लघुकथा लेखन स्पर्धा मे-जून 2026
विषय ऐतिहासिक कथा
रणचंडी ताराराणी
संपूर्ण भारत स्वतःच्या अंमलाखाली आणण्यासाठी औरंगजेब दक्षिणेत आला होता. सात लाखांची फौज, दमदमी उभा करणारा फतेउल्लाह खान, शेरदाहान, बेमुर्वत यासारख्या प्रचंड आणि भेदक मारक क्षमता असणाऱ्या, तोफांचा तोफखाना प्रमुख तरबीयत खान त्याच्या सैन्यात होता. पण त्याचं हे स्वप्न कधीही पूर्ण झालं नाही. शिवाजी महाराजांची स्नुषा आणि सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्येनं महाराणी ताराराणीनं त्याचा मुडदा या मराठी भूमीतच गाडला.
१६८० मध्ये शिवाजी महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाला दख्खन विजयाचं स्वप्न सोपं वाटत होतं. त्यातच त्यानं १६८६ मध्ये विजापूरची आदिलशाही संपवली, १६८९ मध्ये गोवळकोंड्याची कुतुबशाही स्वतःच्या घशात घातली. आणि आता राहिले होते फक्त मराठे.
पण मराठ्यांचा छावा छत्रपती संभाजी महाराज औरंगजेबाशीची झुंजले, पण छळ आणि कपटानं, औरंगजेबाने त्यांना मारलं आणि मग मराठा जास्तच पेटून उठला आणि राजाराम महाराजांच्या नेतृत्वात शेवटपर्यंत लढत राहिला. पण सन १७०० साली राजाराम महाराजही गेले.
बघता बघता आपण मराठ्यांना चिरडून टाकू आणि अखंड हिंदुस्तानचा आपण स्वामी होऊ असं दिवा स्वप्न बादशाह औरंगजेबाला आता खरं वाटू लागलं. आता राजाच उरला नाही तर मराठे लढतील कोणाच्या नेतृत्वात आणि स्वराज्य रक्षण करतील तरी कुणासाठी अशी परिस्थिती जेव्हा निर्माण झाली तेव्हा संतप्त मराठा जागा झाला, युद्धाच्या मैदानात उभी राहिली राजारामाची पत्नी, शिवाजी महाराजांची सून, रणचंडी ताराराणी!
कवी देवव्रत त्यांचं वर्णन करतात.
दिल्ली झाली दिनवाणी
दिल्लीशाहाचे गेले पाणी
ताराबाई रामराणी
भद्रकाली कोपली
दिल्लीशाहाचे गेले पाणी
ताराबाई रामराणी
भद्रकाली कोपली
स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांची सून असलेल्या ताराराणींना जरी वयाच्या 25 व्या वर्षी वैधव्य आलं तरी त्यांनी औरंगजेबाला आपल्या तलवारीचे पाणी पाजलं. आपल्या चार वर्षांच्या मुलाला, ‘दुसऱ्या शिवाजीला’ त्यांनी गादीवर बसवलं आणि राज्यकारभार हाती घेतला.
सेनापती धनाजी जाधव, नेमाजी शिंदे, कान्होजी आंग्रे, शंकराजी नारायण, रामचंद्रपंत अमात्य या स्वराज्याच्या शिलेदारांना सोबत घेऊन पुढच्या लढाईची त्यांनी तयारी केली.
सरसेनापती हंबीरराव मोहित्यांनी लहानपणीच ताराराणींना युद्ध कला, घोडेस्वारी, तलवारी बाजी, गनिमाला ओळखून योग्य वेळी करायची छापेमारी-युद्धनीतीचं शिक्षण दिलं होतं. लहान तारा राणीचे बालपणीचे खेळ म्हणजे, तलवारबाजी, भालाफेक, दानपट्टा आणि तिचा वेश तरी कसा? सुरुवार, अंगरखा, आणि बाराबंदी. वडिलांनी दिलेलं तेच बाळकडू पुढे ताराराणीच्या कामी आलं.
औरंगजेबाचा सैन्य मैदानी होतं. लाखांच्या सैन्यात मराठ्यांच्या सैन्यासारखी चपळाई नव्हती आणि त्यात गाठ होती सह्याद्रीशी! याच गोष्टींचा ताराराणींनी उपयोग करून घेतला. मती कुंठीत करणारा वेग आणि अक्कल गुंग करणारी चपळाई हेच मराठ्यांचं बळ आणि हीच गनिमी काव्याची युद्धनीती!
ताराराणींनी या काळी जी युद्धनीती अवलंबिली आहे तिला तोड नाही. तीने स्वराज्यातल्या समस्त किल्लेदारांना आदेश दिले होते की कुठलाही गड सहा, आठ महिने झुंजवायचा. पावसाळ्याच्या तोंडी तो औरंगजेबाला विकायचा. पावसाळ्याच्या दिवसात शेती करायची, आणि मग औरंगजेबानं किल्ल्याची व्यवस्था लावली की, किल्ल्याच्या चोर वाटांनी, गनिमीकावा अनुसरून गड परत ताब्यात घ्यायचा.
ताराराणी विशाळगडावरून कारभार बघत होत्या म्हणून औरंगजेबांने आपले मोर्चे विशाळगडी लावले. गर्द जंगल, ऊन , वारा, आणि विशाल असा सह्याद्री, त्यातच मराठ्यांच्या कधीही पडणाऱ्या धाडी यामुळे औरंगजेब विशाळगडावर पोहोचेपर्यंत ताराराणी प्रतापगडी पोहोचल्या देखील.
सहा महिने औरंगजेब विशाल गडाला वेढा मारून बसला पण काहीच उपयोग झाला नाही. विशाल गडाला जेव्हा औरंगजेबाने मोर्चे लावले होते तेव्हा ताराराणी स्वतः हातात तलवार घेऊन औरंगजेबाच्या सैन्यावर तुटून पडली. आणि त्यांचा वेश तरी कसा? मावळ्यांचा पुरुषी वेश नव्हे तर, नऊवार पातळ, एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात परशू घेऊन ती मुघल सैन्यावर तुटून पडली. तलवार चालवण्याची ताराराणींची तऱ्हा तरी किती वेगळी! तलवारीचं पातं मधोमध हातात घेऊन तलवारीच्या मुठीन ती गनिमावर निर्ममपणे आघात करत होती आणि आपल्या सैनिकांना आदेश देत होती.
“हर हर महादेव! कापा, तोडा, मूडदे पाडा, हाती शस्त्र असणाऱ्या गनिमाला सोडू नका. त्यांची लांडगे तोड करा!”
मराठा सैन्यामुळे घाबरलेला जुल्फिखार साक्षात ताराराणींना बघून भीतीने चळाचळा कापला, आणि तारा राणीचा पराक्रम त्याने औरंगजेबाला सांगीतला. बादशहाचा सुरुवातीला या गोष्टीवर विश्वास बसलि नाही. पण जेव्हा त्याने साक्षात तारा राणीला बघीतलं तेव्हा मात्र तो भयाने वेडा पिसा झाला.
ताराराणींच्या आदेशानुसार पावसाळ्याच्या सुरुवातीला मराठे औरंगजेबाशी तहाच्या वाटाघाटी करतात, आणि दोन लाख रुपयांच्या बदली विशाळगड औरंगजेबाला देतात. विशाळ गडावरून परतत असताना औरंगजेबाची अक्षरशः दैना होते. सह्याद्रीचा रौरवत धो धो कोसळणारा पाऊस, नदी, नाले, ओढे यांना आलेले पूर त्यामुळे औरंगजेबाचं सैन्य भुईसपाट होतं. हेही कमी म्हणून मराठ्यांची औरंगजेबाच्या बेसावध सैन्यावर होणारी छापेमारी!
शेवटी अख्खा हिंदुस्तान आणि दख्खनचं स्वप्न उरात घेऊन बादशहा मरण पावला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं केलं ते स्वराज्य टिकवण्यासाठी ताराराणींच्या आक्रमकतेत तसच चैतन्य सळसळत होतं.
ताराराणींचं गौरव गान करताना गदिमा म्हणतात.
“साम्राज्ञी तू समरकुशाला लोकनेत्री प्रतापी
सत्तांधांना नमवुनी रणी अपुले राज्य स्थापी
नारी नोहे अमर जगती ज्योत ही पौरुषाची
तारा राणी जननी आमच्या अस्मितेची यशाची”
सत्तांधांना नमवुनी रणी अपुले राज्य स्थापी
नारी नोहे अमर जगती ज्योत ही पौरुषाची
तारा राणी जननी आमच्या अस्मितेची यशाची”
©® राखी भावसार भांडेकर, नागपूर
