नवं पाऊल (भाग २) दिवस सरत होते.....सीमाचं आयुष्य एका ठराविक चाकोरीत बांधलं गेलं होतं पहाट, काम, दुपार, काम, संध्याकाळ, काम, आणि रात्री सुधीरच्या फोनची वाट. गावातल्या इतर बायका कधी कधी तिला बघून कुजबुजायच्या "बिचारी, नवरा शहरात, इकडे एकटीच राबतेय." पण सीमा कधी कुणापुढे तक्रार करायची नाही. तिला वाटायचं, हे सगळं तात्पुरतं आहे....
एके दिवशी शेजारच्या सुनीताताई सीमाला भेटायला आल्या. गप्पांच्या ओघात त्यांनी विचारलं, "सीमा, तुझी सासू तुला बरं वागवते का गं?" सीमा क्षणभर गप्प राहिली, मग हसून म्हणाली, "हो हो, ठीक आहे सगळं." पण सुनीताताईंच्या नजरेतून तिचा खोटा हसण्याचा प्रयत्न सुटला नाही. त्या फक्त एवढंच म्हणाल्या, "पोरी, मन मारून जगू नकोस. बोलायला शिक."
त्या रात्री सीमाने पहिल्यांदा सुधीरला फोनवर थोडं मन मोकळं केलं. "सुधीर, मला... मला कधी कधी खूप एकटं वाटतं रे इथे." सुधीर एक क्षण गप्प राहिला, मग म्हणाला, "मला माहीत आहे गं सीमा. आई जरा स्ट्रिक्ट आहे स्वभावाने, पण मनातून वाईट नाहीये. थोडे दिवस कळ काढ, मी लवकरच तुला घेऊन जाणार आहे. ऑफिसमध्ये थोड काम कमी झालं की मी घर बघतो पुण्यात." सीमाच्या मनात आशेचा एक किरण पुन्हा उजळला....
पुढच्या काही आठवड्यांत सुधीरचे फोन जरा जास्तच येऊ लागले. "घर बघतोय, दोन-तीन जागा फायनल केल्यात," तो सांगायचा. सीमा मनातल्या मनात स्वप्न रंगवू लागली स्वतःचं छोटंसं घर, तिथे मुक्तपणे श्वास घेणं, कुणाच्या नजरेखाली न राहता स्वतःच्या मनाने जगणं....
एका रविवारी सुधीर अचानक गावी आला. त्याच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद होता. जेवणानंतर त्याने आई-वडिलांसमोर विषय काढला "बाबा, आई, मी पुण्यात घर बघितलंय. आता सीमालाही माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. एकटं राहणं आता जमत नाही मला आणि इथे सीमालाही एकटं वाटतं."
खोलीत क्षणभर शांतता पसरली. कमलाबाईंचा चेहरा एकदम बदलला. सीमाचं हृदय जोरात धडधडू लागलं आनंदाने की भीतीने, तिलाही कळेना.
"काय म्हणालास?" कमलाबाईंचा आवाज चढला. "सीमाला घेऊन जाणार? आणि आम्ही कोण, इथे रामाच्या नावाने बोंब मारायला?"
सुधीरने शांतपणे समजावण्याचा प्रयत्न केला, "आई, असं नाही गं. आपण सगळे एकत्रच आहोत. पण मला एकट्याला तिकडे राहणं जड जातंय, आणि सीमालाही..."
"सीमालाही काय?" कमलाबाई मध्येच तोडत म्हणाल्या. "इथे तिला काय कमी आहे? पोटभर जेवायला मिळतंय, डोक्यावर छप्पर आहे आम्ही आहोत सोबतीला. शहरात जाऊन काय दिवे लावणार आहे ती? उगाच तुझ्याagacha खर्च वाढेल पुन्हा...सीमा खाली मान घालून उभी होती, शब्दच सुचत नव्हते.
सासरे मात्र या सगळ्यात शांत होते, पण त्यांचे डोळे काहीतरी सांगत होते जणू त्यांना ह वेळ येणार हे माहीतच होतं. रात्रभर घरात एक विचित्र तणाव होता. कमलाबाई जेवल्याही नाहीत नीट. सुधीर आणि सीमा एकमेकांकडे हतबल नजरेने बघत राहिले...
क्रमशः
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
