व्यासांच्या मानसकन्या भाग ३२
कर्तव्य परायण कुंती
कुंतीच्या व्यक्तिमत्त्वाचा जितका विचार करावा तितके तिच्या व्यक्तिमत्त्वाचे अनेक कंगोरे आणि पापुद्रे हळूहळू तिच्याविषयीची एक नवीनच ओळख प्रत्येक वेळी आपल्याला करून देतात.
कर्ण हा कुंतीचा कुवारपणातला मुलगा, कुंतीभोजाच्या घरी कुंतीने त्याला स्वीकारणं शक्यच नव्हतं म्हणून जन्मताच तिने त्याला जलप्रवाहित केलं. म्हणून आपल्याला कुंतीचा राग यावा तर लगेच तिने ऋषी दुर्वासांची सेवा करून मिळवलेला मंत्र माद्रीला संतान प्राप्तीसाठी दिला. एवढेच नव्हे तर माद्रीने पांडू बरोबर सहगमन केल्यानंतर तिने माद्रीच्या मुलांना अतिशय प्रेमाने वागवले. महाभारतात तर असा स्पष्ट उल्लेख आहे की कुंतीचे सहदेवावर विशेष प्रेम होते. कुंतीला वाटले असते तर तिने केवळ तिच्याच तीन मुलांचा द्रौपदीशी विवाह केला असता पण कुंतीने तसे अजिबात न करता तिच्या पाचही मुलांचा द्रौपदीशी विवाह लावून दिला. जणू द्रौपदीशी पाचांचा विवाह करून तिने पांडवांचा न फुटणारा एक संधपणा सांधला.
माद्रीमुळे नवऱ्याच्या मृत्यू झाला या घटनेने बेभान झालेली कुंती माद्रीला दोष देऊन तिचे वाभाडे काढते. पण त्याचवेळी ती द्रौपदीला पाचांची पत्नी बनवते. परत एकदा आपल्याला कुंतीचा राग येतो की तिने द्रौपदीच्या मनाचा विचार का केला नाही? आणि कुंती तिच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखीन एक पैलू कृष्णाशी बोलताना उलगडते. ती स्पष्टपणे द्रौपदीला निरोप पाठवते की तू एका उच्च घराण्यातली राजकन्या असून तशाच उच्च कुळातील सून आहेस स्वतःचा अपमान विसरू नकोस!
कुंतीचं व्यक्तिमत्व इतकं गुंतागुंतीचा आहे की एखाद्या घटनेबद्दल आपण तिला दोष देतो पण त्या घटनेच्या अगदी विपरीत ती दुसऱ्या क्षणी वागते. तिचं व्यक्तिमत्व इतकं गुंतागुंतीच होण्यासाठी तिच्या आयुष्यातल्या व्यक्ती आणि घटनाही तेवढ्याच जबाबदार आहेत. कर्णाला टाकून देण्यामागे ही कुंतीच्या व्यक्तिमत्त्वाचा आणखीन एक पैलू आपल्यासमोर येतो तो म्हणजे केवळ आई-वडिलांच्या आग्रहाखातर मनाविरुद्ध कुंती तिच्या दत्तक बापाकडे गेली होती. पण मनापासून तिने कुंतीभोजाचा वडील म्हणून स्वीकार केला नसावा. जर तसं नसतं तर त्या काळात कुंतीने स्वतःला झालेलं मुल कुंतीभोजापासून लपवलं नसतं.
परत एकदा कुंतीचा विचार केला की महाभारतातल्या इतर राजस्त्रीयांपेक्षा ती खूपच वेगळी होती याचा पदोपदी प्रत्यय येतो. सत्यवतीलाही ऋषी पराशरांपासून कृष्णद्वयपायन झाले होते. पण आपल्या मुलावर ऋषींचे संस्कार व्हावे म्हणून पराशर महर्षी व्यासांना स्वतःबरोबर घेऊन गेले. त्यानंतर सत्यवतीच्या आयुष्यात राजा शंतनू आला. यावेळी मात्र सत्यवती जुन्या अनुभवाने शहाणी झाली होती आणि तिने स्वतःच आणि स्वतःच्या मुलांंचं आयुष्य सुरक्षित केलं. अंबेने तर उघड उघडच भीष्मांचा धिक्कार केला. त्यांना प्रेमाने, विनवणीने आणि शेवटी चिथावणीने स्वतःचा स्वीकार करावा याकरिता परोपरी विनंती केली आणि ती साध्य झाली नाही म्हणून ती भीष्मांच्या नाशा करण्यासाठी तपश्चर्येकरीता निघून गेली. गांधारीला तर धृतराष्ट्राच्या अंध असण्याचा इतका धक्का बसला की तिने रागा रागात डोळ्यांवर पट्टीच बांधून घेतली.
पण कुंती??
ती कधीही तिच्या मनातली कुठलीच भावना, कुठलाही विचार कुणाजवळही बोलून दाखवत नाही. ती फक्त कृती प्रवीण आहे. आपल्या पाच मुलांवर जीवापाड प्रेम करणारी कुंती कर्णाच्या बाबतीत इतकी उदासीन का होती हा प्रश्न तरीही शेवटी राहतोच!
कृष्णाची राजशिष्टाई फसल्यानंतर युद्धाच्या एक दिवस आधी कुंती कर्णाला भेटायला जाते. त्याला त्याचं जन्मरहस्य सांगते. कदाचित तिला वेडी आशा असेल की स्वतःचे जन्म रहस्य जाणून कर्ण या युद्धातून माघार घेईल आणि मग महाभारताचे युद्ध होणारच नाही. म्हणजे कुठलीही जीवितहानी न होता, तिला तिच्या मुलांकरिता राज्य मिळेल. कदाचित कर्णही तिच्या बाजूला वळेल. पण प्रत्यक्षात तसं झालंच नाही.
कर्णाने कुंतीला तिच्याच कठोर शब्दात फटकारले. त्याला प्रवाह पतीत केल्यामुळे, त्याच्या मनात जन्मदात्री विषयी असणारा राग अगदी स्वाभाविक होता. कर्ण तिला म्हणतो, “तू तर क्षत्रिय राजकन्या होतीस. आणि तू जगातली पहिली स्त्री नव्हतीस की जीला विवाहपूर्वी मुल झालं होतं. मला नदीत सोडून देताना तुला , माझ्या बद्दल करुणा वाटली नाही आणि आता माझे जन्म रहस्य सांगून तुला काय साध्य करायचं आहे? तुझ्यासारखी स्वार्थी बाई मी आत्तापर्यंत बघितली नाही. शस्त्र स्पर्धेच्या वेळी तू मुग गिळून गप्प बसलीस! पदोपदी माझा सूतपुत्र म्हणून अपमान झाला त्यावेळी तुला केवळ तुझे पाचपुत्र दिसत होते. उभ्या आयुष्यात तू एकदा तरी माझा विचार केलास का? एकदा तरी तुझा पान्हा माझ्यासाठी भरून आला का? एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या अप्पलपोटेपणाला मी भीक घालणार नाही! धृतराष्ट्र पुत्रांनी मला इहलोकात सर्व काही दिले आहे. मी त्यांना सोडणे आता शक्य नाही! तुझ्या पोटी जन्माला येऊनही, माझ्यावर क्षत्रियाचे संस्कार झालेच नाहीत. यापेक्षा जास्त माझ्या आयुष्यात आणखीन काय वाईट होऊ शकतं?”
कर्णाचे फटकारे आणि प्रश्न अगदी बिनतोड होते. कुंती काहीही बोलत नव्हती पण तिच्या नेत्रांना अश्रूंची धार लागली होती. शेवटी आपल्या या हतबल मातेवर कर्णानेच दया दाखवली. त्याने कुंतीला वचन दिलं की, पाचांची माता हा समाजात तुझा जो लौकिक आहे तो तसाच राहील. मी युद्धात अर्जुनाशिवाय कुणालाही मारणार नाही. मी मेलो तर पाच आहेतच! नाहीतर मी धरून पाच राहतील.”
युद्धाच्या एक दिवस आधी कुंती कर्णाला जाऊन भेटते. त्याला त्याचं जन्म रहस्य सांगते. जणू एक प्रकारे ती कर्णाचे मनोधैर्य डळमळीत करते. कर्ण बांधवांकडे आला तर ठीकच पण जर तसं झालं नाही तर मनाने खचलेला योद्धा कधीही शूरपणाने युद्ध करून स्वतःच्या भावांचा वध करणार नाही याची जणू खात्रीच कुंतीला होती. कुंतीचं व्यक्तीमत्व हे हस्तीनापुरच्या राजकारणातला परिपाक असल्यासारखा वाटतं. तिने केवळ आई म्हणून मुलांवर डोळस संस्कार केले नाही तर राजकारणाच्या पटाच्या पडद्यामागे उभी राहून तिने स्वतःच्या आयुष्यातल्या प्रत्येक घटनेचा योग्य वेळी योग्य असा वापर करून घेतला.
कर्णाचे जन्म रहस्य त्याला सांगून तिने स्वतःच्या मनातल्या दुःखाला वाट करून दिली होती. तिच्यातल्या मातेने तिला युद्धापूर्वी नक्कीच फटकारले असेल. कर्णाने तिच्या बाजूला येण्यास नकार दिल्यानंतर एक प्रश्न निर्माण होतोच. कुंती कर्णाचे जन्म रहस्य घेऊन पितामह भीष्मांकडे का गेली नाही? कदाचित तिला वाटलं असेल की, पितामहांना कर्णाचं खरं अस्तित्व कळलं तर ते कर्णालाच राजा बनवतील, पण कर्णाची दुर्योधन विषयीची निष्ठा कुंतीला त्याच्या निग्रहवरून दिसून आली होती. शेवटी तिचं ध्येय साध्य झालंच नसतं. कर्णाने स्वतःचा राजमुकुट आणि सम्राटपद अगदी स्वखुशीने दुर्योधनाला देऊन दिलं असतं. आणि कुंतीला तसं व्हायला नको होतं.
दुसरी गोष्ट शस्त्र स्पर्धेच्या वेळीही कुंती कर्णाचं जन्म रहस्य सांगू शकत होती. सत्यवतीने नाही का भीष्माला व्यासांबद्दल सांगितलं होतं! पण…
सत्यवतीची परिस्थिती वेगळी होती. तिने व्यासांचं जन्मरहस्य तिच्या सख्ख्या मुलांना किंवा पतीला सांगितलं नव्हतं तर सावत्र मुलाला सांगितलं होतं आणि तीही कुरूंचा राजवंश पुढे चालवण्यासाठी! आणि त्यावेळी सत्यवती हस्तीनापूरची राजमाता होती. अधिकार आणि वयानेही ती मोठी होती.
शस्त्र स्पर्धेच्या वेळी कुंतीने कर्णाचं रहस्य सांगितलं असतं तर युधिष्ठिराचा राजसिंहासनावरचा अधिकार नष्ट झाला असता. धृतराष्ट्र, शकुनी आणि दुर्योधनाच्या ते पथ्यावरच पडलं असतं! म्हणजे कर्णाचं जन्म रहस्य शेवटपर्यंत कुंतीसाठी एक अवघड जागेची जखम बनवून राहिलं होतं.
कर्णाच्या जन्माचे रहस्य सांगून कुंतीने भलेही त्याला समाजात मान्यता दिली असती पण तरीही समाजाने आणि राजकुलाने तिचा धिक्कारच केला असता. दुसरी महत्त्वाची गोष्ट की ती हस्तीनापुरची स्नुषा होती. नियोगाने का होईना पण पांडूंची मुलं राजा सिंहासनाची वारस होती. त्यामुळे ज्या राजाने अर्थात पांडूने तिला कुरुवंशाची महाराणी बनवलं होतं, त्याच्याच इच्छेने तिला मातृत्व मिळालं होतं. त्या सगळ्या गोष्टींचा त्याग करून केवळ कर्णाचं जन्म रहस्य सांगणं कुंतीला शक्यच नव्हतं. कितीही नाही म्हटलं तरीही ती एक कर्तव्यपरायण, पतीनिष्ठ, क्षत्रिय स्त्री होती! कर्णासाठी ती युधिष्ठरावर अन्याय करू शकत नव्हती. आणि युधिष्ठीरावर अन्याय म्हणजे बाकीच्या चार जणांच्या आयुष्याची होळी. कुंतीने सरळ सरळ पांडूच्या संततीला मातृत्वाचं आणि राजकारणाचं रक्षण दिलं असंच म्हणता येईल.
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
