Login

संसाराचा नवा अध्याय भाग १

संसाराचा नवा अध्याय भाग १
संसाराचा नवा अध्याय..

भाग १

" शर्वरी, अगं चहा मिळेल का ? आणि जरा इस्त्रीचे कपडे कपाटात लावून ठेव. उद्या सकाळी मला लवकर मिटींगला निघायचंय." आदित्यने सोफ्यावर पाय पसरून बसत आरामात फर्मान सोडलं.

शर्वरी लॅपटॉपवर आपली नजर खिळवून टायपिंग करत होती. तिने मान वर न करताच उत्तर दिलं,

" आदित्य, माझं आजचं शेवटचं सबमिशन आहे. पाच मिनिटं थांबशील का? चहाचं पाणी उकळायला ठेवलंय, तू फक्त त्यात दूध टाकून घे ना प्लीज."

आदित्यच्या कपाळावर आठ्या पडल्या. तो ताडकन उठून किचनच्या दारात उभा राहिला.

" शर्वरी, हे काय लावलंय ? पाच मिनिटं... पाच मिनिटं... घरात आल्यावर माणसाला शांतता हवी असते. माझ्या आईने कधी बाबांना असं सांगितलं नाही. बाबा ऑफिसमधून आले की चहाचा कप त्यांच्या हातात असायचा. तू नोकरी करतेस म्हणजे घराकडे दुर्लक्ष करायचं का ? "

शर्वरीने लॅपटॉप बंद केला आणि ती शांतपणे आदित्यसमोर उभी राहिली. तिचा आवाज शांत पण खंबीर होता.

" आदित्य, तुझ्या आईने नोकरी केली नव्हती. त्यांचं पूर्ण विश्व हे घर होतं. मी नऊ तास ऑफिस करून आल्यावर जर थोडी मदत मागितली, तर त्यात आईचा अपमान कुठे येतो ? आपण दोघंही कमावतो, मग घराची जबाबदारी फक्त माझीच का ?"

" कारण तू या घरची सून आहेस! आणि सून कशी असावी हे माझ्या वडिलांनी मला शिकवलंय. स्त्रीने सोसावं आणि पुरुषाने घर चालवावं, हाच संसाराचा नियम आहे." आदित्य रागाने ओरडला. तो बेडरूमचा दरवाजा जोरात आपटून निघून गेला.

शर्वरी तिथेच उभी राहिली. तिला आठवली तिची आई.. जिने आयुष्यभर वडिलांच्या अशाच रागीट स्वभावापुढे मान झुकवली. आई म्हणायची,

"पोरी, संसारासाठी थोडं मरावं लागतं." पण शर्वरीला मरायचं नव्हतं, तिला जगायचं होतं.

त्याच रात्री शर्वरीला ऑफिसचा एक मेल आला. तिला तिच्या एका मोठ्या प्रोजेक्टसाठी सहा महिन्यांकरिता लंडनला जाण्याची संधी मिळाली होती. तिने क्षणभर विचार केला. हा केवळ प्रोजेक्ट नव्हता, तर त्या दोघांच्या नात्याला, खास करून आदित्यला आणि स्वतःला एक संधी देण्याची वेळ होती.

दुसऱ्या दिवशी सकाळी घर शांत होतं. शर्वरी शांत झाली होती. पुढचे दोन आठवडे तिने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आदित्य देखील त्याचा अहंकार सुखावला होता म्हणून गप्प होता. पंधरा दिवसांनंतर एक दिवस सकाळी,
आदित्य उठला तेव्हा त्याला वाटलं की शर्वरी चहा घेऊन येईल. पण किचनमध्ये कोणीच नव्हतं. त्याने हॉलमध्ये जाऊन पाहिलं, तर तिथे शर्वरीची मोठी बॅग तयार होती.

" हे काय आहे ? कुठे जातेयस तू ?" आदित्यने आश्चर्याने विचारलं.

शर्वरीने शांतपणे पर्स खांद्याला लावली.

" मी माझ्या एका प्रोजेक्टसाठी सहा महिने बाहेर जातेय. तुला हवी तशी शांती आता या घरात असेल. मी माझ्या आई-वडिलांना आणि तुझ्या आईला कल्पना दिली आहे. पण मी कुठे आहे, हे तुला आता कळणार नाही."

" काय ? तू मला न विचारता इतका मोठा निर्णय घेतलास ? तू घर सोडून पळून जातेयस ?" आदित्यचा अहंकार दुखावला गेला होता.

" मी पळून जात नाहीये आदित्य, मी स्वतःला शोधायला जातेय. तुला जर तुझ्या वडिलांसारखा संसार हवा असेल, तर तो तुला या रिकाम्या घरात नक्कीच सापडेल. पण तुला जर शर्वरी हवी असेल, तर तुला स्वतःला बदलावं लागेल." असं म्हणून शर्वरीने घराचा उंबरठा ओलांडला.
आदित्य मागे उभा राहून ओरडत राहिला,

"शर्वरी! हे बघ, हे अजिबात बरोबर नाहीये. तू परत ये!"

पण शर्वरीने मागे वळून पाहिलं नाही. तिने सरळ एअरपोर्टची वाट धरली. तिने सासूबाईंना फोन केला,

" आई, मी निघतेय. माझी विनंती लक्षात आहे ना , प्लीज आदित्यला काहीही सांगू नका. त्याला वाटू दे की मी कायमची गेलेय. त्याला बायकोच्या अस्तित्वाची किंमत कळू दे."

आदित्य घरात एकटाच उरला होता. तो ज्या सत्ता आणि अहंकाराच्या गोष्टी करत होता, ते सगळं तिथे होतं, पण त्याच्या आयुष्यातील चैतन्य मात्र उडून गेलं होतं. घर त्याला खायला उठत होतं. दोन दिवस झाले, चार दिवस झाले, शर्वरीचा फोन आला नाही. त्याने तिच्या आई-वडिलांना फोन केला, पण त्यांनीही

"आम्हाला काही माहीत नाही" असं उत्तर देऊन फोन ठेवला.

आदित्यला पहिल्यांदाच जाणवलं की ज्याला तो संसार म्हणत होता, तो शर्वरीच्या अस्तित्वामुळे टिकून होता. आता सुरू होणार होता त्याच्या आंतरिक संघर्षाचा प्रवास.

© ® वेदा

क्रमशः...


0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →