Login

सख्या रे.... भाग दोन

लग्नाच्या पहिल्याच रात्री आस्थाची स्वप्ने भंगतात

मागील भागात आपण पाहिलं कि आई-वडिलांच्या लाडात वाढलेली आस्था गोडबोले मोठ्या थाटामाटात सासरी येते. मनात नव्या संसाराची असंख्य स्वप्नं, नवऱ्याबद्दल गोड उत्सुकता आणि पहिल्या रात्रीची धाकधूक घेऊन ती आपल्या पतीची वाट पाहत असते.

तिची नणंद रिधिमा तिला चिडवून जाते आणि तिचे गाल लाल होतात. इकडे वेळ मात्र सरतच जाते.रात्रीचे बारा वाजून जातात, तरी तिचा नवरा त्यांच्या खोलीत आलेला नसतो.आता पाहूया पुढे,

तिच्या नवऱ्याची वाट बघत असताना तिच्या मनात असंख्य विचार मनात येऊन जातं होते. तसं त्यांचं अरेंज मॅरेज होतं.त्यात आस्थाचा स्वभावही तसा लाजरा बुजरा होता. त्यामुळे लग्न ठरल्यानंतरही त्या दोघांची फारशी भेट झालीच नाही. खरं तर आजकाल लग्न ठरलं की होणारे नवरा-बायको तासन्‌तास फोनवर बोलतात, एकमेकांना भेटतात, एकमेकांच्या आवडी-निवडी जाणून घेतात... पण आस्था आणि त्याच्या बाबतीत तसं काहीच घडलं नव्हतं.

विशेष म्हणजे, त्यानेही कधी पुढाकार घेतला नव्हता. कधीकधी हा विचार तिच्या मनाला स्पर्श करून जायचा.

"त्यांना माझ्याशी बोलावंसं का वाटलं नसेल...? एकदाही भेटायची इच्छा झाली नसेल का...?"

पण पुढच्याच क्षणी ती स्वतःच त्या विचाराला हसत उत्तर द्यायची.

"कदाचित... माझ्यासारखेच तेही लाजरे व अबोल असतील."

आणि मग काय मनात आलेला तो छोटासा प्रश्न ती तिथल्या तिथे दाबून टाकायची.

खरं तर आजच्या काळात एखाद्या मुलीला आपल्या होणाऱ्या नवऱ्याचं नाव सोडून काहीच माहिती नसणं, ही कल्पनाच करणं कठीण होतं. पण आस्थाच्या आयुष्यात तसंच घडलं होतं.

राधा ने तर तिला कित्येकदा समजावलं होतं.

"आस्था, निदान एकदा तरी त्यांना भेट. दोन शब्द बोल. आयुष्यभराचा निर्णय आहे हा..तुम्हा दोघांना एकत्र आयुष्य काढायचं आहे तर भेटून समजून घ्यायला नको का? एकमेकांचा स्वभाव समजायला हवा ना ग....."

पण प्रत्येक वेळी आस्था फक्त हसून एकच उत्तर द्यायची.

"राधा, तुझी काळजी मला समजते, पण माझे बाबा माझ्यासाठी कधीच चुकीचा निर्णय घेणार नाहीत. त्यांनी ज्यांची निवड केली आहे, ते माझ्यासाठी योग्यच असतील.. मी जर खोलात गेली तर बाबांवर अविश्वास दाखवल्यासारखं होईल ग...."

तिचा तिच्या वडिलांवर इतका नितांत विश्वास होता की, त्यांच्या निर्णयावर तिने कधीच प्रश्नचिन्ह उभं केलं नाही. म्हणूनच तिने स्वतःहून त्यांना भेटण्याचाही प्रयत्न केला नाही. तिला हे सगळं आठवलं आणि आता पहिल्यांदा भेटल्यावर काय काय बोलायचं हे ती मनात ठरवत होती.


पण दिवसभराच्या लगबगीमुळे ती प्रचंड थकली होती. सकाळपासून सुरू असलेल्या लग्नाच्या गडबडीत तिच्या शरीराचा जणू प्रत्येक अवयव थकून गेला होता. त्यात मनातल्या असंख्य विचारांची गर्दी...त्यामुळेच दरवाज्याकडे पाहता पाहता...त्यांची वाट पाहता पाहता...
कधी तिचे डोळे मिटले, हे तिचं तिलाच कळलं नाही.
नकळत तिचा बसल्या जागीच डोळा लागला... थोडा वेळ असाच गेला आणि अचानक दरवाजा जोरात आपटल्याचा आवाज झाला...आणि त्या आवाजाने आस्था दचकून जागी झाली.

तिने घाबरतच समोर पाहिलं.... तर तो होता...तिचा नवरा.

पण त्याला पाहताच तिच्या चेहऱ्यावर उमटलेलं हलकंसं हसू क्षणात विरून गेलं. कारण तो धडपडत चालत आत आला. त्याच्या पावलांचा तोल जातं होता. तो झोकांड्या देत खोलीत शिरताच त्याने रागाच्या भरात दरवाजा इतक्या जोरात आपटून बंद केला की, त्या आवाजाने संपूर्ण खोली हादरून गेली. त्या त्याच्या कृतीने आस्था एकदम घाबरून उभी राहिली.

तसा त्याने एक कटाक्ष तिच्याकडे टाकला.

त्याचे डोळे लालभडक झाले होते. त्याच्या चेहऱ्यावर राग आणि तिरस्कार दोन्हीही स्पष्ट दिसत होते. एक शब्दही न बोलता तो तिच्याकडे चालत आला.

रिधिमाने किती प्रेमाने सजवलेला तो फुलांचा पलंग...गुलाबाच्या पाकळ्या पसरवल्या होत्या तिने आणि मध्ये हार्ट शेप काढला होता. ते पाहून क्षणाचाही विचार न करता त्याने बेडशीट वरील गुलाबाची फुलं मुठीत घेऊन  क्षणात चुरगळून टाकली.

त्याची ती कृती पाहून आस्थाच्या अंगावर अक्षरशः काटा आला.तिला काहीच समजत नव्हतं. नेमकं काय घडत होतं?

ती विचारातच होती कि तो तिच्यासमोर येऊन उभा राहिला. त्याच्या डोळ्यांत रागाची जणू ज्वाला पेटली होती कि आता तो तिला गिळूनच टाकेल.....जवळ येऊन अचानक तो तिच्यावरच ओरडला.

"तुझी हिम्मत कशी झाली इथे माझ्या खोलीत यायची ... माझ्या बेडवर झोपायची? चल निघ इथून... आत्ताच्या आत्ता!"

तो रागाने तिच्याकडे पाहून बोट नाचवत म्हणाला.

त्याच क्षणी त्याच्या तोंडातून येणारा दारूचा तीव्र वास आस्थाच्या नाकात शिरला.

ती पूर्णपणे हादरली. हिंमत करून घाबरलेल्या आवाजात ती कसबस म्हणाली,

"प... पण... मी... मी तुमची... बायको आहे... ना... मग.... मी.......मी इथे.... च..... असणार ना......"

तिच ते बोलणे ऐकून तो उपहासाने हसला.

"बायको...? कुणाची बायको?"

एवढं बोलून त्याचा आवाज अजूनच वाढला..

"एक लक्षात ठेव, तू माझी कुणीच नाहीस! हे लग्न तर माझ्यावर जबरदस्तीने लादलेलं आहे. मला तर..."

ते वाक्य देखील तो पूर्ण करू शकला नाही. इकडे ती विचारातच होती कि क्षणाचाही विचार न करता त्याने तिला जोरात ढकललं. अचानक मारलेल्या त्या धक्क्याने तिचा तोल गेला आणि ती थेट बेडवरून खाली पडली.

ती सावरायच्या आतच तो पुन्हा संतापाने ओरडला,

"निघ माझ्या डोळ्यांसमोरून! मला तुझा चेहराही पाहायचा नाही."

त्याच्या त्या शब्दांनी आस्थाच्या काळजावर जणू कुणीतरी धारदार वार केला होता.क्षणभरापूर्वी ज्या डोळ्यांत संसाराची हजारो स्वप्नं होती...त्याच डोळ्यांत आता फक्त भीती, वेदना आणि असंख्य अनुत्तरित प्रश्न दाटून आले होते.

आस्था पूर्णपणे कोलमडून गेली होती.

काही क्षणांपूर्वी ज्या मनात नव्या संसाराची रंगीत स्वप्नं होती, त्याच मनाचा एका क्षणात चक्काचूर झाला होता.

नेमकं काय घडलं...?

तो तिच्याशी असा का वागला...?

तिचा काय दोष होता...?

या सगळ्या प्रश्नांनी तिचं मन अक्षरशः घेरून टाकलं होतं.

तिला काहीच समजत नव्हतं.

लग्नाच्या पहिल्याच दिवशी तिचा नवरा दारू पिऊन घरी येतो काय ?

आल्या-आल्या आपल्या पत्नीशी इतक्या तिरस्काराने वागतो..काय .?

"ही माझी बेडरूम आहे ... असं का म्हणाला तो?

लग्नानंतर ती बेडरूम दोघांची नसते का?

आणि...

"हे लग्न माझ्यावर जबरदस्तीने लादलं गेलं..."

त्याच्या त्या शब्दांनी तिच्या मनात हजारो प्रश्न निर्माण केले होते.

"आमचं लग्न तर दोन्ही घरच्यांच्या संमतीने झालं... मग हे जबरदस्तीचं लग्न कसं...? जर त्यांना हे लग्न मान्य नव्हतं, तर त्यांनी आधीच नकार का दिला नाही...? मग माझ्या आयुष्याशी असा खेळ का केला...?त्यांना मी आवडली नव्हती का???"

तिच्या मनात प्रश्नच प्रश्न होते...पण उत्तर देणारं कुणीच नव्हतं.

पण अचानक तिच्या हाताला तिला एक तीव्र वेदना जाणवली.

"आई गं..."

नकळत तिच्या तोंडून हुंदका बाहेर पडला. तिने घाईघाईने हाताकडे पाहिलं.

त्याने तिला जोरात ढकलल्यामुळे हातातील काचेच्या बांगड्या फुटल्या होत्या. त्यांच्या धारदार तुकड्यांनी तिच्या मनगटात खोलवर रुतून जखम केली होती.

त्या जखमेतून लालभडक रक्त हळूहळू बाहेर येत होतं.

क्षणभर ती त्या रक्ताकडे नुसतीच पाहत राहिली.

जणू तिच्या हातातून रक्त नव्हे...तर तिची सगळी स्वप्नंच वाहून जात होती.

तिच्या डोळ्यांतून अश्रूंचा बांध फुटला.

आजवर तिच्या डोळ्यात पाणी येऊ नये म्हणून तिचे आई-वडील, तिचे दोन्ही भाऊ... सगळ्यांनी तिला फुलासारखं जपलं होतं.

तिच्या चेहऱ्यावरचं हास्य कायम राहावं म्हणून त्यांनी स्वतःची प्रत्येक इच्छा बाजूला ठेवली होती.

पण आज...

लग्नाच्या पहिल्याच रात्री तिच्या नशिबाने तिला अशा वेदनेसमोर उभं केलं होतं, ज्याची तिने कधी स्वप्नातही कल्पना केली नव्हती.

तिने हळूच नजरा वर केल्या.

समोर बेडवर तो निर्धास्त पालथा पडून झोपला होता.

जणू काही घडलंच नव्हतं...

आणि इथे...आस्था मात्र भिंतीला टेकून खाली बसली होती.

एका हाताने ती जखमेतून वाहणारं रक्त दुपट्ट्याने दाबून धरत होती...

आणि दुसऱ्या हाताने आपल्या ओठांवर हात ठेवून हुंदके दाबण्याचा निष्फळ प्रयत्न करत होती.

रात्र सरत होती...

पण तिच्या डोळ्यांतली झोप कायमची हरवून गेली होती.

एवढ्या लाडात वाढलेल्या मुलीच्या आयुष्यात हे कोणतं वादळ येऊन धडकलेलं होतं?

या अंधारातून आस्था स्वतःला बाहेर काढू शकेल का?

आणि...

महत्वाचं म्हणजे तिचा नवरा तिच्याशी इतका तिरस्काराने का वागत होता?

क्रमश
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →