नवं पाऊल (भाग १)

नवीन लग्न झालेल्या सीमा ची कथा...

नवं पाऊल (भाग १)

लग्न होऊन जेमतेम सात आठ महिने झाले होते. सीमा गावाकडची, साधी, पण पदवीधर मुलगी नव्या घरात रुळण्याचा प्रयत्न करत होती. नवरा, सुधीर, पुण्यात एका कंपनीत नोकरीला होता. लग्नानंतर पंधरा दिवसांतच तो कामावर परतला होता आणि सीमा सासरी, सासू सासऱ्यांसोबत राहू लागली होती.... सीमा ला सोबत घेऊन जाण्याची सोय अजून त्यांच्याकडून झाली न्हवती म्हणून...

पहाटे साडेपाचला तिचा दिवस सुरू व्हायचा. अंगण झाडणं, गाई-म्हशींचं शेण काढणं, चहा-नाश्ता, मग सासऱ्यांचा डबा, धुणी-भांडी, दुपारचा स्वयंपाक... दिवस कसा सरायचा कळायचंच नाही.

सासू, कमलाबाई, घरातल्या प्रत्येक कामावर बारीक नजर ठेवायच्या. "सीमा, कणीक नीट भिजव"
"सीमा, अंगण नीट झाड"
"सीमा, पापड वाळत घाल"
हे शब्द तिच्या कानावर सतत पडायचे.... त्या दिवसभरात कोणत न कोणत काम लाऊन ठेवायच्या...

पण एक गोष्ट सीमाला नेहमी खटकायची तिला कधीच तिची सासू विचारायची नाही की ती जेवली का, तिला बरं वाटतंय का, ती दमली का. सासरे शांत स्वभावाचे, आपल्याच विश्वात असायचे आणि कमलाबाईंच्या तोंडून फक्त कामाच्याच सूचना यायच्या.

एके दुपारी सीमाला जबरदस्त डोकं दुखत होतं, ताप जाणवत होता, तरी ती स्वयंपाकघरात उभी राहून भाकरी थापत होती. कमलाबाई तिथून जाता जाता म्हणाल्या, "आज भाजी जरा कमी तिखट कर, दादांना त्रास होतो."

सीमाने मान डोलावली. तिला वाटलं, एकदा तरी विचारतील का "तुला काय होतंय?"... मी करते काम तू आराम कर पण तसं झालं नाही.

रात्री सुधीरचा फोन आला की सीमाचा चेहरा उजळायचा. "जेवलीस का? काय केलंस आज?" हे दोन प्रश्न ऐकण्यासाठी ती दिवसभर वाट बघायची. सुधीर प्रेमळ होता, महिन्यातून एकदा-दोनदा येऊन जायचा, फोनवर रोज बोलायचा. "थोडे दिवस थांब गं, मी सगळं व्यवस्थित करून तुला घेऊन जाईन," तो नेहमी म्हणायचा.

सीमा त्या एका वाक्यावर जगत होती. गावाकडच्या घरात ती एकटी पडली होती, पण मनात एक आशा होती की एक दिवस हे सगळं संपेल, ती सुधीरसोबत तिचं स्वतःचं घर थाटेल. रात्री झोपताना ती खिडकीतून आकाशाकडे बघायची आणि विचार करायची की किती दिवस अजून वाट बघायची?"

तिची आई कधी फोन करायची तेव्हा सीमा नेहमी म्हणायची, "मी ठीक आहे गं आई, काळजी नको करूस." पण आवाजातला हुंदका आईपासून लपत नसे. "पोरी, थोडं सहन कर, सासर म्हटलं की असंच असतं," आई समजावायची. सीमा फोन ठेवून उशीत तोंड खुपसून रडायची कुणालाच न कळता....

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →