सावित्री.... आजच्या जगाची....
"मृण्मयी या वर्षी तरी वटपौर्णिमेची पूजा नीट करशील अशी आशा आहे.... गेल्या वर्षीसारखं ऑफिसचं कारण सांगून टाळू नकोस," सासूबाईंनी चहाचा कप टेबलावर ठेवत सुमितच्या पाठोपाठ किचनमध्ये आलेल्या मृण्मयीला ऐकवलं....
मृण्मयी शांत राहिली... तिने सुमितकडे पाहिलं... सुमितने नेहमीप्रमाणे मान खाली घालून मोबाईलमध्ये पाहणं पसंत केलं.
गेल्या वर्षभरापासून सुमित आणि मृण्मयीच्या संसारात एक विचित्र शांतता पसरली होती,सुमित एका मोठ्या मंदीच्या काळात डिप्रेशनमध्ये गेला होता,त्याचा स्वतःवरचा विश्वास उडाला होता. घरातल्या जबाबदाऱ्या, कर्ज आणि सुमितची मानसिक स्थिती या सगळ्याला मृण्मयी एकटी सांभाळत होती कारण सुमित आणि सासू घरात असायची आणि घरात वातावरण चांगलं रहावे म्हणून ती घरात कोणालाही न जाणवू देता ऑफिस सांभाळून सुमितचे मानसोपचार तज्ज्ञांचे (Psychiatrist) राउंड्स, त्याची औषधं सगळं करत होती....
दुपारी सोसायटीतल्या सगळ्या बायका नटून-थटून वडाच्या झाडापाशी जमल्या होत्या... मृण्मयी मात्र घरात लॅपटॉपवर काम करत होती. तिने साधा ड्रेस घातला होता, ना कपाळावर मोठी टिकली होती, ना हातात हिरव्या बांगड्या.
सासूबाईंनी घरात येऊन कपाळाला आठी घातली, "मृण्मयी, आजच्या दिवशी तरी हे काम बाजूला ठेव... उपाशी राहायचं सोडून तू मघाशी पोळी-भाजी खात होतीस, अहोरात्र नवऱ्याच्या दीर्घायुष्याची आणि सुखाची प्रार्थना करायची सोडून तू कॉम्प्युटरमध्ये डोकं घालून बसलीयेस....सुमितच्या आयुष्यात जे काही चढ-उतार सुरू आहेत, ते तुझ्या अशा वागण्यामुळेच होत असेल बहुतेक...
मृण्मयीच्या डोळ्यात पाणी आलं, पण तिने स्वतःला सावरलं.. ती काही बोलणार, तितक्यात मागून सुमितचा आवाज आला, "आई, बस कर ग!"
सुमित रूमच्या बाहेर आला होता. कित्येक दिवसांनंतर त्याचा आवाज एवढा खंबीर वाटत होता. तो मृण्मयीच्या जवळ गेला आणि तिचा हात हातात घेतला.
"आई, तुला वाटतंय ना की मृण्मयीने आज उपवास केला नाही? पण तुला माहितीये का, गेली अख्खी दोन वर्ष ती माझ्यासाठी 'उपवास' करतेय," सुमित भावुक होऊन म्हणाला.
"म्हणजे? मला तर रोज जेवताना दिसते ती," सासूबाई गोंधळल्या.
"आई, उपवास म्हणजे फक्त अन्न सोडणं नसतं. जेव्हा मी नोकरी गमावून, मानसिक संतुलन गमावून अंधारात बसलो होतो, तेव्हा मृण्मयीने स्वतःच्या सुखाचा उपवास केला होता.
तिने स्वतःसाठी नवीन कपडे घेणं, फिरणं, आनंद साजरा करणं सोडलं होतं....मी चिडायचो, तरीही तिने माझ्यावर चिडणं सोडलं होतं...तिने स्वतःच्या रागाचा उपवास केला होता...
आज ती पोटभर जेवली, कारण तिला माझ्या ट्रीटमेंटचे पैसे भरण्यासाठी आणि घर चालवण्यासाठी ऑफिसमध्ये दुप्पट ताकदीने काम करायचं आहे... ती उपाशी राहिली असती, तर तिचं डोकं दुखलं असतं आणि ती आज माझं नवीन बिझनेस प्रपोजल टाईप करू शकली नसती."
सुमितने मृण्मयीकडे पाहिलं, त्याच्या डोळ्यात कृतज्ञता होती. "आई, वडाच्या झाडाला दोरा गुंडाळल्याने आयुष्य वाढत असतं की नाही मला ठाऊक नाही, पण या मुलीने स्वतःची ऊर्जा मला देऊन माझं संपत आलेलं आयुष्य पुन्हा जिवंत केलंय. ही माझी सावित्री झाडापाशी नाही, तर माझ्या मनात बसलीये."
सासूबाई अवाक होऊन दोघांकडे पाहत राहिल्या... त्यांना पहिल्यांदाच जाणवलं की, पूजेच्या ताटापेक्षा सुनेच्या डोक्यावर असलेलं जबाबदारीचं ओझं जास्त महत्त्वाचं होतं...कारण त्याच्या मुलाला म्हणजे सुमित ला आधार देणारी तीच होती...त्यांनी पुढे होऊन मृण्मयीच्या गालावर हात ठेवला आणि म्हणाल्या, "मला माफ कर बाळा. मी फक्त विधी पाहत होते, तुझी 'साथ' नाही."
त्या संध्याकाळी, सुमित आणि मृण्मयी गॅलरीत चहा पीत बसले होते. सुमितने हलकेच विचारलं, "मृण्मयी, सात जन्माचं माहीत नाही, पण या जन्मात माझी साथ कधी सोडणार नाहीस ना?"
मृण्मयीने हसून सुमितच्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि म्हणाली, "उपवास करून देव प्रसन्न होतो की नाही माहीत नाही सुमित, पण तुझ्या चेहऱ्यावरचं हे हसू माझ्यासाठी उपवासाच्या फळापेक्षा खूप मोठं आहे!"
माझ्या मते तरी आजची सावित्री नवऱ्याला यमाच्या दारातून नाही, तर डिप्रेशन आणि अपयशाच्या अंधारातून बाहेर काढते... अन्नाचा त्याग करण्यापेक्षा स्वतःच्या सुखाचा त्याग करून जोडीदाराला मानसिक बळ देणं, हाच आजचा खरा वटसावित्रीचा संदेश आहे.
टीप- मला कुणाच्याही उपवासाबद्दलच्या भावना दूखवायच्या नाही आहे...मी फक्त माझं मतं मांडलं आहे या कथेच्या माध्यमातून...
