जश्यास तसे (भाग२)
आजार बरा झाल्यावर काही आठवड्यांनी रश्मी सासरी परतली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर तोच शांतपणा होता आणि डोळ्यात आता एक ठामपणा दिसत होता....ती घरात आली, सगळ्यांना नमस्कार केला, पण आधीसारखी धावपळ तिने केली नाही.
आजार बरा झाल्यावर काही आठवड्यांनी रश्मी सासरी परतली. पण यावेळी तिच्या चेहऱ्यावर तोच शांतपणा होता आणि डोळ्यात आता एक ठामपणा दिसत होता....ती घरात आली, सगळ्यांना नमस्कार केला, पण आधीसारखी धावपळ तिने केली नाही.
सासूबाईंनी नेहमीप्रमाणे टोमणा मारायचा प्रयत्न केला "बरं झालं आलीस, बघ जरा स्वयंपाकाची तयारी कर...मी पार थकून गेली बाबा कामे करून" रश्मीने शांतपणे उत्तर दिलं, "हो, करते. पण आज मला जरा उशीर होईल, ऑफिसचं काम आहे." तिच्या आवाजात आता विनवणी नव्हती, फक्त एक स्पष्ट सांगणं होतं.
हळूहळू घरातल्या सगळ्यांना जाणवू लागलं की रश्मी आता आधीसारखी सगळ्यांच्या मर्जीप्रमाणे वागत नाही. ती सकाळी उठून आवश्यक तेवढा स्वयंपाक करायची, आणि मग स्वतःचं आवरून ऑफिसला निघून जायची. कुणाच्या टोमण्यांकडे ती आता लक्षच द्यायची नाही. सासूबाई काही बोलल्या तरी ती फक्त हसून पुढे जायची, वाद घालत बसायची नाही.
सर्वात मोठा बदल म्हणजे तिने स्वतःची काळजी घ्यायला सुरुवात केली. रोज रात्री बारा वाजेपर्यंत उपाशी राहून जेवणाची वाट बघणं तिने बंद केलं. त्याऐवजी तिने हुशारीने एक उपाय शोधला ऑफिसमधूनच येताना ती नाश्ताचा टिफीन मागवायला लागली आणि खाऊन घ्यायची.... त्यामुळे घरी पोहोचेपर्यंत ती उपाशी राहायची नाही, आणि रात्री उशिरा जेवण झालं तरी ती हलकं खायची...
विशालला हा बदल आधी खटकला, पण हळूहळू त्यालाही जाणवलं की रश्मी आता स्वतःच्या आरोग्याला आणि मानसिक शांततेला प्राधान्य देतेय....त्याने काही म्हटले की ती उत्तर देत बसायची नाही...आणि त्यामुळे तो थोडा अस्वस्थ व्हायचा, पण रश्मीच्या शांत आणि ठाम वागण्यापुढे त्याचं काही चालेनासं झालं.... कारण ती कमवायची त्यामुळे नाश्त्याचा टिफीन का लावलास.. हे तो विचारू शकत न्हवता....
सासूबाईंनाही हळूहळू समजलं की आता पूर्वीसारखे टोमणे मारून रश्मीला हवं तसं वाकवता येणार नाही. ती काम करत होती, पण आता कर्तव्य म्हणून, दडपणाखाली नाही. घरातल्या इतर सुनांशी तुलना करणंही आता थांबलं, कारण रश्मी त्या तुलनेला प्रतिसादच द्यायची नाही.
रश्मीने कुणाशी भांडण केलं नाही, कुणाला उलट बोलली नाही. तिने फक्त स्वतःसाठी सीमारेषा आखल्या. ती घरातलं काम करायची, पण स्वतःला संपवून नाही. ती नोकरी करायची, पण घरच्यांच्या टोमण्यांचं ओझं मनावर घेऊन नाही. तिने शिकलं होतं की स्वतःची किंमत स्वतःलाच ठरवावी लागते... दुसरे आपल्याला शून्य समजतात...
हळूहळू घरात एक वेगळंच संतुलन निर्माण झालं. रश्मी आनंदी होती, कारण ती आता स्वतःसाठी जगत होती. आणि घरातल्या लोकांनाही, नकळत का होईना, तिच्याबद्दल आदर वाटू लागला ... कारण तिने कधीच स्वतःचा आवाज गमावला नव्हता, फक्त तो योग्य वेळी वापरायला शिकली होती....
