व्यासांच्या मानसकन्या भाग 30
सत्वशीला गांधारी
सत्वशीला गांधारी
राजघराण्यातल्या गांधारी, कुंती, आणि स्वतः भानुमती झाल्या प्रकाराने प्रचंड चिडल्या होत्या. पण कुंतीचा स्वभाव मुळातच न बोलता कृतीप्रवण होता, तर गांधारी मात्र पदोपदी स्वतःच्या नवऱ्याला, तर कधी तिच्या मुलांच्या बापाला आणि सर्वात शेवटी हस्तीनापुरच्या नरेशाला हरप्रकारे समजावून सांगत होती, कधी ती त्याला खडे बोल सुनावे तर कधी त्याच्यातल्या सदसद् विवेकबुद्धीला जागृत करण्याचा प्रयत्न करे, नाहीच काही झालं तर पापा पुण्याची, कर्माची भीती त्याला दाखवे पण ज्या प्रकारे गांधारीचा सत् सत् विवेक आणि आत्मशोध, आत्मभान जागृत होतं तसं धृतराष्ट्राच्या बाबतीत मात्र नव्हतं.
जे जन्मापासून त्याचं होतं ते केवळ त्याच्या दृष्टीहिनतेमुळे त्याच्यापासून हिरावल्या गेलं होतं. पण नशिबाने त्याला त्याचं हस्तीनापुरचं सम्राटपद पांडूच्या वनगमनामुळे मिळालं होतं आणि आता त्याला त्याचंच हक्काचं असणार सम्राट पद सोडायचं नव्हतं. पण तरीही अपंगांमध्ये असणारा अविश्वास आणि नेहमी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याच्या अपरिहार्य विवशतेमुळे धृतराष्ट्र आतल्या आत कुढत असायचा, त्याला सतत हीच वंचना असायची की दैवानं आणि नशिबाने त्याला मिळालेलं सम्राटपद त्याच्या मुलाला-दुर्योधनाला मिळेल की नाही. एक राजा म्हणून, एक बाप म्हणून आणि एक माणूस म्हणून धृतराष्ट्र शेवटपर्यंत खुरटाच राहिला. त्याने फक्त एकच कार्य उत्तम प्रकारे केलं स्वतःची आंधळी सम्राट पदाची महत्त्वकांक्षा स्वतःच्या मुलाच्या मनात आणि हृदयात पुरेपूर रुजवली.
गांधारीचा मात्र धृतराष्ट्राच्या या अशा सम्राट पदाच्या लोभाला नेहमीच विरोधच होता. तिचं म्हणणं होतं की कर्माने मनुष्य मोठा होतो पदाने नव्हे.
“आर्यपुत्र तुम्ही सतत सम्राट पदाच्या वंचनेचं हे जोखड मानेवरून भिरकावून का देत नाही? एक माणूस जन्माला येतो तेव्हा तो केवळ माणूस असतो स्वतःच्या कर्तुत्वाने, कर्माने आणि सरते शेवटी अत्यल्प अशा नशिबाने तो त्याचं आयुष्य घडवत असतो. आपण तर साक्षात क्षत्रिय राजे! कर्तव्याचे बोट धरून तुम्ही तुमचं आयुष्य जगायला हवं पण तुम्हाला तर सतत सिंहासनाची आणि सम्राट पदाचीच वंचना खात असते. आणि तुमची ही आंधळी आकांक्षा अलगदपणे तुमच्या स्वतःच्या मुलाच्याही मनात रुजल्या गेली आहे याचं तुम्हाला जराही भान नाही याचंच मला कधी कधी खूप आश्चर्य वाटतं आणि खेदही होतो.”
“गांधारी एका पुरुषाच्या मनाचा ठाव तुला कधीच लागू शकणार नाही. डोळ्यावर पट्टी बांधून तू तर सत्वशीला पतिव्रता झालीस पण माझ्या शारीरिक व्यंगामुळे जे माझं जन्म सिद्ध होतं तेच माझ्याकडून हिरावण्यात आलं याची झळ तुला कळणार नाही. एका सम्राटाची दुःख त्यातल्या त्यात माझ्यासारख्या शारीरिक व्यंग असणाऱ्या, एका पुरातन महान साम्राज्याचा उत्तराधिकारी असूनही ज्याला अनुज भावाच्या दयेने मिळालेलं हे सिंहासन त्याची बोच आणि काटे कधीही तुझ्या काळजाला रुतू शकणार नाहीत.”
“महाराज कधीकधी केवळ एक माणूस म्हणून, या गांधारीचे पती आणि तुमच्या प्रिय दुर्योधनाचे पिता म्हणूनही आपल्या परिवाराचा विचार करा. आपल्या साम्राज्यामध्ये गेल्या काही दिवसांमध्ये ज्या काही घटना घडत आहेत त्याचा परिपाक काय आहे याची अंधुकशी जरी तुम्हाला कल्पना आली ना तरी तुमचा आत्मा थरथर कापेल. जन्मसिद्ध हक्क असणाऱ्या पांडवांना लाक्षागृहात जाळण्याचा झालेला प्रयत्न, त्यांच्याकडून कपटाने हिसकावून घेतलेलं त्यांचं इंद्रप्रस्थ आणि जेष्ठ कुलवधू द्रौपदीचा झालेला अपमान या साऱ्यांसाठी ना हस्तीनापुर, ना कुरुवंशाचे पूर्वज, ना या नगरीचे नगरजन, ना इतर क्षत्रिय राजे तुम्हाला क्षमा करतील. द्रौपदीला तुम्ही तीन वर दिलेत पण त्यापूर्वी तिच्यावर तुमच्याच पुत्रांनी केलेले मर्माघात तुम्ही अगदी सहज विसरलात. स्वाभिमानी पांचालीने केवळ दोन वर मागितलेत पण तरीही तुमचं आणि दुर्योधनाचं समाधान झालं नाही. तुम्ही त्याला अनुद्युताची परवानगी दिलीच कशी? आणि त्याचा परिणाम म्हणजे आज तुमच्या लहान भावांची मुलं वनवासात आहेत आणि तुमचा मुलगा आणि तुम्ही इथे राजप्रसादात! तेरा वर्षांनंतर या सगळ्यांचा काय परिणाम होईल याचा जरा तरी विचार करायचा होता महाराज!” गांधारी चिडलेलीही होती आणि काकूळतीलाही आलेली होती.
“हे बघ गांधारी माझे अनुजपुत्र पांडव मला प्रिय आहेत पण दुर्योधना पेक्षा जास्त नाही!
दुर्योधनाने मला स्पष्टपणे म्हटलं होतं की जर मी त्याला अनुद्युताची परवानगी दिली नाही तर तो जीवाचं काही बरं वाईट करेल आणि माझं माझ्या मुलावर स्वतःहूनही अधिक प्रेम आहे हे आता कुणापासूनही लपून राहिलेलं नाही.”
दुर्योधनाने मला स्पष्टपणे म्हटलं होतं की जर मी त्याला अनुद्युताची परवानगी दिली नाही तर तो जीवाचं काही बरं वाईट करेल आणि माझं माझ्या मुलावर स्वतःहूनही अधिक प्रेम आहे हे आता कुणापासूनही लपून राहिलेलं नाही.”
“वा महाराज वा! स्वतःच्या मूर्ख मुलाच्या चुकीच्या हट्टासाठी तुम्ही स्वतःच्याच लहान भावाच्या मुलांना वनवासात पाठवलं तेही बारा वर्षांकरिता. तुमच्यासारखा पिता यापूर्वी या राजघराण्यात कधी झाला नाही आणि कधी होणारही नाही. महाराज इतका पुत्रमोह बरा नव्हे. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही केवळ दुर्योधनाचे वडीलच नव्हे तर या साम्राज्याचे सम्राट आहात हस्तीनापुर नगरीचे प्रजा प्रतिपालक आहात. तुम्ही जे काही निर्णय घेता ते केवळ दुर्योधनाच्या हिताचे पण सतत दुर्योधनाचं हित साधण्याचा तुमच्या या सवयीमुळे एक दिवस हस्तीनापूरचा सर्वनाश होईल. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळे ती बिचारी कुंती इथे राजप्रसादात न राहता विदुरा घरी गेली आहे. तिचा काय दोष होता? तिची काय चूक होती? तिने तर आयुष्यात केवळ संघर्ष आणि वनवासच भोगला. लग्न झाल्यानंतर अवघ्या एक वर्षाच्या आत ती पांडू बरोबर वानप्रस्थाला निघून गेली. त्यानंतर तुमच्याच मुलाच्या कटकारस्थानांनी तिला लाक्षागृहापर्यंत खेचत नेलं आणि आता तिचे मुलं वनवासात असताना तिने राजप्रसादाचा त्याग केला याचा अर्थ कळतो आहे का तुम्हाला आर्यपुत्र?”
“हे बघ गांधारी मला आता कुठल्याही गोष्टींवर तर्कवितर्क करायचे नाहीत. माझ्या मुलाचं आणि अनुजपुत्र पांडवांचे युद्ध तेरा वर्ष मी पुढे ढकललं आहे यातच मला समाधान आहे. बाकी मला आता कुठल्याही गोष्टींचा विचार करायचा नाही.”
“कोंबड्याने डोळे बंद केले म्हणून सूर्य उगवायचा राहत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या मनावर, आत्म्यावर, बुद्धीवर कितीही पडदे टाकलेत आणि कालगतीला तेरा वर्षाचा काळ मागून घेतलात तरी एक गोष्ट लक्षात ठेवा आता युद्ध अटळ आहे आणि सर्वनाश सुद्धा! निदान आता एक करा तुमच्या लाडक्या लेकाला या तेरा वर्षात युद्ध कला निपुण होण्यासाठी प्रेरित करा. सत्तेच्या लोभापाई, साम्राज्याच्या आकांक्षेमागे धावता धावता एका वीर योद्धयाची आणि युवराजाची सारी कर्तव्ये तुमचा मुलगा केव्हाच विसरला आहे आता त्याला निदान वास्तवाचं भान करून द्या आणि तेरा वर्षानंतर होणाऱ्या युद्धासाठी तयारी करायला सांगा.या युद्धात विजयी तुमचा मुलगा होईल या भ्रमात नक्कीच राहू नका. जिथे सत्य असतं तिथेच विजय असतो. जिथे धर्म असतो तिथेच पराक्रम असतो. तुमच्याजवळ आणि तुमच्या मुलाजवळ ना धर्म आहे ना सत्याचं बळ. देवाने मला स्त्री जन्म देऊन कुठल्या जन्माचा सूड उगवला आहे ते भगवंत जाणे.”
गांधारीने धृतराष्ट्राला समजून सांगण्याचा खूप प्रयत्न केला पण झोपलेल्या माणसाला उठवता येतं, झोपेचं सोंग घेतलेल्याला नाही तेच खरं. भविष्यात होणार युद्ध आणि त्यामुळे होणारा विनाश गांधारीला कळून चुकला होता पण धृतराष्ट्र मात्र तिकडे हेतूपुरस्सर कानाडोळा करत होता.
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
8. पर्व, एस.एल. भैरप्पा
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा