व्यासांच्या मानसकन्या भाग एकवीस
याज्ञसेनी द्रौपदी.
महाराज द्रुपदाने यज्ञ केला त्यातून मी आणि धृष्टद्युम्न अशी जाणती मुले त्यांना मिळाली. मी वर्णाने सावळी पण यज्ञकुंडातल्या ज्वालेसारखी तेजस्वी. माझे स्वतःचे नाव कृष्णा-कल्याणी, द्रुपद कुळातली म्हणून द्रौपदी, पांचालांची राजकन्या म्हणून पांचाली, यज्ञसेन द्रूपदाची मुलगी म्हणून याज्ञसेनी. माझ्या पित्याने खरंतर गुरु द्रोणांचा सुड घ्यायचा म्हणूनच या यज्ञाचा घाट घातला. त्यातही त्याला ध्रृष्टुद्युम्नासारखा शूर, लढवय्या, युद्धकला निपुण पुत्र प्राप्त झाला, पण त्याचा हात धरून मीही यज्ञकुंडा बाहेर अवतरली. पिताश्रींसाठी ही इष्टापत्ती होती. माझ्या स्वयंवराच्या सौद्यात त्यांना कुशल धनुर्धर जावई हवा होता, म्हणूनच माझ्या विवाहाकरीता मत्स्य भेदाचा कठीण स्वयंवराचा पण त्यांनी योजला होता. त्यांना ही खात्रीच होती की, हा स्वयंवराचा पण केवळ अर्जुनच पूर्ण करू शकेन आणि मग तो आचार्य द्रोणांशी कधीही सख्य करू शकणार नाही.
स्वयंवराचा दिवस उजाडला. सेविका माझ्या मागे-पुढे करत होत्या. माझी कांती अधिक उजळून निघावी म्हणून गुलाब जलात आणखी थोडे कमल पराग, केसर आणि चंदन, हळदीची उटी मला लावण्यात आली होती. लाल रंगाची सुवर्ण जरीची साडी मला नेसवली होती. एका म्हाताऱ्या सेविकेने कस्तुरीची उटी माझ्या नाभीला लावली होती. रत्नजडित सुबक नक्षी असलेल्या अनेक माला, बांगड्या, पाटल्या, कंगन, तोडे, बाजूबंद, मेखला, पैंजण, कर्ण फुलं, नाकातली नथनी, केसांची पाच पेढी वेणी, त्यावरची सुवर्ण फुल आणि मोगऱ्याच्या वेण्या यांनी माझ्या सभोवती सुगंधांचं एक मोहक, उत्तेजक वलय निर्माण केलं होतं.
सर्व राजे स्वयंवर मंडपात स्थानापन्न झाले होते. भावाने मला स्वयंवराच्या व्यासपीठावर बोलावलं. त्याने उत्सुक सर्व नरेशांना स्वयंवराचे नियम समजावून सांगितले आणि स्पर्धा-मला जिंकण्याची चढाओढ सुरू झाली. त्या सभामंडपात जमलेल्या भारतातल्या बऱ्याचशा राजांना 'किंधरा' धनुष्य जमिनीवरून वर सुद्धा उचलता आलं नाही. ज्या मुठभर राजांना उचलता आलं आणि ज्यांनी नेम धरला तो कधी करंगळी एवढ्या अंतराने, तर कधी आवळ्या एवढ्या अंतराने चुकला. कधी तीळा एवढ्या तर कधी मोहरी एवढ्या अंतराने हुकला होता.
तिथे उपस्थित नरेशांमध्ये आता चुळबुळ सुरू झाली होती. माझ्या आजूबाजूला उभ्या असलेल्या दासी ही आपापसात काहीतरी कुजबुजत होत्या.
“कुरु वंशाचे युवराज, महाराज दुर्योधन यांनी आपल्या सोबत अंगराज कर्णाला आणलं आहे. मला तर वाटतं की आता आपल्या राजकन्येचा स्वयंवराचा पण तेच जिंकतील.” एका दासीने तिचा अंदाज बोलून दाखवला.
“असं झालं तर फारच वाईट होईल. राजसत्तेसाठी कुणी काहीही करू शकतो. कानावर आलेल्या वावड्यांवर जर विश्वास ठेवला तर हस्तीनापुरच्या सिंहासनासाठी दुर्योधनाने त्याच्या चुलत भावांना मारून टाकलं असं माझ्या ऐकिवात आलं आहे.”
“नाहीतर काय! तो अंगराज कर्ण इतका मोठा धनुर्धर असूनही त्या दुष्ट दुर्योधनाच्या राजसभेत मांडलीका सारखा वावरत असतो. आपल्या राजकन्येला असा पुरुष अजिबात शोभून दिसणार नाही.”
“दासींचा आपसातला हा वार्तालाप माझ्या कानावर येत होता आणि मनोमन असेही वाटत होतं की काहीही झालं तरीही निदान युवराज दुर्योधनाने माझं पाणिग्रहण करू नये.
त्यादिवशी माझं नशीब खरंच बलवत्तर होतं की माझी नियती हे मला सांगता येणार नाही पण जेव्हा सर्व क्षत्रिय राजे माझ्या बाबांच्या स्वयंवराच्या त्या कठीण पणासमोर निष्प्रभ झाले, तेव्हा सभेतून एक तेजस्वी ब्राह्मण युवक पुढे आला आणि त्याने डोळ्याची पापणी लावते न लावते तो अचूक मत्स्यभेद केला.”
त्यादिवशी माझं नशीब खरंच बलवत्तर होतं की माझी नियती हे मला सांगता येणार नाही पण जेव्हा सर्व क्षत्रिय राजे माझ्या बाबांच्या स्वयंवराच्या त्या कठीण पणासमोर निष्प्रभ झाले, तेव्हा सभेतून एक तेजस्वी ब्राह्मण युवक पुढे आला आणि त्याने डोळ्याची पापणी लावते न लावते तो अचूक मत्स्यभेद केला.”
“एका क्षत्रिय कन्येचा भाग्यविधाता एक ब्राह्मण होणार ही बाब तिथे उपस्थित समस्त क्षत्रिय राजांना अजिबात रुचली नाही. प्रत्येक स्वयंवरानंतर जसं रणकंदन माजतं तसंच माझ्या स्वयंवरानंतरही रणांगण क्षत्रिय राजांच्या तप्त रक्ताने लालबुंद झाले. स्वयंवरातला पण जिंकूनच नव्हे तर उपस्थित समस्त क्षत्रियांनाही ज्याने स्वतःच्या धनुष्याचे पाणी पाजलं अशा त्या ब्राह्मण युवकाने-अर्जुनाने मला त्याच्या शौर्याने जिंकलं होतं.”
“वीर्यशुल्का असलेली मी याज्ञसेनी आता अर्जुनाची पत्नी होणार होती. पण मुळातच जिचा जन्म संघर्षाचे बीज मनात ठेवून आणि सुडाच्या आहुती यज्ञात टाकून झाला त्या माझ्या-द्रौपदीच्या आयुष्यात विवाह हा प्रसंगही बराच चिघळला.”
“शेवटी सासू कुंती आणि कृष्णाच्या शिष्टाईने स्वयंवरात अर्जुनाच्या पराक्रमाचा मोबदला म्हणजे पाचही पांडवांच्या पत्नीत्वाचं उत्तरदायित्व स्वीकारलेली मी पांचाली-द्रौपदी.
मी आणि माता कुंती म्हणजे सासवा-सुना, म्हणजे एकच वंशाच्या वर्धनाची जबाबदारी असलेल्या दोन स्त्रिया. कुंतीला मिळालेल्या वरामुळे तिला देवांना कामापूर्तीसाठी बोलावणे सहज साध्य झाले. तोच नियम तिने मला लावला. तिने इंद्राच्या पाच अंशांना जन्म दिला आणि त्याच पाच अंशांची अर्धांगिनीची जबाबदारी माझ्यावर टाकून त्यांच्या संततीला जन्म देण्याची जबाबदारी माझ्यावर आली. तिच्या-कुंतीच्या अशा तऱ्हेच्या संततीच्या वंशाची जोपासना तिने मला पाच पांडवांशी विवाह करायला लावून माझ्याकडून करून घेतली.
आम्ही हस्तीनापुरला आलो आणि अर्ध राज्य म्हणून आम्हाला खांडवप्रस्थ मिळालं. त्याचं माझ्या पतींनी इंद्रप्रस्थ केलं. एकदा मी आणि युधिष्ठिर एकांतात बसलो होतो. विवाहाच्या वेळी, पाच जणांसोबत एकांतात असताना आम्ही काही नियम बनवले होते. मी ज्याच्या बरोबर असेल त्यावेळी इतर चौघांपैकी कुणीही तिथे येऊ शकत नव्हते. त्यावेळी काहीतरी गैरसमजाने अर्जुनाला त्याची शस्त्र घेण्याकरिता आमच्या दालनात यावं लागलं, त्याच्याने नियम भंग झाला आणि तो प्रायश्चित्त घेण्याकरिता वनवासात गेला. त्या वनवासात त्याने आणखीनही विवाह केले, नागकन्या उलुपी, मातामह घराणं चालवणारी चित्रांगदा, आणि प्रत्यक्षात कृष्णाची बहीण सुभद्रा त्याच्या आयुष्यात आल्या. कर्तुत्ववान योद्धा आणि वीर पुरुष म्हणून अर्जुनाला अनेक विवाह करता आले. परंतु माझ्या सौंदर्यामुळे मला पाच जणांची होऊन राहावं लागलं. माझ्या पतींनी त्यानंतर मोठा राजसयू यज्ञ केला. राजसयू यज्ञाकरिता आर्यावरतातून सर्व राजे आले होते आणि त्यांनी जो आहेर आणला त्याची नोंद ठेवण्याचं काम पांडवांनी दुर्योधनाला दिलं होतं. आम्हाला कफल्लक बनवून ज्या कौरवांनी आमचं हसं केलं त्याच कौरवांना माझ्या पाच पतींनी अमाप संपत्तीचं भांडार काय असतं आणि वीराचं वीर्यबल काय असतं हे दाखवून दिलं.
असुरांचा शिल्पकार मयाकडून त्याच्या जीवाच्या बदली युधिष्ठिराने मयसभा बांधून घेतली. माणसाची पंचंद्रिय खरंच किती कमकुवत आणि फसवी असतात याचच जणू ती मयसभा प्रतीक होती.
त्या मयसभेत डोळ्यांना पाणी दिसायचं पण प्रत्यक्षात जमीन असायची, आणि जमीन आहे असं वाटतांना पाण्याचा स्पर्श व्हायचा. या गोंधळात दुर्योधनाची गफलत झाली आणि माझी विश्वासू दासी मदनिका त्याच्यावर हसली आणि ती सर्व हकीकत ती मला हसून हसून सांगत होती. पण दुर्योधनाने त्याचा विपर्यास केला. राजसयु यज्ञातील ती अमाप संपत्ती, अनंत रत्न भांडार आणि विपुल धन बघून दुर्योधनाचे डोळे विस्फारले. त्याच्या मनात संपत्ती विषयी आसक्ती निर्माण झाली. त्याला हवी असलेली संपत्ती, त्याच्या मामाने, माझ्या मोठ्या नवऱ्याच्या द्युतप्रियतेचा फायदा उचलून त्या द्युतचा घाट घातला आणि तोरण स्फटिका भावनात ते भयंकर द्युत घडले.
मी एक वस्त्रा रज:स्वला होते. द्युताचा तो बिभत्स प्रकार सभेमध्ये सुरू होता. द्युतलंपट युधिष्ठिर, त्या कलेत निशणांत असलेल्या शकुनी समोर टिकणे शक्यच नव्हते. भावांनी मोठ्या मेहनतीने जे मिळवलं. ते त्याने द्युतात मागचा पुढचा काही एक विचार न करता एका क्षणात गमावलं. गोधनही गेलं. तो त्याचे भाऊ पण हरला. आणि शेवटी मलाही पणाला लावलं. हे सगळं होत असताना चिडला तो केवळ भीम. स्वतःच्या पत्नीला पणाला लावताना युधिष्ठिराने जराही मागचा पुढचा विचार केला नव्हता. पण भीम मात्र रागाने सहदेवाला म्हणाला. “सहदेवा थोडा अग्नी घेऊन ये. द्युत खेळणाऱ्या ह्या युधिष्ठिराचे हात आधी जाळून टाकायला हवेत.”
पत्नीच्या शिलासाठी मोठ्या भावाचे हात जाळणारा भीम कुठे आणि संधी मिळताच प्रत्येक ठिकाणी स्वतःचा विवाह संबंध जोडणारा अर्जुन कुठे? खरंच कधी कधी आपण व्यक्तीला ओळखण्यात मोठी चूक करतो हेच खरं.
त्या क्षणी वाटलं की अर्जुनाच माझ्यावर खरं प्रेम नसून भीमच माझ्यावर जीव ओवाळून टाकणार आहे.
©® राखी भावसार भांडेकर.
संदर्भसूची
1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.
2. राधेय, लेखक रणजित देसाई.
3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.
4. युगांत, इरावती कर्वे.
5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.
6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.
7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.
8. पर्व, एस.एल. भैरप्पा
***************************
