सहनशीलतेची मर्यादा (अंतिम भाग)
आदित्यने बायको कडून भाग घेतला आणि आईला काम नको सांगू नेहाला म्हटल्यावर पुढे...
सासूबाई लगेच पवित्रा बदलून बोलल्या, "आम्ही काय मुलं जन्माला घातली नाहीत का रे? आणि ती काम तरी कुठली करते, आम्हीही मदत करतोच की तिला."
सासूबाई लगेच पवित्रा बदलून बोलल्या, "आम्ही काय मुलं जन्माला घातली नाहीत का रे? आणि ती काम तरी कुठली करते, आम्हीही मदत करतोच की तिला."
आदित्य म्हणाला, "आता ताईपण घरी आहे.... तू आणि ताई मिळून बघा ना दिवसभर काम काही दिवस... तिला जरा आराम करू दे."
यावर सासूबाई तिखट स्वरात म्हणाल्या, "तुझी बहीण इथे आराम करायला आलेली आहे, तुझ्या घरचं काम करायला नाही!"
आदित्य काहीच बोलला नाही, पण त्याच्या मनात नेहा बद्दल काळजी निर्माण झाली...
दिवस असेच सरत गेले. बाळ दीड वर्षाचं झालं, तसतसं नेहाला थोडी उसंत मिळू लागली. पण सासू आणि नणंदेने दिलेला तो त्रास, ते अपमानास्पद बोलणं... ती मनातून कधीच विसरू शकली नाही. वरवर सगळं सुरळीत दिसत असलं तरी तिच्या मनात एक जखम तशीच राहिली.
दीड-दोन वर्षांनी घरात पुन्हा एक बातमी आली पण यावेळी नेहा नाही, तर नणंद स्वाती गरोदर राहिली होती. रीतीप्रमाणे स्वाती डिलिव्हरीसाठी माहेरी म्हणजे याच घरी राहायला आली.
पुन्हा तीच जुनी कहाणी सुरू झाली. सासूबाई स्वातीची अगदी राणीसारखी काळजी ठेवू लागल्या तिचं खाणंपिणं, तिची विश्रांती, तिचे डोहाळे, सगळं काही आधीच्या आधी पुरवायच्या आणि हे सगळं सांभाळायचं काम अर्थातच नेहाच्या माथी पडलं. "तू हे कर, तू ते कर, माझी मुलगी आता या अवस्थेत काम कशी करणार?" - सासूबाईंचे तेच शब्द, तीच जुनी वागणूक, फक्त यावेळी बाळंतीण नेहा नसून स्वाती होती....
नेहाला त्या जुन्या दिवसांची पुरेपूर आठवण होती आपण गरोदर असताना, बाळंतपणानंतर या दोघींनी आपल्याशी कसं वागवलं होतं ते. पण यावेळी तिने संस्कारांचा मान राखत, आपलं कर्तव्य समजून जमेल तितकं काम केलं कुरकुर न करता. मनात जुन्या आठवणी उफाळून येत असल्या, तरी तिने स्वातीची बाळंतपणातली सेवा मनापासून केली....
नेमकं स्वातीचं बाळंतपण सुरू असतानाच नेहाच्या वडिलांना पॅरालिसिसचा अटॅक आला. आई एकटी असल्यामुळे वडिलांना सांभाळायला जाणं गरजेचं होतं. नेहाने कोणताही पुढचा मागचा विचार न करता आदित्यला सांगितलं, "मला जावं लागेल. माझ्याशिवाय आई बाबांना कोणी नाही. मला गरज होती तेव्हा त्यांनी आपल्याला खूप साथ दिली होती."
हे ऐकताच सासूबाई तावातावाने बोलल्या, "वा रे वा! तुला त्यांचं नातं महत्त्वाचं आणि माझ्या मुलीची डिलिव्हरी झालेली आहे, तिचा आराम महत्त्वाचा नाही? की मीच परत राबत बसू या वेळीसुद्धा? आता तुझं पहिलं प्राधान्य सासर असलं पाहिजे, माहेर नाही!"
यावेळी मात्र नेहा गप्प बसली नाही... शांत पण ठाम स्वरात ती म्हणाली, "आई तुम्ही आणि ताई जेव्हा माझी अशी वेळ होती, तेव्हा तुम्ही माझ्यासोबत काय केलंत, हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. तीच वेळ तुमच्यावर येऊ नये असं मला मनापासून वाटत होतं, म्हणून मी माझा सगळा राग बाजूला ठेवून तुमची मदत केली. पण आता माझ्यावर वेळ आलीये, तर तुम्ही पुन्हा तसंच वागताय. हे चुकीचं आहे. तुम्हाला जे योग्य वाटेल ते तुम्ही करा, पण मी माझ्या आई-वडिलांना असं एकटं टाकून जाऊ शकत नाही."
आदित्यने यावेळी न डगमगता तिची बाजू घेतली. तो म्हणाला, "नेहा, तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस. गरज पडली तर इकडे कामासाठी बाई लावू, पण तू तुझ्या आई-बाबांची काळजी घ्यायला जा. मी तुझ्यासोबत आहे."
घरात एक क्षणभर शांतता पसरली. सासूबाईंना उत्तर सुचेना. पहिल्यांदाच त्यांच्या मुलाने त्यांच्या विरोधात जाऊन बायकोची बाजू घेतली होती आणि पहिल्यांदाच नेहाने आपला आवाज ठामपणे मांडला होता....पुढे सगळे एकत्र आले खरे पण नेहाने सासू आणि ननंद कडून अपेक्षा सोडल्या होत्या ...एक वेगळ्या प्रकारची मनात गाठ निर्माण झाली होती आणि ती कायम न सुटणारी होती....
समाप्त
स्नेहा डाखरे
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि फॉलो करा आणि कमेंट करा...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
