Login

व्यासांच्या मानसकन्या भाग चोविस (याज्ञसेनी द्रौपदी)

मानसकन्या
व्यासांच्या मानसकन्या भाग चोविस
याज्ञसेनी द्रौपदी

मौनानं ही होतं एवढं रामायण
हे माहिती असतं तर,
शब्दांचाच स्वाधीन झाले असते.
पण शब्दांनी नेली असती वरात
भलत्याच दिशेला.
शब्द म्हणजे अंध कौरव
ओठात एक पोटात भलतंच.
मौनाचं रामायण सहन करता येतं
सीता होऊन,
पण शब्दांचं महाभारत सोसायला
पाठीशी कृष्ण हवा.
- पद्मा गोळे

मी माझ्या कक्षात म्लान चेहऱ्याने अश्रू गाळीत अधोवदन बसली होती. तेवढ्यात माझ्या सासवा कुंती आणि गांधारी तिथे आल्या. त्या माझी हर तऱ्हेने समजूत काढत होत्या.

“द्रौपदी स्वतःच्या अपमानाने अशी खचून जाऊ नकोस. या साम्राज्याची महाराणी तुझ्या पाठीशी आहे. कुरु साम्राज्याच्या स्त्रियांची अब्रू इतकी कवडीमोल नाही की कोणीही तिला हात घालू शकेल. तुझा अपमान केवळ इथल्या स्त्रियांच्या दुःखाचं एक प्रतीक आहे. आज पर्यंत या प्रासादाच्या भिंतींनी तुझ्या माझ्यासारख्या किती स्त्रियांचे हुंदके आणि अश्रू पचावले असतील हे त्याच जाणो. राजमाता सत्यवती, माझ्या सासवा अंबिका आणि अंबालिका, मी स्वतः आणि माझी ही धाकटी जाऊ कुंती, आम्ही आमच्या आयुष्यात किती मन मारून जगलो आहोत आणि गुदमरत तळमळलो आहोत हे आमचं आम्हालाच माहित. पण तरीही तुझ्या पदराला या साम्राज्यकर्त्यांनी हात घालायला नको होता. मी तुला वचन देते यानंतर कुठल्याही स्त्रीचा या साम्राज्यात असा अपमान होणार नाही. माझ्या मुलांच्या वतीने मी तुझी माफी मागते. तुझ्यासमोर पदर पसरते या साम्राज्याचे भवितव्य आता केवळ तुझ्या हातात आहे. तूच त्याला नामशेष होण्यापासून वाचवू शकतेस.” त्या जुन्या राजेवंशातील स्त्रियांची दुःखे नकळत गांधारीच्या ओठांवर आली. भविष्याच्या उदरात काय दडलेलं आहे याचा पुसटसा अंदाज गांधारीला आला होता.

“द्रौपदी झालं गेलं विसरून जा. जो प्रसंग तुझ्यावर ओढावला आहे त्याने तुझा अपमान झाला नसून कुरु साम्राज्याच्या कीर्तीला गालबोट लागलं आहे. ज्या घराण्यात पुत्रवधूंचा असा अपमान होतो त्या घराण्याचा अंत जवळ आलेला असतो. तुझा अपमान करणाऱ्यांनी त्यांचा स्वतःच्या हाताने स्वतःचा अंत लिहिलेला आहे. आणि दोष अपमान करणाऱ्यांना तरी काय द्यायचा माझ्याच मुलांनी माझ्याच संस्कारांवर आणि माझ्या संगोपनावर मोठे प्रश्नचिन्ह लावलं आहे. इंद्रप्रस्थाचं राज्य बघून मला फार गर्व झाला होता. मला वाटत होतं मी पाच शूरवीरांची माता आहे पण आज मला कळलं की माझी मुलं काय लायकीची आहेत. अश्रु आवर, सांभाळ स्वतःला.”

मनात कितीही आणलं तरी तो लाजिरवाणा प्रसंग माझ्या स्मृती पटलावरून हटायला तयार नव्हता. त्या अपमानाच्या क्षणी माझ्या मोठ्या सासर्‍यांनी मला तीन वर दिले पण मी केवळ क्षत्रिय राणीला शोभेल असे दोनच वर मागितले. माझा माझ्या पतींवर आणि त्यांच्या कर्तुत्वावर पूर्ण विश्वास होता. पतीची महत्त्वकांक्षा फुलवण्याचं काम मी केलं. तेच तर एका पतीव्रता स्त्रीचं कर्तव्य असतं. एवढं होऊ नाही धर्मराजा मात्र परत एकदा अनुद्युताकरिता द्युतगृहात गेला.

मी आणि माता कुंती ने त्याला किती समजावलं पण हा माझा द्युत लंपट पती परत एकदा शकुनीच्या निष्णांत खेळात हरला. तो हरणारच होता, पण हस्तीनापुर सम्राट महाराज धृतराष्ट्र आणि दुर्योधनाच्या राज्य लोभाच्या उच्च महत्त्वकांक्षा आकाशाला भिडलेल्या आहेत, त्याकरिता ते दोघे किती खालच्या पातळीवर उतरू शकतात आणि पुत्र प्रेमात एखादा राजा आंधळा होऊन स्वतःच्या लहान भावाच्या मुलांवर कशाप्रकारे अन्याय करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे पांडवांना मिळालेला बारा वर्षांचा वनवास आणि एक वर्षाचा अज्ञातवास.

धर्मराजाने द्युतात सर्वस्व हरल्याने आम्ही सर्व वनवासाला निघालो होतो आमच्याबरोबर माता कुंतीही होती. पण तिला अडवले विदुराने.

“धर्मराज तुमची माता आता तुमच्या बरोबरी येणे शक्य नाही. ती सुकुमार आहे. तिचं वय झालं आहे. वनवासातील कठोर दिवस या वयात तिच्याने कसे सहन होतील बरं?”

“महात्मा विदुर, ज्या राजप्रासादात माझ्या सुनेचा अपमान झाला. तिच्या उत्तरीयापर्यंत तिच्या लहान दिराचा हात गेला त्या राजमहालात मी विश्वासही घेऊ शकत नाही. इथल्या अथांग सत्तालोलूप आणि राक्षसी साम्राज्याची महत्त्वकांक्षा असणाऱ्या लोकांमध्ये राहणं म्हणजे साक्षात आत्मघात करण्यासारखं आहे. मी या राजप्रासादातल्या हवेचा सुद्धा तिरस्कार करते.” नेहमी शांत आणि सोशिक असणारी कुंती आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या सुनेच्या अपमानावर स्वतःचा राग बोलून दाखवत होती. पण तो राग खरंच होता कुणावर? स्वतःच्या नशिबावर? ज्या मुलांवर तिला गर्व होता त्यांच्यावर? की पांडूच्या मृत्यूनंतर ज्या विश्वासानं तिनं तिची लेकरं मोठ्या विश्वासानं मोठा दिर आणि जावेच्या आश्रयाला आणली होती त्यांच्यावर? कुलवधूचा अपमान होत असतानाही कुरूंच्या सभेत वयाने, धर्माने, बुद्धीने, ज्ञानाने, ज्येष्ठ असणारी प्रत्येक व्यक्ती राजासाठी मींधी होऊन मूग गिळून गप्प बसली होती त्यांच्यावर?

शेवटी विदुराच्या विनवणीवर माता कुंती त्यांच्या घरी राहायला तयार झाली. माहेरी न जाता विदुराकडे राहून आपल्या शत्रूंचे वैभव रोज डोळ्यांनी पाहण्याचा वनवास माता कुंतीने पत्करला होता.

मी ही माझ्या मुलांना माहेरी पाठवून नवऱ्यांसाठी वनवास स्वीकारला होता. माझ्या नवऱ्यांना राज्य मिळवण्याकरिता जशी मी थोडीफार कारण झाली तशीच त्यांचे राज्य घालवण्यातही माझाच वाटा होता. त्यांचा वनवास तो माझाही वनवास होता. केवळ त्यांची सावली म्हणून मी त्यांच्याबरोबर वनवासात गेले नव्हते. नवऱ्याचे वैभव आणि मोठेपणा भोगायचा माझा अधिकार तशीच त्यांच्या कष्टांची आणि अपमानाची ही मीच वाटेकरीण होते. पांडवांच्या इतर बायका आपल्या मुलांना घेऊन माहेरी गेल्या पण मी फक्त मात्र माझी मुले माहेरी पाठविली. त्यांचे वय लहान होते शिक्षण व्हावयाचे होते त्यांना रानात बरोबर ठेवून चालणार नव्हते.

माझ्याबरोबर जे झाले ते मी विसरणे शक्यच नव्हते. माझ्या अपमानाच्या संतापात मी जळत होती. वनवासात धृष्टुद्युमनं आणि कृष्ण मला भेटायला आले तेव्हा अखंड झरणारे माझे अश्रू पुसून मी त्यांना त्वेषाने म्हणाले,”मला नवरे नाहीत, मुले नाहीत, भाऊ बाप नाहीतच, ते असते तर माझा असा अपमान त्यांनी सहन केला असता का?” मी वारंवार कौरवांनी माझ्या पतींचा केलेल्या अपमानाचा सूड घेण्यासाठी धर्मराजाचं मन वळवण्याचा प्रयत्न केला. पण ते शक्य झालं नाही.

वनवासात असूनही माझ्या गृहिणी पदाच्या जबाबदाऱ्या कमी झाल्या नव्हत्या. धर्मराजाचा पुरोहित आमच्याबरोबर होता. शेकडो लोक, ब्राह्मण, ऋषी,मुनी, आमच्याकडे येऊन पाहुणचार घेऊन जात होते. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत माझे काम काही संपेना. वनवासात असूनही माझ्या मागची थोऱ्यामोठ्या राजाची मुलगी, सून, बायको या तीनही जबाबदाऱ्या आणि नाती सुटली नाही. जी माणसे पाहूणचारासाठी येत त्यांचे सेवाधर्माने करावयाचे हा धर्माचा भाग तर होताच शिवाय त्यामागे व्यवहार आणि राजकारणही होतं आणि हे सर्व मला सांभाळावं लागे. वनवासात राजवाड्यात मिळायचा तेवढा एकांत नव्हता. राजप्रासादात माझ्या मदतीला दास दासी आणि सेवक होते. इथे मात्र पूर्वी इतके ऐश्वर्य नसूनही आल्या गेल्यांची आणि आश्रितांची वर्दळ होतीच. शिवाय येणाऱ्या प्रत्येक ऋषीने सांगितलेल्या कंटाळवाण्या कथाही ऐकाव्या लागत. पांडवांचे मात्र सगळं मजेत सुरू होतं. शेवटी माझ्याही संयमाचा बांध फुटला. मी धर्म राजाला म्हटलं,”तेरा वर्ष तर तेरा वर्षात संपून जातील त्यानंतर तूम्ही काय करणार आहात? तुम्हाला द्युत खेळायला आवडतं ना मग नळराजाने द्युतावर लिहिलेल्या अक्षतत्व आणि अक्षह्दय या ग्रंथांचा अभ्यास करा आणि द्युतात निष्णांत व्हा.”

“अर्जुन तुम्हाला जर आर्यवरतातला श्रेष्ठ धनुर्धर व्हायचं असेल तर तुझ्या जन्मभूमीत देवलोकात जाऊन तिथून दिव्यास्त्र घेऊन या.”

“भिमसेन, तुम्हाला विविध मिष्टान्न आणि रुचकर जेवण आवडतं ना मग स्वयंपाक शिका. नकुल आणि सहदेव तेरा वर्षानंतर महाभयंकर युद्ध होणार आहे त्याकरिता आपल्याला पुष्कळ गोधन आणि पशुधन आवश्यक आहे. अश्वांशिवाय रथ चालणार कसे सहदेवा तूम्ही अश्वपरीक्षणात तरबेज व्हा तर नकुल तूम्ही गो-पालनाच प्रशिक्षण घ्या.”

एक पत्नी म्हणून पतींचा स्वाभिमान आणि महत्त्वकांक्षा मला शक्य असेल त्या सर्व पद्धतीने मी नेहमी फुलवती ठेवली.

©® राखी भावसार भांडेकर.


संदर्भसूची

1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.

2. राधेय, लेखक रणजित देसाई.

3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.

4. युगांत, इरावती कर्वे.

5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.

6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.

7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.

8. पर्व, एस.एल. भैरप्पा