संशयाच्या पलीकडे (अंतिम भाग)

वहिनीवर वाईट नजर ठेवणारा दीर....


संशयाच्या पलीकडे (अंतिम भाग)

समीरच्या मोबाईलमधले फोटो पाहिल्यानंतर निखिलच्या मनातला शेवटचा संशयही संपला होता...त्याने मृणालला मनापासून माफी मागितली. मात्र मृणालसाठी त्या माफीपेक्षा एक गोष्ट महत्त्वाची होती की तिच्या बोलण्यावर पहिल्यांदा विश्वास ठेवला जात होता....

सुधाताई मात्र अजूनही समीरचीच बाजू घेत होत्या. मुलाने चूक केली हे त्यांना मान्य होत होतं, पण त्या चुकीची जबाबदारी स्वीकारण्यापेक्षा त्याचं आयुष्य वाचवण्याची त्यांना घाई होती. त्यांना भीती होती की ही गोष्ट बाहेर गेली तर घराची बदनामी होईल. त्यामुळे मृणालने शांत राहावं आणि विषय घरातच मिटवावा, अशी त्यांची अपेक्षा होती....

मृणालने संयमाने सांगितलं की घराची इज्जत वाचवण्याची जबाबदारी तिच्या सुरक्षिततेपेक्षा मोठी असू शकत नाही. तिने कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी हा विषय काढलेला नव्हता; स्वतःच्या आयुष्यात पुन्हा अशी भीती घेऊन जगायचं नाही म्हणून ती बोलली होती.
निखिल यावेळी तिच्या बाजूने ठाम उभा राहिला. त्याने आईला सांगितलं की समीरची चूक लपवली तर घराची इज्जत वाचणार नाही, उलट त्याला स्वतःच्या चुकीची जाणीवच होणार नाही....आणि तो चुकांवर चुका करत राहील...
सुधाताई रडल्या, मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला, पण निखिलने स्पष्ट केलं की समीरला योग्य ती जबाबदारी स्वीकारावीच लागेल....नाहीतर मी काहीतर दुसरा मार्ग शोधेल...

मृणाल मात्र त्या घरात राहण्यास तयार नव्हती. तिने माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय निखिलला सोडण्यासाठी नव्हता तर स्वतःला सावरण्यासाठी होता...रोजच्या घाबरून जगण्याने आणि दडपणाखाली राहण्याने ती रात्री दचकून सुद्धा उठायाची...तिने निखिलला स्पष्ट सांगितलं की त्याच्यावर तिचा राग नाही, पण त्याने तिला पुन्हा त्याच वातावरणात नेण्याआधी तिच्या सुरक्षिततेला पहिलं स्थान द्यायला हवं.....

मृणाल माहेरी गेल्यानंतर सुरुवातीला सुधाताईंनी नातेवाईकांना वेगळीच गोष्ट सांगितली...तिला घरात माझ्या आणि माझ्या मुलांच्या कामाचा कंटाळा यायचा म्हणून ती चालली गेली...मृणालने गैरसमज करून घर सोडलं, तिला जरा जास्तच संशय घेण्याची सवय आहे, असं त्या सांगत राहिल्या...आणखी बरेच काही...

पण निखिलने आईची ही बाजू मान्य केली नाही. त्याने कुणाकडेही मृणालची बदनामी होऊ दिली नाही. उलट जे सत्य होतं ते शांतपणे सांगितलं...समीर मृणालकडे चुकीच्या नजरेने पाहत होता, तिच्या नकळत फोटो काढत होता आणि त्यामुळे तिने स्वतःच्या सुरक्षिततेसाठी घर सोडलं....माझा भाऊ आहे म्हणून मी त्याला चान्स दिला होता सुधारायचा पण तो ऐकायला तयार नाही...

हळूहळू ही गोष्ट नातेवाईकांमध्ये पसरली. ज्या सुधाताईंना घराची बदनामी होऊ नये म्हणून सत्य लपवायचं होतं, त्यांनाच आता नातेवाईकांच्या प्रश्नांना सामोरं जावं लागत होतं. समीरबद्दल बोलताना लोकांची नजर बदलली. कुणी त्याच्यासमोर थेट काही बोलत नसलं तरी त्याला जाणवत होतं की आता लोक त्याच्याकडे आधीसारखं पाहत नाहीत. त्याच्या चुकीची चर्चा त्याच्या कानावर पोहोचू लागली आणि पहिल्यांदाच त्याला आपल्या वागण्याची लाज वाटू लागली....

सुधाताईंनाही हळूहळू उमगलं की मुलाची चूक लपवताना त्यांनी सुनेलाच दोष दिला होता. मृणालने घराची बदनामी केली नव्हती,उलट तिच्यावर अन्याय होऊ नये म्हणून ती घरातून बाहेर पडली होती....

काही दिवसांनी निखिल मृणालला भेटायला माहेरी गेला. यावेळी त्याने तिला परत येण्याची विनंती केली, पण अट घातली नाही. मृणालने शांतपणे सांगितलं की तिला निखिलसोबत संसार करायचा आहे,मात्र सासरच्या घरात पुन्हा स्वतःची सुरक्षितता आणि सन्मान धोक्यात ठेवून नाही. निखिलने तिचा निर्णय मान्य केला. दोघांनी स्वतंत्र घरात राहण्याचा निर्णय घेतला....

मृणालने त्या दिवशी एक महत्त्वाची गोष्ट शिकली होती...संसार टिकवण्यासाठी प्रत्येक गोष्ट सहन करावी लागत नाही. काही वेळा स्वतःसाठी घेतलेला निर्णयच संसाराला योग्य दिशा देतो....

लग्न झालं म्हणून स्त्रीने स्वतःचा आवाज गमवायचा नसतो... घर जपताना स्वतःला हरवणं म्हणजे संसार टिकवणं नव्हे... सुरक्षितता, सन्मान आणि मानसिक शांतता धोक्यात असेल, तर ‘नाही’ म्हणण्याचा आणि स्वतःसाठी निर्णय घेण्याचा अधिकार प्रत्येक सुनेला आहे... कारण संसार दोघांनी मिळून करायचा असतो...एकीने सहन करून नाही....

समाप्त

स्नेहा डाखरे

कथा आवडल्यास नक्की लाईक करा, फॉलो करा आणि कमेंट करा...
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →