Nओझं मंगळसूत्राच (अंतिम भाग)
बघता बघता लग्नाला जवळपास दोन वर्षं झाली होती. विनोदचं व्यसन आणि हिंसा दोन्ही वाढतच गेली. मंगला आता क्वचितच माहेरी फोन करायची, कारण तिथूनही "जुळवून घे" हेच ऐकू यायचं. पण एक रात्री विनोदने दारूच्या नशेत तिला इतकं मारलं की तिच्या कपाळाला जखम झाली, आणि लहान मुलीला घेऊन ती रात्रीच शेजारच्या घरी आश्रयाला गेली. दुसऱ्या दिवशी तिने रडत रडत भावाला फोन लावला.
तिचा भाऊ लगेच गाडी घेऊन आला. मंगलाचा सुजलेला चेहरा आणि कपाळावरची जखम बघून तो हादरला. घरी परतल्यावर आई-वडिलांना त्याने घरचं बडबड केली... "आपण किती दिवस तिला 'ऍडजस्ट कर' म्हणत राहणार? तिच्या जीवाला धोका आहे हे आता स्पष्ट दिसतंय.... तुम्ही आई वडील आहात तिचे आणि मेल्यावर तिचा जीव वापस आणणार आहात का?" आणि एवढे दिवस तुम्ही हे माझ्यापासून लपउन ठेवले"
तो बहिणीला म्हणाला," मी दुसऱ्या शहरात राहतो म्हणून मला काही सांगायचं नाही हे मूर्खपणाचे लक्षणे आहे तुझे... आजपर्यंत एकदा जरी सांगितलं असतं तर तुला तिथून कधीच बाहेर काढले असते मी...
आई-वडिलांनाही आता खरंच मंगलाची कीव आली .. तिचं रोजचं दुःख, तिची भीती, तिचं शांतपणे सोसणं, हे सगळं त्यांना पहिल्यांदा नीट जाणवलं. "आपण चुकलो, आधीच ऐकायला हवं होतं," असं वडील स्वतःशीच पुटपुटले....शेवटी इज्जतीपेक्षा मुलीचा जीव मोठा हे समजलं त्यांना...
भावाने पुढाकार घेतला. सासरच्या मंडळींशी बोलणी झाली, वकिलाचा सल्ला घेतला गेला आणि काही महिन्यांच्या प्रक्रियेनंतर मंगलाला काडीमोड मिळाला....त्यातही त्यांनी एक शब्दाने सुद्धा लहान मुलीला माझ्याकडे ठेवा असे म्हटले नाही.... त्याउलट सासूबाईंनी शेवटपर्यंत तेच म्हणणं मांडलं "आमचा मुलगा वाईट नाही, तुम्हीच घाई केलीत.... सुधारला आता माझा मुलगा" पण यावेळी मंगलाच्या भावाने ठाम उत्तर दिलं, "तुम्ही दोन वर्षं त्याची बाजू घेतलीत, आता आम्ही तिची बाजू घेणार....आणि कधी सुधारणार होता तुमचा मुलगा...माझ्या बहिणीला जीवाने मारल्यावर.."
काडीमोड झाल्यानंतर मंगला मुलीसह माहेरी परतली. सुरुवातीचे दिवस कठीण गेले समाजाचे प्रश्न, नातेवाईकांची कुजबुज पण यावेळी तिच्या पाठीशी तिचं कुटुंब ठामपणे उभं होतं. भावाने तिला एका शिवणकाम प्रशिक्षण केंद्रात प्रवेश मिळवून दिला. काही महिन्यांतच मंगलाने आधी घरी शिवणकाम सुरू केले आणि नंतर स्वतःचं छोटं शिवणकामाचं दुकान सुरू केलं आणि नवीन नवीन गोष्टी शिकून थोडा का होईना पण पैसे कमवायला लागली..
एका संध्याकाळी आपल्या मुलीला मांडीवर घेऊन बसलेली असताना मंगलाच्या मनात विचार आला .. दोन वर्षं तिने फक्त सहन केलं, कारण तिला वाटलं होतं, हेच तिचं नशीब आहे. पण आता तिला समजलं होतं सहन करणं म्हणजे प्रेम नाही आणि स्वतःसाठी उभं राहणं म्हणजे स्वार्थ नाही. तिने ठरवलं आपल्या मुलीला ती अशा जगात वाढवेल, जिथे मुलीला "सहन कर" नाही तर "आवाज उठव" हे शिकवलं जाईल....
समाप्त
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक कराआणि कमेंट करा.. फॉलो करा..
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक कराआणि कमेंट करा.. फॉलो करा..
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
