझी! ये, ये आत ये."
स्वयंपाकघरातून गोडाच्या शिऱ्याचा घमघमाट दरवळत होता. आईने तिचं कपाळाचं मुकं घेतलं आणि म्हणाली, "बरं झालं लवकर आलीस, अजून शिरा गरमच आहे."
वडील अंगणातल्या खुर्चीवर बसून वर्तमानपत्र वाचत होते. सुमनला बघताच त्यांच्या चेहऱ्यावर हसू उमललं. "ये बाळा, ये. किती दिवसांनी आलीस!" ते म्हणाले आणि तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. सुमनने वाकून त्यांना नमस्कार केला, तसे ते म्हणाले, "अगं अगं, एवढं वाकायला काय झालं, इकडे ये बस माझ्याजवळ."
आतून राजेश बाहेर आला, अजून झोपेतून उठलेला, केस विस्कटलेले. "ताई आलीस?" म्हणत त्याने तिला मिठी मारली. मागोमाग सुनीता हातात चहाचा ट्रे घेऊन आली. "या ताई, बसा. मी खास तुमच्यासाठी शिरा केलाय," ती हसत म्हणाली.
सुमनने पाटावर बसून ताट सजवलं. औक्षण केलं, राजेशच्या हातावर राखी बांधली. वडील शेजारीच उभे राहून कौतुकाने बघत होते...आईने लगेच सुमनच्या हातावर पाचशेची नोट ठेवली, "ओवाळणी घे बाळा."
दुपारी जेवताना आईने आग्रह करकरून सुमनच्या ताटात वाढलं. "अजून थोडं घे गं, बारीक झाली आहेस अगदी."
वडील मध्येच म्हणाले, "अगं तिच्या सासरी नीट खायला मिळत नाही की काय, एवढी बारीक झालीये?" यावर सगळे हसले. सुनीताही त्या हास्यात सामील झाली, "हो हो, पुढच्या वेळी येशील तेव्हा वजन वाढवूनच पाठवते तुम्हाला..
संध्याकाळी निघताना वडिलांनी तिच्या हातात एक पिशवी ठेवली घरचे आंबे, आईच्या हातचे लाडू. "बाळा, हे घर नेहमी तुझं राहील. कधीही ये, हक्काने ये," ते म्हणाले, डोळ्यात पाणी आणून. सुमनने त्यांच्या पाया पडून निरोप घेतला.
अशीच वर्षानुवर्षं गेली....सासरी संसार सांभाळताना ती वर्षातून दोन-तीन वेळा माहेरी येई. दर वेळी रक्षाबंधनाला हेच चित्र दिसे आईचा उत्साह, वडिलांची माया, राजेशचं आणि सुनीताचं मनापासून केलेलं स्वागत. माहेर म्हणजे काय, ते सुमनला त्या प्रत्येक भेटीत नव्याने उमगत असे.
पण काळ कधी सारखा राहत नाही. सुमनच्या वडिलांचं अचानक हृदयविकाराने निधन झालं. ती बातमी ऐकून सुमन कोसळलीच. वडील गेल्यावर घराचा आधारस्तंभच गेल्यासारखं वाटलं तिला. पण आई होती - म्हातारी असली तरी खंबीर. तिने घर सावरलं, राजेशला आधार दिला, आणि सुमनलाही धीर दिला.
पण काळ कधी सारखा राहत नाही. सुमनच्या वडिलांचं अचानक हृदयविकाराने निधन झालं. ती बातमी ऐकून सुमन कोसळलीच. वडील गेल्यावर घराचा आधारस्तंभच गेल्यासारखं वाटलं तिला. पण आई होती - म्हातारी असली तरी खंबीर. तिने घर सावरलं, राजेशला आधार दिला, आणि सुमनलाही धीर दिला.
"बाळा, बाबा गेले म्हणून काय झालं? मी आहे ना अजून. तू ये घरी, तुझं हक्काचं घर आहे हे," आई नेहमी म्हणे. आणि खरंच, वडील गेल्यानंतरही सुमनचं माहेर तुटलं नाही. आई असेपर्यंत त्या घराचा उंबरठा तिच्यासाठी नेहमी उघडा राहिला....
रक्षाबंधनाला ती येई, आई तिला ओवाळी, गोडधोड करी. राजेश आणि सुनीताही त्या दिवशी नीट वागत. भाच्ची-भाचा तिच्याभोवती घुटमळत. सुमनला वाटे, वडील नसले तरी आई असल्यामुळे हे घर अजूनही 'माहेर' आहे. आईच्या असण्यामुळे नात्यांमधला ओलावा टिकून होता. आई ही जणू त्या घराची सांधणारी नाडी होती ... ती तुटली की सगळं विस्कळीत होईल याची पुसटशी जाणीवही त्यावेळी सुमनला नव्हती.
पण हळूहळू सुमनच्या लक्षात यायला लागलं की आई थकत चालली आहे. तिचं औषधपाणी, तिची तब्येत यांची काळजी वाटू लागली. दर वेळी माहेरी गेल्यावर सुमन आईला म्हणे, "आई, स्वतःची काळजी घे गं." आई हसून म्हणे, "मी आहे तोवर तुझं माहेर आहे, एवढंच लक्षात ठेव."
त्या शब्दांचा खरा अर्थ सुमनला त्यावेळी कळला नव्हता. पण पुढे जे घडणार होतं, त्याची जाणीव जणू आईला आधीच झाली असावी....
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
