लघुकथा लेखन स्पर्धा एप्रिल २०२६
विषय : वृद्धाश्रमाची गोष्ट
विषय : वृद्धाश्रमाची गोष्ट
“इंदूकाकूंना त्यांच्या मुलांनी वृद्धाश्रमात ठेवलं, पंधरा दिवसांपूर्वी त्या तिकडे रहायला गेल्या.” शैला ज्योतीच्या कानात कुजबुजली.
“काय? तुला कसं कळलं?” ज्योतीचा आपल्या कानांवर विश्वास बसत नव्हता.
“आमची कामवाली मायाने सांगितले मला.”
“तिला कसे कळलं?”
“ती इंदूकाकूंकडे सुद्धा काम करते ना. त्यांनी तिला पुढच्या महिन्याचा पूर्ण पगार, दोन नवीन कोऱ्या साड्या शिवाय तिच्या मुलांसाठी बिस्कीट, चॉकलेट, चिवडालाडू दिला आणि मी आता आश्रमात रहायला जाणार आहे तेव्हा उद्यापासून येऊ नकोस असे सांगितलं.”
“त्या आश्रमात म्हणाल्या, वृद्धाश्रम नाही. गुरूमाऊली आश्रम, मनशांती केंद अशा ठिकाणी गेल्या असतील. तू उगाच पराचा कावळा करू नकोस.” ज्योती चिडून म्हणाली.
मायाच्या बहिणीच्या मुलाने त्यांना तिकडे सोडलं. त्याची रिक्षा आहे ना. चांगल्या दोन मोठल्या बॅगा होत्या. बरं मी तुला हे सांगितलं कोणाला बोलू नकोस नाहीतर उगाच माझ्या नावाचा बोभाटा व्हायचा.” शैलाने ज्योतीला बजावलं.
कोणाला सांगू नकोस” असं म्हणत शैला आणि ज्योतीने इंदूकाकूंना वृद्धाश्रमात ठेवलं ही गोष्ट सगळ्यांना सांगितली. वाऱ्याच्या वेगाने ही बातमी सगळ्या एरियात पसरली. काकूंना वृद्धाश्रमात रहायला जावं लागल्याचं कळताच शेजारीपाजारी, ओळखीपाळखीची मंडळी हळहळली.
काकूंचा मोठा मुलगा केतन नवी मुंबईत रहात होता धाकटा अमोल अंधेरीत स्थायिक झाला होता. मुलीने घरच्यांच्या विरोधात जाऊन आंतरजातीय विवाह केला असल्याने तिच्याशी त्यांनी फारसा संबंध ठेवला नव्हता.
इंदूकाकू आणि वामनकाकांचं सगळं आयुष्य सारंगपूर सारख्या छोट्या गावात गेलं असल्याने त्यांना मुलांकडे करमत नव्हतं. मोठ्या शहरात, उच्चभ्रू सोसायटीत ऍडजस्ट व्हायला जमत नव्हतं. शिवाय काकांचं सोवळओवळ दांडग होतं. मास मच्छी तर दूरच रोजच्या जेवणात त्यांना कांदा लसूणसुद्धा वर्ज होतं. नोकरदार सुनांना हे सगळं पाळणं कठीण जात होतं यामुळे तिकडे राहणं त्यांना रुचत नव्हतं.
दोघंही मुलं काका काकूंना अनेकदा आपल्या घरी यायला विनवायची, किती वर्ष असे एकटे राहणार म्हणायची पण काका काकू मनावर घ्यायचे नाहीत. नातवंडांचे वाढदिवस, सणावर, कारणानिम्मित मुलांकडे जायचे आणि चार दिवसात परत आपल्या हक्काच्या मठीत परतायचे.
काका होते तोपर्यंत हे चक्र असच चालू होतं. पण गेल्या वर्षी काका गेले आणि “आईला एकट कसं ठेवणार म्हणत?” मुलं इंदूकाकूंना कायमची आपल्या घरी घेऊन गेली. काही दिवस आई माझ्याकडे तर काही दिवस आई तुझ्याकडे राहील दोन्ही मुलांनी संगनमताने ठरवलं.
“हे एक ना एक दिवस होणारच होतं. इंदूकाकूंनी कधी सुनांशी पटवून घेतलंच नाही. नातवंडांना जीव लावला नाही. सारखं मी म्हणते, माझं तेच खरं म्हंटल्यावर असंच होणार.” बातमी कळल्यावर योगिनी महिला मंडळात या विषयावर जोरदार चर्चा रंगली.
“आपण जायचं का काकूंना भेटायला?” शैलाने उपस्थित महिला वर्गाला विचारलं.
“मी फोन लावला त्यांचा फोन लागला नाही.” ज्योती शैलाच्या म्हणण्याला दुजोरा देत काळजीच्या सुरात म्हणाली.
“कुठल्या आश्रमात आहेत? नक्की कुठे जायचं भेटायला? पाटकरबाईंनी शंका उपस्थित केली.
“बेलवली येथील आधार आश्रमात आहेत इंदूकाकू. मी सगळी माहिती काढली आहे. आश्रमाजवळ तुळजाभवानी मातेचे मंदिर, मोठं तळं आहे. आपल्या महिला मंडळाची एक दिवसीय सहल आणि काकूंना भेटणं दोन्ही कामं होतील. आपण चार, पाचजणी काकूंना भेटायला जाऊ. बाकीच्या तोपर्यंत मंदिराच्या आसपासचा परिसर हिंडून सहल एन्जॉय करतील.” शैलाने सगळी योजना समजावून सांगितली.
रडून रडून डोळे सुजलेल्या, हतबल होऊन शून्यात नजर लावून बसलेल्या काकू सगळ्यांच्या डोळ्यासमोर येऊ लागल्या. काकूंना धीर द्यायला, त्यांच्या दुःखात सहभागी व्हायला त्या सगळ्याजणी अधीर झाल्या त्यामुळे दुसऱ्याच दिवशी त्यांना भेटायला निघाल्या.
जे चित्र रंगवत शैला, ज्योती आणि बाकीच्या मैत्रिणी वृद्धाश्रमात पोहोचल्या तिकडे त्याच्या अगदी विरुद्ध परिस्थिती होती. समोरच दृश्य पाहून त्या अवाक झाल्या.
इंदूकाकू व्यवस्थापकच्या खुर्चीत बसल्या होत्या. श्रीमती. इंदुमती वामन दांडेकर - व्यवस्थापक ही पाटी टेबलावर दिमाखात विराजली होती.
अचानक समोर आपल्या मैत्रिणींना पाहून काकू देखील गांगरून गेल्या पण लागलीच स्वतःला सावरत त्यांनी आपल्या मैत्रिणीचा इकडे येण्याचा हेतू ओळखला. ख्यालीखुशालीच्या गप्पा झाल्यावर त्या आपली कहाणी सांगू लागल्या.
“ह्यांचे दिवसकार्य पार पडल्यावर मुलं मला आपल्या बरोबर घेऊन गेली. त्यांच्यासाठी आई म्हणजे फक्त एक जबाबदारी होती. त्याच्या आयुष्यात आपल्याला जागा नाही ही गोष्ट मला तिकडे राहिल्यावर काही दिवसातच लक्षात आली.”
“रहायला स्वतंत्र खोली होती, नोकर मंडळी दिमतीला होती. धाकट्या लेकाने उज्जैन महाकाल यात्रा देखील घडवून आणली. सगळं काही असूनही उगाच कशाची तरी कमी मात्र जाणवत होती.”
“इतके वर्षात कधी आला नाहीत इकडे, आता गरज लागल्यावर बरोबर आलात, सुनेच्या बोलण्या, वागण्यातून ही गोष्ट जाणवत होती. तिची चूक नव्हतीच खरंच त्यांना गरज होती तेव्हा आम्ही पाठ फिरवली होती. ह्याच्या कर्मठ स्वभावामुळे मला मनात असूनही मला मुलांकडे रहाता आलं नव्हतं. थोडे दिवस केतनकडे तर थोडे दिवस अमोलकडे काढल्यानंतर मी हिय्या करून सारंगपूरला रहायला आले. सुरवातीला धाकटी बहीण सोबत होती म्हणून काही वाटले नाही पण नंतर मात्र एकटीला घर खायला उठू लागले. रात्री अपरात्री मला काही झाले तर कोणाला कळणारही नाही या भीतीने ग्रासून गेले.”
“एकटी कशी राहणार परत मुलांकडे जावं या विचारत असताना पुणे मुंबई प्रवासादरम्यान आधार आश्रमाचे सर्वेसर्वा सरलाताई आणि श्रीनिवास राव या दांपत्याची ओळख झाली. गप्पांच्या ओघात त्यांनी आश्रमाबद्दल माहिती सांगितली.”
“आश्रम बघायला आले असता इथला परिसर, सरलाताई आणि श्रीनिवास यांच्या कार्याने भारावून गेले. त्यांना केअर टेकरची आवश्यकता आहे हे मला त्यांच्याकडून कळले. मी इथे रुजू झाले तर चालेल का? अगदी सहजच त्यांना विचारले. दोघांनी लागलीच संमती दिली आणि माझ्या भरकटलेल्या आयुष्याला दिशा मिळाली.”
“मुलांनी सुरवातीला नाराजी दर्शवली. लोकं नावं ठेवतील, आर्थिक स्थिती भक्कम असूनही तुम्ही केअर टेकर म्हणून काम करता हे पोटीकडकीने सांगूनही कोणाला पटणार नाही. आम्ही वृद्धाश्रमात ठेवलं असंच सगळ्यांना वाटेल, दोघी सुनांनीसुद्धा आक्षेप घेतला. बरीच वादावादी झाली.”
“पैश्यासाठी मी तिकडे जातच नाही आहे. बऱ्याच वर्षापासून काहीतरी करावं अशी इच्छा होती पण नवऱ्याचा पाठिंबा मिळाला नाही. आता आयुष्याच्या या वळणावर संधी चालून आली आहे, मला ती गमवायची नाही मी मुलांना विनवलं.”
“आपण कोणाकडे याची वाच्यता करायची नाही म्हणजे तुम्हाला कोणी बोल लावणार नाही. मोठ्या सुनेला अनघाला मी अश्वस्थ केलं.”
“अखेर हो नाही करता ती सगळी तयार झाली आणि माझ्या आयुष्याची सेकंड इनिंग सुरू झाली.” इंदूकाकूंनी आपल्या मनात साचलेलं सगळं आपल्या मैत्रिणींना सांगितलं.
“आम्हाला आधीच कल्पना दिली असती तर गैरसमज झाला नसता. वृद्धाश्रम म्हटलं की डोक्यात एकच विचार येतो या अनुषंगाने आपण कधी त्याकडे पहातच नाही.” शैला, ज्योती खजील झाल्या होत्या.
“चुकलंच माझं, सांगायला हवं होतं. मायाने सामानाची आवराआवर करायला मदत केली म्हणून तिला सांगावं लागलं.” काकू नजर चुकवीत म्हणाल्या.
इंदूकाकू आनंदात आहेत, आपल्या मर्जीने इथे रहात आहेत हे कळल्यावर सगळ्या मैत्रिणींच्या जीवात जीव आला. काकूंना मनापासून शुभेच्छा देत त्या समाधानाने आपल्या घरी निघाल्या.
इंदूकाकू देखील उतार वयातील या पर्वाला सामोऱ्या जायला, सेकंड इनिंग मनाप्रमाणे जगायला नव्याने सज्ज झाल्या.
