Login

जश्यास तसे (अंतिम भाग)

आजारपणात सुनेला माहेरी पाठवणारी सासू...
जश्यास तसे (अंतिम भाग)

  पुढचे काही महिने असेच शांततेत गेले. घरातलं वातावरण थोडं  निवळलं होतं, टोमण्यांची संख्याही कमी झाली होती. पण नियतीने पुन्हा एक वळण आणलं... सासूबाई अचानक आजारी पडल्या. सुरुवातीला साधा अशक्तपणा वाटला, पण नंतर तब्येत खूपच बिघडली आणि त्यांना काही दिवस अंथरुणालाच खिळून राहावं लागलं.

   आता पुन्हा एकदा घरातलं संपूर्ण काम रश्मीच्याच खांद्यावर येऊन पडलं. स्वयंपाक, सासूबाईंची शुश्रूषा, औषधं, घरातली इतर कामं सगळं तिलाच सांभाळावं लागत होतं. पण यावेळी फरक इतकाच होता की रश्मी शांतपणे, कोणतीही तक्रार न करता हे सगळं करत होती. तिने कधीच असं दाखवलं नाही की तिला त्रास होतोय किंवा तिच्यावर अन्याय होतोय. ती आपलं कर्तव्य समजून सगळं निभावत होती.... तिने कामात मदत व्हावी म्हणून एक बाई झाडू पोछा करायला लावली...आणि बाकी कामे ती ऍडजस्ट करायची...

   पण एक गोष्ट तिने ठामपणे धरून ठेवली होती की  तिने नोकरी सोडायची नाही. कितीही काम असलं, कितीही थकवा आला, तरी ती रोज ऑफिसला जात राहिली. तिला माहीत होतं की स्वतःचं अस्तित्व, स्वतःचा आर्थिक आधार सोडून देणं म्हणजे पुन्हा त्याच जुन्या चक्रात अडकणं....

    एक दिवस संध्याकाळी ती ऑफिसवरून घरी आली, तेव्हा घरात कुजबुज नाही तर चांगलीच बडबड चालू होती.... सासरे, नवरा विशाल आणि खुद्द सासूबाई तिघेही बोलत होते. सासूबाई अंथरुणातूनच वैतागून म्हणत होत्या, "आता माझ्याने हे सगळं सहन होत नाही... आताशी कुठे मी फिरायला लागली आहे...कुठे त्या बाई कडे लक्ष ठेऊ...आणि हिला करायला काय झाले कामं , पैसे काय झाडावर झाडांना येतात काय...उगाच माझ्या पोराचे पैसे उडवायचे...यापेक्षा हिने नोकरीतून सुट्टी घ्यावी, नाहीतर नोकरीच सोडावी. मला एकटीला आता हे सगळं झेपत नाही."

   विशालनेही आईच्या सुरात सूर मिसळला, "हो ना, जरा काही दिवस सुट्टी घे, आईची तब्येत बरी नाही ना."
रश्मी दारातच उभी राहून हे सगळं ऐकत होती. तिच्या चेहऱ्यावर राग नव्हता, गडबडही नव्हती. ती शांतपणे आत आली, पर्स खाली ठेवली आणि स्पष्ट, ठाम आवाजात बोलली,
  
    "सासूबाई, माझ्याने हे होणार नाही....मी नोकरी सोडणार नाही आणि सुट्टीही घेणार नाही... आणि त्या बाई चा पगार मी माझ्या नोकरीच्या पैशातून देते तुमच्या मुलाच्या नाही...खोटं असेल तर विचारा तुमच्या मुलाला...   आणि माझ्याशिवाय तुम्हीmedicine घेतल्या का हे सुद्धा तुम्हाला कुणी विचारत नाही... जर तरी तुम्हाला वाटत असेल की मी हे झेपवू शकत नाही, तर तुम्हीही तुमच्या माहेरी जाऊन या, जसं मी गेले होते तेव्हा. नाहीतर आहे तसं चालू द्या.... मी माझ्या पद्धतीने सगळं सांभाळेन."

    खोलीत एकदम शांतता पसरली. सासरे, विशाल आणि सासूबाई तिघेही एकमेकांकडे बघत राहिले....त्यांना स्वतःच बोलणं आठवलं कारण याच शब्दांनी काही महिन्यांपूर्वी रश्मीला घराबाहेर काढलं होतं.... आजाराच्या नावाखाली आणि आता तेच शब्द तिच्या तोंडून ऐकून तिघांनाही आपल्या वागण्याची लाज वाटली. खजील होऊन तिघेही चूप बसले, कुणालाच पुढे काही बोलायला सुचेना...

   रश्मी मात्र शांतपणे स्वयंपाकघराकडे वळली तिचं काम पूर्वीसारखंच होतं पण कुणाला घाबरून न्हवत....

समाप्त
स्नेहा डाखरे

कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा...


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →