हक्काची मोलकरीण (भाग१)

सून की कामवाली...

हक्काची मोलकरीण (भाग१)


"मृणाल, तू आता लगेच प्रियाकडे जा."

मृणालने आश्चर्याने त्यांच्याकडे पाहिलं.

"आत्ता? पण आई, घरातलं सगळं काम"

"घरचं काम मी बघते. तिकडे आज तिच्या मुलाचा वाढदिवस आहे. तिला खूप काम असेल. तू गेलीस तर तिची मदत होईल."
सासूबाईंच्या आवाजात काळजीपेक्षा आदेशच जास्त होता....

सकाळपासूनच घरात लगबग सुरू होती. नणंदेच्या मुलाचा वाढदिवस असल्यामुळे तिच्या घरी छोटासा कार्यक्रम ठेवला होता. फुगे, सजावट, पाहुण्यांची तयारी, स्वयंपाक… सगळीकडे धावपळ सुरू होती....मृणाल नुकतीच स्वयंपाकघरातली कामं आटोपून चहा घेण्यासाठी बसणार, इतक्यात सासूबाईंचा आवाज आला.


मृणालने काहीही न बोलता पदर सावरला आणि नणंदेच्या घरी निघाली....दोन्ही घरं एकाच शहरात असल्यामुळे नणंदेच्या घरी जाणं काही अवघड नव्हतं. पण तिथे पोहोचल्यावर मृणालला जाणवलं की ती पाहुणी म्हणून आलेली नाही....

"वहिनी, आधी हे फुगे लाव."

"वहिनी, स्वयंपाकघरात जरा बघ ना."

"वहिनी, मुलाचे कपडे इस्त्री झालेत का?"

"वहिनी, पाहुण्यांसाठी चहा ठेव."

एक काम संपत नव्हतं, तोच दुसरं काम समोर येत होतं.
मृणाल सकाळपासून काही व्यवस्थित खाल्लंही नव्हतं आणि तिला बसायला वेळ नव्हता एवढे काम प्रियाने पुढे वाढून ठेवले होते...

दुपारी नणंद सजून तयार झाली. तिच्या मुलाला नवीन कपडे घातले. पाहुणे येऊ लागले.घरात सगळीकडे हशा होता.
प्रिया मुलासोबत फोटो काढत होती...तिचे सासरकडले नातेवाईक पण होते त्यात...आणि सासूबाईही तिच्याजवळ बसून कौतुक करत होत्या...मृणाल चा नवरा ऑफिस वरून उशीर झाल्यामुळे आला न्हवता...

मृणाल मात्र स्वयंपाकघरात उभी राहून सगळ्यांसाठी प्लेट्स वाढत होती...एकदा तिने ताट हातात घेतलं आणि विचार केला, "आज मीही सगळ्यांसोबत बसून जेवेन....खूप भूक लागली आहे आता..

पण लगेच आवाज आला,

"मृणाल, आधी पाहुण्यांना वाढ गं!"

तिने पुन्हा ताट खाली ठेवलं...केक कापला गेला. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या. मुलाच्या चेहऱ्यावर आनंद होता.
मृणाल दारात उभी राहून ते सगळं पाहत होती.तिच्या हाताला अजूनही भाजीचा वास होता.केकचा एक तुकडा तिच्यासमोरून गेला, पण तिच्या हातात आला नाही.
नंतर नणंद सहज म्हणाली,

"वहिनी, तू नसतीस तर माझं आजचं काम झालंच नसतं."

मृणालने फक्त खोटं हसण्याचा प्रयत्न केला...मनात मात्र एकच विचार आला

"मदत करण्यासाठी आले होते… पण आज मला माझीच किंमत मोलकरणीपेक्षा कमी वाटली."

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →