नवं पाऊल (अंतिम भाग)
दुसऱ्या दिवशीपासून कमलाबाईंनी वेगळाच पवित्रा घेतला. सीमावर कामाचा भार अजून वाढवला. "आता जाणारच आहेस ना लवकर, मग शेवटचे काही दिवस तरी नीट शिक सगळं," असे टोमणे सुरू झाले. नातेवाइकांना फोन करून त्या रडवेल्या आवाजात सांगू लागल्या, "माझा मुलगा मला सोडून बायकोला घेऊन जातोय बघा, म्हातारपणी असं भोगायचं होतं नशिबात."
गावात बातमी पसरली. काही नातेवाईक सुधीरला समजावायला आले "अरे बाबा, आई-वडिलांना असं एकटं सोडून जाणं बरं दिसत नाही समाजात." सुधीर मात्र यावेळी ठाम राहिला. "काका, मी आई-वडिलांना सोडून चाललो नाहीये. सणासुदीला, गरजेला मी इथे येतच राहीन. पण सीमा माझी बायको आहे, तिलाही स्वतःचं आयुष्य जगण्याचा हक्क आहे.... आणि नवरा बायको तर सोबतच राहतात ना...काही दिवसाने मी आई बाबांना सुद्धा नेईल सोबत...
एका संध्याकाळी कमलाबाई थेट सीमाजवळ आल्या. "तुझ्यामुळेच माझा मुलगा माझ्यापासून तोडतेयस तू. लग्न होऊन वर्षही झालं नाही आणि नवऱ्याला असं भरवलंयस डोक्यात....तुला काही अक्कल आहे का...तिथे जाऊन फक्त त्याच्यावरचा खर्चाचा भार वाढवणार आहेस तू....
सीमाचे डोळे भरून आले, पण यावेळी तिने धीर एकवटला आणि हळू पण ठाम आवाजात म्हणाली, "आई, मी कधीच त्यांना काही भरवलं नाही डोक्यात. मी फक्त... मला इथे एकटं वाटतं, एवढंच मी सांगितलं होतं त्यांना आणि नवरा बायकोने एकत्र राहणं यात चूक काय आहे?"
कमलाबाई निरुत्तर झाल्या, पण राग कमी झाला नाही. घरात एक अनामिक अबोला पसरला होता..काही दिवस घरात शांतता आणि तणाव असाच राहिला. सुधीर मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता. एका शांत संध्याकाळी त्याने वडिलांशी एकट्यात बोलणं केलं. "बाबा, तुम्ही तरी समजून घ्या. मी काही कायमचं सोडून चाललो नाही. महिन्यातून एकदा येईन, सणाला नक्की येईन. पण मला आणि सीमाला आमचं स्वतःचं आयुष्य उभं करू द्या."
वडील बराच वेळ शांत बसले, मग म्हणाले, "मला काही हरकत नाही रे तुझी. तुझी आई जरा भावनिक आहे, तिला वेळ लागेल समजायला. पण मी बोलतो तिच्याशी." त्या रात्री वडिलांनी कमलाबाईंची समजूत काढली "अगं, मुलगा कुठे परका होतोय? आपणच तर मोठा करून बायको आणून दिली त्याला. आता त्यालाच त्याचं आयुष्य जगू दे. आपण म्हातारपणी त्यांच्याकडेच जाणार आहोत ना शेवटी."
हळूहळू काही दिवसांनी कमलाबाईंचा राग विरघळू लागला, पण अहंकार अजून टिकून होता. जाण्याच्या आदल्या दिवशी सीमा त्यांच्या पाया पडली. "आई, मी काही चुकले असेल तर माफ करा. मी नेहमी तुमच्या तब्येतीची, गरजेची काळजी घेत राहीन, फोनवर बोलत राहीन.... आणि गरज पडल्यास नक्की हजार राहील... हे ऐकून कमलाबाईंचे डोळे नकळत भरून आले. त्यांनी सीमाच्या डोक्यावरून हात फिरवला पहिल्यांदाच, इतक्या महिन्यांत पहिल्यांदाच सीमाला आधार असल्यासारखं वाटलं...आणि तिच्या डोळ्यांत पाणी आलं, पण यावेळी दुःखाचं नाही....
दुसऱ्या दिवशी सुधीर आणि सीमा पुण्याला निघाले. गाडीत बसताना सीमाने मागे वळून बघितलं घर, अंगण, ते सगळे दिवस, सगळ्या आठवणी. कमलाबाई दारात उभ्या होत्या, हात हलवत. सासरे शेजारी उभे राहून हसत होते....
गाडी गावाबाहेर पडली तसं सीमाने खिडकीतून येणारा वारा अनुभवला मोकळा, ताजा, नव्या आयुष्याची चाहूल देणारा. सुधीरने तिचा हात हातात घेतला. "आता सगळं नीट होईल," तो म्हणाला. सीमा फक्त हसली आता तिला खरंच वाटत होतं की तिची जुनी वाट संपली आहे आणि एक नवी, तिची स्वतःची वाट सुरू झाली आहे....आणि त्यात ती नवं पाऊल टाकत आहे.
समाप्त
समाप्त
स्नेहा डाखरे
कथा आवडल्यास नक्की लाईक करा आणि कमेंट करा आणि फॉलो करा...
📱
ईरा App
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने
