Login

विसंगती भाग १

Divorce And Stress
विषय - घटस्फोटानंतर काय?

शीर्षक - *विसंगती* (भाग १)

आजही संध्याकाळी ऑफिसातून परत आल्यावर श्वेताची नजर आपसूकच समोरच्या बाल्कनीत गेली. ती नवव्या मजल्यावर आणि समोरच्या ब्लॉकचा आठवा मजला समोरच दिसायचा. त्या बाल्कनीत तो सुंदर सा पांढरा टॉप आणि त्याच्या बाजूला बाहेर टाकलेली जीन्स पॅन्ट तशीच होती . इतकच काय, गेले आठ दिवस ती पहात असलेले ते भारी चे स्लीप वेअर तसेच वाळत टाकलेले होते. गेल्या रविवार पासून ती रोज त्या बाल्कनीत न चुकता पहात होती. आज तर इथूनही कळत होतं की बाल्कनीत धूळ साचली आहे. इतके दिवस तग धरून असलेली कुंडीतली चार-पाच झाडं आज मात्र मान टाकत होती. तिला माहीत होतं की ते घर गेल्या आठ-नऊ दिवसात उघडलं गेलं नाही, तो बाल्कनीचा काचेचा स्लाइडिंग दरवाजा सुद्धा बंदच आहे तर वाळलेले कपडे कोण काढणार किंवा झाडाला पाणी कोण घालणार?

चहाचा कप घेऊन आपल्या बाल्कनीत बसली पण त्या समोरच्या बाल्कनीत पाहून त्याच त्याच गोष्टीचा पुन्हा विचार करण्याची सवय जणू तिला आठवड्याभरात जडली होती.

आज सोमवार ना, मग अगदी मागच्या शनिवारी म्हणजे नऊ दिवसांपूर्वीची गोष्ट आहे. ती ऑफिसातून येऊन आपल्या कामात गुंग होती. संध्याकाळी सहा वाजता आल्या आल्या कामवालीने सांगितलं," मॅडम, तुम्हाला कळालं का समोरच्या ब्लॉक मध्ये दुपारी एक बाई मेली"

" अगं पुष्पा काय सांगतेस? हो का बाई काय झालं ?"

" अहो, मेली म्हणजे गळफास घेऊन गेली ?"

" अगं काही काय सांगतेस आम्हाला तर काहीच कळालं नाही, इतक्या उच्चभ्रू सोसायटीत असे प्रकार? एक सांग काय वय होतं?"

" अहो वय काय? तरुण पोरगी होती 25 वर्षांची वगैरे असेल, लग्न होऊन दोनच वर्षे झाले होते म्हणे , लेकरू बाळ नव्हतं आणि आता दोन महिन्याखालीच सोसायटीत रहायला आले होते."
पुष्पाने एक दमात सगळी बित्तंबातमी दिली आणि पुढचे प्रश्न वाचवले.

" घरात तर ? म्हणजे घरात कोणीच नव्हतं का त्यावेळी? हिने गळफास लावेपर्यंत कुणी कसं पाहिलं नाही? कळलं कसं?"
पुष्पा निवांत खालीच बसली.

" मॅडम, त्या घरी काम करणारी मदतनीस माझी मैत्रीण आहे, तिने मला आता सांगितलं."

" तिला कसं कळालं ?"

"अहो त्याचं काय झालं. रोजच्याप्रमाणे ती सकाळी काम करायला गेली. समोरचं दार उघडच होतं. तिने किचन मध्ये भांडे घासले. मग किचन आणि हॉल झाडून घेतला . बेडरूमचं दार लोटलेलं होतं, तिने त्याला ढकलला तर काय? समोर ती पंख्याला लटकलेली होती. माझ्या मैत्रिणीच्या तर पायाखाली जमीन सरकली .मग तिने घाबरून बिल्डिंगच्या सेक्युरिटी गार्डला, हाउसकीपिंग हेडला त्यांना बोलावून दाखवलं.

"ती एकटीच राहत होती की काय ?" श्वेताने पुन्हा विचारलं.

"नाही नवरा बायको दोघं राहायची, मूलबाळ काही नाही बहुतेक , नवरा ऑफिसच्या कामाने काहीतरी बाहेर गेलेला आहे, दोन दिवसापासून तो घरी नव्हता. अहो ते जाऊ द्या त्या माझ्या कामाला गेलेल्या मैत्रिणीला आता संध्याकाळपर्यंत पोलिसांनी स्टेशनमधे बसून ठेवलं होतं. आता येताना भेटली तर मला तिने सगळं सांगितलं ."

" इतकं सगळं इथे? आज दुपारी झालं? पुलिस सोसायटीत आले आणि आम्हाला काहीच कळालं नाही. मी तर नव्हते घरी पण हे होते ना घरी!"

मग तिने नवऱ्याला विचारलं ," अहो दुपारी समोरच्या ब्लॉक मधे एक बाई आय मीन मुलगी मेली म्हणे . . म्हणजे आत्महत्या केली म्हणे!"

"बापरे ! तुला कुणी सांगितलं?" तो हादरलाच.

" हे काय पुष्पा आली आता तर तीच सांगत होती."

पुष्पाने विचारलं ,"साहेब तुम्हाला दुपारी काही आवाज वगैरे नाही आला का?"

" हा, मी वर्क फ्रॉम होम असताना , दार लावून बसतो, मी माझ्या कॉल वर होतो पण थोडा आरडाओरडा किंवा रडलेला आवाज आला . पण दुपारी कुणाच्या घरी लहान मुलं असतं, कुणाच्या घरी काही ! दुर्लक्ष केलं. शिवाय इथे रस्त्यावरचा पण गोंधळ ऐकू येतो खूपदा. मला तसंच वाटलं."

" नाही साहेब, ती बाई मेली ना तिची आई आणि भाऊ आले होते, ते खूप रडत होते म्हणे, नवऱ्याला पण तिकडून ड्यूटी वरून परत बोलावून घेतलं म्हणे!"

" अग पण मरायला झालं काय ? कळलं का?" श्वेताला हे उमजत नव्हतं.

" माहित नाही. फोनवर काहीतरी भांडण झालं असेल नवरा बायको मधे, असे म्हणतात सगळेजण!" पुष्पा अंदाज लावत होती.

" मला तर कळत नाही, इतक्या हायफाय सोसायटीत राहणाऱ्या लोकांना काय प्रॉब्लेम असतील?"

तिचा नवरा सोहन म्हणाला," अगं श्वेता, मरण्यासाठी पैशाचा काही संबंध नसतो . झाली असेल वादावादी दोघांमध्ये. . सोड ना!"

"अहो पण म्हणून जीव द्यायचा? म्हणून असं मरून जायचं ?" श्वेता खूप धक्क्यात होती.

"हे बघ, आता ते आपण नाही ठरवू शकत ना! काढ बरं तो विषय डोक्यातून. ती मेली गेली. . आपल्या काय नात्याची की गोताची?"

क्रमशः

लेखिका - स्वाती बालूरकर, सखी
0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →