Login

व्यासांच्या मानसकन्या भाग बावीस (याज्ञसेनी द्रौपदी)

मानसकन्या
व्यासांच्या मानसकन्या भाग बावीस

याज्ञसेनी द्रौपदी.


माणसाचं मन कशाने बरं बनलेलं असावं? प्रेम, क्रोध, मत्सर, माया, ममता, आसक्ती, विरक्ती, लोभ, शड् रिपू? हे सगळं तर मनाच्या अगदी वरच्या पातळीवर तरंगत असतं. मनाच्या खोल डोहात असतात हे तरंग निर्माण करणाऱ्या आठवणी!

"आठवण"! चार शब्दांचा एक शब्द समूह, हृदयाच्या साऱ्या नाजूक धाग्यांची वीण आहे ह्या शब्दात. "आठवण", खरंच आयुष्यात आठवणीच नसत्या तर? तेही असंच झालं असतं कोर, रंगहीन,निस्तेज , उदास , रटाळ, कंटाळवाणं. एक "आठवण" हा शब्द मनाचा गुंता किती वाढवतो नाही ! आणि सोडवतो.

हस्तीनापुर म्हटलं की माझ्या मनात आठवणींच्या अशाच अनेक मधमाशा घोंगावत उठतात. त्यांचं कानाचे पडदे फाडणारं घोंगावण, मला आठवण करून देतात माझ्या अपमानाची! हस्तीनापुराशी माझं न जाणं कोणतं नातं आहे? इथे आल्यापासूनच काही ना काही, न सांगता येण्यासारखं घडतच असते.

पाचपतींशी विवाह करून जेव्हा मी या कुरूंच्या राजधानीत आली तेव्हा ही नगरी मला सुंदर तर वाटली पण उत्साही नाही! इथे भरभराट होती, संपन्नता होती, पण तरीही मनाला काहीतरी उणीव भासत होती. ते काय होतं मला समजेना! प्रवेशद्वारावर राजघराण्यातल्या नववधूचं जसं स्वागत व्हावं तसंच माझंही झालं. आरतीचं मंगल ताट घेतलेल्या सुवासिनी, डोईवर जलाने भरलेले कलश घेतलेल्या कुमारिका, रेशमी तलम वस्त्रांवर पुष्पदलांनी सजवलेल्या पायघड्या आणि बऱ्याच वर्षानंतर पांडवांना बघण्यासाठी आतुरलेल, आसुसलेले पितामह भीष्म, द्रोणाचार्य, कृपाचार्य, आणि समस्त नगरजन सारं काही जिथल्या तिथे जसं असायला हवं तसंच होतं पण काहीतरी मनाला डाचत होतं.

त्या भव्य राजप्रासाच्या प्रांगणातून जेव्हा माझ्या सासूने मला महाराणी कुंतीच्या महाली नेलं तेव्हा मला सगळ्या गोष्टीचा थोडाफार उलगडा झाला. त्या उंच प्रसादाच्या भव्य दगडी भिंतीवर कितीही तलम मऊ रेशमी वस्त्राची आवरण असली, सुशोभनाने, विविध रंगांच्या छटांनी त्या भिंती कितीही सजवलेल्या असल्या तरीही इथल्या राज्यस्त्रिया मात्र भग्न मनाच्या साम्राज्ञीच मला वाटल्या.

माझ्या सासूच-कुंतीच आयुष्य तर केवळ दुःख कष्ट आणि परिस्थितीशी संघर्ष करण्यातच गेलं होतं. स्वतःचं घर सोडून दुसऱ्याच्या घरी मोठी झालेली माझी सास! सतत मनात काहीतरी ठेवून, हातचं राखूनच बोलायची. तिच्या मनाचा तळ मला कधीच लागला नाही. महाराणी गांधारींच्या महाली ही तोच अनुभव आला.

कुरू साम्राज्याची साम्राज्ञी, सम्राट धृतराष्ट्रांची पत्नी, पतीव्रता गांधारी बोलताना माझ्याशी नेहमी ममत्व राखून होती. पण तिच्या शब्द शब्दातून वाक्य वाक्यातून केवळ खंत आणि खंत झिरपत होती. तिच्या मनात कुठलं शैल्य बोचत होतं हे मला इतक्या लवकर कळणार नव्हतं. तसंही या राजवाड्याच्या भक्कम चिरेबंदी तटबंदीने किती राजस्त्रियांचे हुंदके, अश्रू, जळून राख झालेल्या स्वप्नांची माती, असाह्यतेच्या, मनाविरुद्ध आयुष्य जगण्याची जबरदस्ती आणि चिंध्या झालेल्या हृदयाची विदीर्ण भग्न अवशेष बघितले असतील तोच जाणे.

सत्यवतीचा राजलोभ, अंबेचा तळतळाट, अंबिका आणि अंबालिकेची हतबलता, गांधारीची विवशता, सक्षम असूनही पतीचं सुख न मिळालेली माझी सासु कुंती आणि सुकुमार माद्रीची तडफड आणि तगमग सारच आपल्या उरात सामावून हा भव्य राजवाडा दिमाखात उभा होता. जणू तो सांगत होता की क्षत्रिय स्त्रियांचं आयुष्य हे असंच झिजून झिजून मरण्यासाठी असतं. पण मला हे मान्य नव्हतं. अरे पण मी हे विसरलीच की मला कुठली गोष्ट मान्य आहे की नाही याने आता काही एक फरक पडणार नाही. फरक पडणारच असेल तर तो माझे पतींच्या नियतीने आणि त्यांच्या नशिबाने!

लाक्षागृहदाहातून माझ्यासह माझे पती राजधानीत परत आल्यावरही कुरु साम्राज्याचा प्रश्न सुटला नव्हता. मधल्या काळात स्वतःच्या वडिलांवर जबरदस्ती करून पितामह भीष्मांकरवी दुर्योधनाने स्वतःला युवराज म्हणून घोषित केले होते. एका राजधानीत धर्मराज युधिष्ठिर आणि दुर्योधन असे दोन युवराज असूच शकत नसल्याने, शेवटी पुत्र प्रेमात अंध झालेल्या राजाने जसा निर्णय घ्यावा तोच निकाल आमच्या नशिबी आला. स्वतःच्या मुलाला हस्तिनापूरचं साम्राज्य अबाधित ठेवून, माझ्या शूर पतींना त्यांच्या चुलत्याने खांडवप्रस्थाची कर्मभूमी दिली होती.

एका प्रकारे तेही बरंच झालं म्हणा! क्षत्रिय वीर स्वतःच्या शस्त्रांच्या भरोशावर उजाड माळराणावर स्वर्गासमान सुंदर, काकणभर जास्तच संपन्न नगरी वसवू शकतात याचा वस्तू पाठच इंद्रप्रस्थ बघून सगळ्यांना झाला. आणि वासुदेव कृष्णाच्या सल्ल्याने पांडवांनी राजसु यज्ञ करण्याचं ठरवलं. त्याच क्षणी वैराची ठेणगी तिकडे हस्तीनापुरात पडली. आपल्याच साम्राज्याचा एक भाग देऊन दुर्योधनाला वाटलं की त्याने मूर्खपणा केला आहे. त्याचे वडील सम्राट असताना युधिष्ठिर राजसयू यज्ञ करून जणू त्याला चिथावणीच देतो आहे.

त्यातच झालेल्या अपमानाचा बदला घेण्याकरिता राजांनी आणलेले आहेर, सुवर्ण, रत्न, सेवक, दासी, गोधन, पशुधन, साऱ्याची नोंद दुर्योधनाने केली आणि त्याचे डोळे लोभाने विस्फारले. आणि त्याने मामा शकुनीच्या सल्ल्याने द्युताचा कपटी डाव रचला.

यज्ञाच्या तयारीत आणि पाहुण्यांच्या सरबराईत आम्ही सारेच थकलो होतो त्यामुळे राजधानी हस्तीनापुरहून आलेलं आमंत्रण मागचा पुढचा विचार न करता धर्मराजाने स्वीकारलं. परत एकदा राजधानीत आल्यानंतर मनाला काहीतरी चुटपुट लागली होती. राजस्त्रियांच्या महाली चैतन्य असं नव्हतंच.

माझ्या माहेरी माझी आई पृषती आणि इतर राजस्त्रीया, ज्याप्रमाणे राजकारणात लक्ष घालत होत्या तसा इथे माग मुसही नव्हता! माझ्या आईच्या पुढाकारानेच मी अर्थशास्त्राचे शिक्षण घेतलं होतं. त्यामुळे पांडवांकडे असलेलं धन, संपत्ती, सुवर्ण, अलंकार, गोधन, पशुधन, शस्त्र, रथ, अश्व साऱ्यांची मोजदात, पाकगृहाची संपन्नता, अतिथींचं आदरातिथ्य, दास दासींवर देखरेख, सारं मीच बघत होती. मी इंद्रप्रस्थाची साम्राज्ञी नगर जागे होण्यापूर्वी पहाटे उठून तिच्या पाकगृहात जाऊन अग्नी प्रज्वलित करून अन्नपूर्णेला आवाहन करी. ब्राह्मण भोजन, पुरोहितांचे दान धर्म, व्यापाऱ्यांच्या समस्या इथं पासून ते कलाकारांचे मानधन, शस्त्रागाराची देखभाल आणि अखेरच्या दासी पर्यंत सर्वांची भोजन व्यवस्था मी एका हाती सांभाळत होती. पण हस्तीनापुराचं मात्र सारच विलक्षण होतं! इथल्या राजस्त्रीरीया सुवर्ण अलंकारांनी मढवलेल्या केवळ कापडी बाहुल्या वाटायच्या. त्यांचे भावना शून्य चेहरे आणि चेतनाहीन हालचाली मनाला चटका लावत होत्या. एवढ्या संपन्न राजधानीतल्या राजस्त्रीया कधीही आनंदी आणि प्रसन्न दिसल्या नाही. या राजधानीच्या हवेतच काही विलक्षण गुढ तंत्र शक्ती होती की या राजप्रसादाची ती जादू?

माझ्या नगरीमध्ये मी आणि समस्त नगरजन युधिष्ठिराच्या धर्म छत्राच्या खाली अगदी निश्चिंत तर होतोच पण आनंदी ही! इथे मात्र त्याचा लवलेशही नव्हता. जणू इथल्या स्त्रिया रत्नजडित अलंकारांनी नटलेल्या केवळ कट पुतळ्या होत्या. अपवाद होता तो केवळ महाराणी गांधारीचा.

ती तिच्या परीने राजमहालात चैतन्य ओतण्याचा प्रयत्न करत होती पण स्वतःच डोळ्यावर पट्टी बांधल्यानंतर ती तिच्या सुनांच्या आणि राज स्त्रिया यांच्या आयुष्यात आशेचा प्रकाश पसरवण्यात किती सक्षम होतील हा प्रश्नच आहे. शिवाय दुर्योधनाची राज्याविषयीची महत्त्वकांक्षा आणि त्याखाली भरडल्या जाणाऱ्या त्या स्त्रिया हे जणू उघड असलेलं गुपितच होतं.

ज्या सजगतेने माझ्या सासूने तिच्या मुलांवर संस्कार केले होते आणि त्यांच्यावर जागता पहारा दिला होता. तिथे कुठेतरी गांधारी कमी पडल्यासारखी वाटे. कुंतीकडे काहीही नसून तिच्या मुलांनी स्वकर्तृत्वाने सम्राट पद मिळवले होते आणि गांधारीची मुलं केवळ मत्सराच्या भूमीवरची खुरटी झुडपं झाली होती.

शेवटी मुलांना घडविण्यात आईचा वाटा मोठा असतो हेच माझ्या सासूने तिच्या कृतीतून मला दाखवून दिलं होतं. तिच्या मुलांचे संस्कार आणि माझ्या चुलत दिरांचे संस्कार यात जमीन अस्मानाचा फरक होता आणि याची अनुभूती त्यादिवशी द्युतगृहात मला आली.

सत्तेच्या लोभापायी दुर्योधन इतक्या खालच्या पदाला गेला होता की त्याने त्याच्या वहिनीला ऋतुमती असतानाही सभेत फरपटत आणण्याचा आदेश दुर्योधनाला दिला. आणि स्वतःला साक्षात धर्मराज म्हणणारा माझा नवरा धर्माची आड घेऊन गप्प बसला.

आठवणी या अशाच असतात. मधमाशीच रूप घेऊन मनाला आणि आत्म्याला डंख मारणाऱ्या. स्वाभिमानाच्या चिंधड्या करणाऱ्या आणि अपमानाची ज्वाला सतत धगधगती ठेवणाऱ्या.

©® राखी भावसार भांडेकर.


संदर्भसूची

1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.

2. राधेय, लेखक रणजित देसाई.

3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.

4. युगांत, इरावती कर्वे.

5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.

6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.

7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.

8. पर्व, एस.एल. भैरप्पा