हक्काची मोलकरीण (अंतिम भाग)

सून की मोलकरीण
हक्काची मोलकरीण (अंतिम भाग)


"काल काय झालं होतं?" आदित्यने पुन्हा विचारलं.

मृणालने डोळे पुसले.

"तुला खरंच सगळं सांगू?"

"हो. यावेळी काहीही लपवू नकोस."

ती हळू आवाजात बोलू लागली.

"काल सकाळपासून रात्रीपर्यंत मी तुझ्या बहिणीच्या घरी काम करत होते. सजावट, स्वयंपाक, पाहुण्यांची सरबराई… सगळं केलं."

आदित्य शांतपणे ऐकत होता.

ताईचा मुलगा केक कापत होता तेव्हा सगळे फोटो काढत होते. आई तिच्या जवळ बसल्या होत्या. तू असतास तर कदाचित तुलाही ते सगळं छान वाटलं असतं."

ती थोडी थांबली.

"पण मी?"

तिचा आवाज भरून आला.

"मी स्वयंपाकघरात उभी होते. सगळ्यांना वाढत होते. मला केकचा तुकडा खायला बसायलाही वेळ दिला नाही. शेवटी पाहुण्यांचं जेवण आटोपल्यावर उरलेलं खाल्लं."

आदित्यच्या चेहऱ्यावर वेदना उमटल्या.

"आणि घरी आल्यावरही मला आराम मिळाला नाही. आईने लगेच घरचं काम सांगितलं."

सासूबाई मध्येच म्हणाल्या,

"अरे, एवढं काय मोठं झालं? नणंदेला मदत केली तर काय झालं?"

आदित्यने आईकडे पाहिलं.

"मदत आणि जबाबदारी लादणं यात फरक असतो आई."

"ती घरचीच आहे....थोडी मदत केली तर काय होतंय...

"म्हणूनच तर तिच्याशी घरच्यासारखं वागायला हवं. मोलकरणीसारखं नाही."

घरात शांतता पसरली.सासूबाईंचा चेहरा उतरला.

"मृणालने प्रियाच्या मुलाच्या वाढदिवसाला मदत केली, ते ठीक आहे. पण तिला दिवसभर कामाला लावून, स्वतः मात्र कार्यक्रमाचा आनंद घेणं योग्य नाही....आणि तिचे घरचे कुठे गेले होते तेव्हा...तिने घरचे सगळे कार्यक्रम स्वतःच्या भरोषावर करायचे माझ्या बायकोवर काय हक्क तिचा"

आदित्यचा आवाज आता ठाम आणि मजबूत होता...

"आणि त्याहून महत्त्वाचं म्हणजे ती परत आल्यावरही तिच्याकडून लगेच काम करून घेणं… हे मला अजिबात मान्य नाही... तू बघितलं ना ती थकून होती तरी सुद्धा.. आणि प्रिया तर कधीच येत नाही मग आपल्या घरी मदतीला...म्हणून आपण रुसतो का?

मृणालच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले.पण आज त्या अश्रूंमध्ये असहायता नव्हती.आदित्य तिच्याजवळ आला.

"तू माझी बायको आहेस, कुणाची कामवाली नाहीस. तुला मदत करायची असेल तर तू मनापासून कर. पण कुणी तुझा गैरफायदा घेणार असेल तर मी गप्प बसणार नाही."

मृणालने त्याच्याकडे पाहिलं.कित्येक दिवसांपासून मनात साचलेलं ओझं जणू हलकं झालं.तिला जाणवलं घरात सून म्हणून येणाऱ्या मुलीला कामाची अपेक्षा असू शकते.. पण माणूसपणाची किंमत कमी करून नाही..

कारण मदत प्रेमाने केली तर नातं घट्ट होतं…पण मदतीच्या नावाखाली एखाद्याला सतत झुकवलं,तर एक दिवस त्या नात्याचीच मान खाली जाते....

हे सगळ ऐकून मृणाल ची सासू गप्प झाली कारण तिला उमजले होते की चूक कुणाची होती...

समाप्त
स्नेहा डाखरे

कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि फॉलो करा...
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →