Login

साया -19

नील आणि गौरी ची रोमँटिक डेट
येताना काय खाऊन आलीस ग तू? किती घाबरवत आहेस मला आज तू, मी अशाने मरून जाईल ना?"

ती त्याच्याकडे डोळे वटारून पाहू लागले आणि मिश्किल पाणी हसली.
काही वेळाने नीलने तिला हॉस्पिटल दाखवायला सुरुवात केली.

वेगवेगळे विभाग...

ऑपरेशन थिएटर...

आयसीयू...

त्याची केबिन...

सगळं काही ती उत्सुकतेने पाहत होती. तिला नील बद्दल अभिमान वाटत होता.

"म्हणजे हे आहे डॉ. नील यांचं साम्राज्य." ती हसत म्हणाली,

"ही तर सुरुवात आहे."

"मला माहिती आहे."

"कसं?"

"कारण तू कधी थांबणार नाहीस. तुझी ही प्रगती अशीच सुरू राहणार."

नील तिच्याकडे पाहत राहिला.

गौरी त्याला इतरांपेक्षा जास्त समजून घ्यायची. त्याच्या मनातील भावना, शंका आणि काळजी हे तिला बऱ्याचदा न सांगता समजून घ्यायची. कदाचित म्हणूनच ती त्याच्यासाठी इतकी खास होती.

पुढे.......                   

बोलता बोलता वेळ कधी निघून गेले कळलेच नाही. संध्याकाळी ते शहरापासून दूर फिरायला गेले. ज्याठिकाणाहून त्यांना मावळता सूर्य दिसत होता. आकाशात केशरी आणि गुलाबी रंग पसरले होते. हलका वारा वाहत होता.
गौरी नील जवळ उभी राहून दूरवर पसरलेल्या त्या सूर्याचा  नजारा पाहत होती. त्यासोबतच तिथून शहर ही दिसत होते. ती नीलला म्हणाली,
"दुरून शहर खूप सुंदर दिसतंय."

"हो."नील.

"पण तरीही मला गाव जास्त आवडतं."गौरी.

"का?"नील.

"कारण तिथे माणसं अजूनही एकमेकांसाठी वेळ काढतात."

नील तिच्या बाजूला येऊन उभा राहिला.
"आणि शहरात?"

"इथे सगळे धावत असतात. पण कुठे पोहोचायचं आहे हेच त्यातील बहुतेक लोकांना माहिती नसतं."

नील हसला. त्यानंतर काही क्षण दोघेही शांत उभे राहिले.
मग गौरी अचानक म्हणाली,

"नील."
"हम्म?"

"तू आनंदी आहेस ना?"

हा प्रश्न ऐकून नील काही क्षण गप्प झाला."

मग हसत म्हणाला, "आत्ता? यावेळेस मला वाटतं आहे. मी या जगातील सर्वात आनंदी व्यक्ती आहे."

"आणि आधी?"

नीलने दूर क्षितिजाकडे पाहिलं.
"आधी कदाचित मी फक्त काम करत होतो. जगत नव्हतो. आनंदी होतो. पण आजच्या सारखा नाही."

गौरीने त्याच्याकडे पाहिलं. "मग आता जगायला सुरुवात कर. कायम आनंदी रहा."


"हो नक्कीच मी प्रयत्न करेल तू सांगितलेले लक्षात ठेऊन जीवनात प्रत्यक्षात उतरविण्याचा. आणि विसरलो तरीही आता तू आहेना मला आठवण करून द्यायला." नीलने गौरी ला हसत म्हटले.


नील ने तिला गाडीकडे नेले. दोघेही गाडीत बसून निघाले.
काही वेळानंतर नीलची गाडी शहराच्या एका शांत भागात असलेल्या छोट्याशा उपहारगृहासमोर थांबली.

ते उपहारगृह फार आलिशान नव्हतं. एकदम साधेपणा होता त्यामध्ये पण त्यात एक वेगळीच उब होती.

काचेच्या खिडक्या, लाकडी टेबलं, कोपऱ्यात ठेवलेली छोटी झाडं आणि पार्श्वभूमीवर सुरू असलेलं मंद संगीत...

सगळं वातावरण खूप शांत आणि प्रसन्न वाटत होतं.

खिडकीजवळच्या टेबलावर दोघे बसले.

खिडकीबाहेर शहरातील दिव्यांची रोषणाई दिसत होती.

गौरी आजूबाजूला पाहत म्हणाली,

"हे ठिकाण खूप सुंदर आहे."

"मलाही पहिल्यांदा इथे आल्यावर असंच वाटलं होतं."

"तू इथे नेहमी येतोस?"

"नाही."

"मग आज इथे का आणलं?"

नील हलकंसं हसला.

"कारण काही ठिकाणं खास व्यक्तींसोबतच पहिल्यांदा अनुभवायची असतात."

गौरी काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली.

तिच्या चेहऱ्यावर नकळत स्मित उमटलं.

वेटर ऑर्डर घेण्यासाठी आला.

"काय घेणार?" नीलने विचारलं.

"तू सांग."

"हे उत्तर धोकादायक असतं."

"का?"

"कारण नंतर पदार्थ आवडला नाही तर दोष माझा."

"मग ठीक आहे, आजची जबाबदारी तुझी."

"ठीक आहे मग."

काही वेळात त्यांच्या टेबलावर गरमागरम सूप आणि जेवण आलं.

दोघे गप्पा मारत जेवू लागले.


"माहितीय?" गौरी म्हणाली.

"काय?"

"आज हॉस्पिटलमध्ये सगळ्यांच्या चेहऱ्यावरील भाव बघण्यासारखे होते."

नील हसू लागला.

"विशेषतः माझे."

"तुझा चेहरा तर अजूनही माझ्या लक्षात आहे."

"मी खरंच घाबरलो होतो."

"माहितीय."

"आणि तू मात्र मनातल्या मनात हसत होतीस."

"थोडंसं."

"थोडंसं?"

"ठीक आहे, खूप."

दोघे पुन्हा हसू लागले.


काही वेळानंतर त्यांच्या गप्पांचा विषय जुन्या आठवणींकडे वळला.

प्रत्येक आठवणीसोबत एखादं हास्य आणि एखादी गोष्ट जोडलेली होती. दोघेही हातात हात घालून बसले होते आणि डोळ्यामध्ये शब्दांची देवाण घेवाण सुरू होती.

काही क्षण शांतता पसरली.

बाहेर हलका पाऊस सुरू झाला होता.

                                   

पावसाच्या त्या सरींमध्ये, तुझा हात माझ्या हातात,
वेळ थांबून जावी अशी, हीच इच्छा मनात...
काचांवरती थेंब नाचती, स्वर जणू प्रेमाचे,
तुझ्या नजरेत हरवताना, विसरतो जग सारे...
मेणबत्तीच्या त्या उजेडात, चेहरा तुझा खुलतो,
हळूच हसता तू समोर, श्वास माझा थांबतो...
बाहेर पाऊस गुणगुणतो, आत धडधड हृदयाची,
तू सोबत असताना वाटे, सुरुवात नव्या जगाची...


तू आणि मी, ही रात्र आणि पाऊस,
प्रेमाच्या या क्षणांना नसावा कधी विराम खास...
हातात हात, डोळ्यांत स्वप्नांचे गाव,
तुझ्यासोबत प्रत्येक क्षण, जगण्याचं सुंदर नाव...
पावसाच्या त्या सरींमध्ये, प्रेम फुलत राहू दे,
या छोट्याशा जगात आपल्या, फक्त तू आणि मी राहू दे...


पावसाचे थेंब काचेवर आदळत होते.

त्या आवाजामुळे दोघेही भानावर आले. गौरी खिडकीबाहेर पाहत म्हणाली,

"मला पाऊस खूप आवडतो."

"का?"

"मला असं वाटतं तो सगळा थकवा घेऊन जातो ."

नील तिच्याकडे पाहत राहिला.

"आणि तुला?" गौरीने विचारलं.

"मला त्या पावसाळ्यातल्या संध्याकाळी आवडतात."

"का?"

"कारण अशा क्षणांमध्ये वेळ थोडा थांबल्यासारखा वाटतो. मनालाही शांतता मिळते."

गौरीच्या चेहऱ्यावर हलकंसं स्मित उमटलं.

जेवण झाल्यानंतर दोघे उपहारगृहाबाहेर आले. पाऊस अजूनही हलकासा सुरू होता. रस्त्यावर दिव्यांच्या प्रकाशामुळे पाण्याचे थेंब चमकत होते. दोघे हळूहळू चालत गाडीपर्यंत आले.

"आजचा दिवस खूप छान होता." गौरी म्हणाली.

"माझ्यासाठीही."

"आणि हो..."

"काय?"

"पुढच्या वेळी सरप्राईज देण्याची संधी माझी."

नील हसला.

"फक्त यावेळी हॉस्पिटलमध्ये पेशंट बनून येऊ नकोस."

गौरी मोठ्याने हसू लागली.

"वचन देत नाही."

"मग मी आधीच इंजेक्शन तयार ठेवतो."

"डॉ. नील, ही चॅटिंग खूप धोकादायक आहे."

"आणि तू खूप खोडकर आहेस." तो तिच्या हसणाऱ्या चेहऱ्याकडे वेगळ्याच नजरेने पाहत बोलला.


गाडीमध्ये बसण्यापूर्वी गौरी काही क्षण थांबली.

"नील."

"हम्म?"

"कितीही गोंधळ असो... कितीही अडचणी असोत..."

"तरी हसणं विसरू नकोस."

नीलने हलकंसं मान डोलावली.

"प्रयत्न करेन."

"प्रयत्न नाही."

ती हसत म्हणाली.

"वचन."

नीलच्या चेहऱ्यावर स्मित उमटलं.

"ठीक आहे."

"वचन."

आणि त्या क्षणी...

शहराच्या गोंधळात, पावसाच्या हलक्या सरींमध्ये आणि त्या शांत संध्याकाळीत...

नीलला खूप मनापासून शांत आणि प्रसन्न वाटत होतं.
कारण काही माणसं आयुष्यात येतात. ते आपल्या समस्या सोडवत नाहीत...

पण त्या समस्यांशी लढण्याची ताकद मात्र नक्की देतात.

आणि कदाचित...

गौरी त्याच्या आयुष्यात अशीच एक व्यक्ती होती. जी त्याची हिंमत बनली होती.

पावसाच्या त्या हलक्या सरी अजूनही सुरू होत्या.

गौरी गाडीत बसली होती आणि खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाच्या थेंबांकडे पाहत होती.

नील काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला.

"काय झालं?" गौरीने त्याच्याकडे पाहत विचारलं.

"काही नाही."

"मग असे का पाहतो आहेस?"

नील हलकंसं हसला.

"फक्त एक विचार आला."

"कसला?"

"तुला माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाच्या व्यक्तीची भेट घालून द्यायची आहे."

गौरीने भुवया उंचावल्या.

"कोण?"

"आई."

हे ऐकताच गौरी काही क्षण शांत झाली. काही वेळाने ती म्हणाली, "आत्ता? आता नको, असे अचानक आणि मीही फक्त तुला भेटायला आलेली होते. त्यांना कसा मी सामोरे जाऊ."


"हो."

"नको, नाही."

"त्यात काय झालं?"

"पहिली भेट आहे."

"माझ्या आईला तू नक्की आवडशील."

गौरी त्याच्याकडे पाहून हसली "तुला इतका विश्वास आहे?"

"हो मला पूर्ण विश्वास आहे."

आता मात्र तिचा नाईलाज झाला. नील ऐकायलाच तयार नव्हता. तशी तिचीही  इच्छा होती. पण नील ने आईचा विषय काढताच तिच्या मनात भीती निर्माण झाली. आणि छातीत धडधड व्हायला लागले. अचानक ती नर्व्हस झाली.


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →