Login

व्यासांच्या मानसकन्या भाग वीस (याज्ञसेनी द्रोपदी)

मानसकन्या
व्यासांच्या मानसकन्या भाग वीस

याज्ञसेनी द्रौपदी.

कुमारीचापि पांचाली वेदी मध्यात समुद्धीता
सुभगा दर्शनीआंगी वेदी मध्या मनोरमा

नदीचा खळखळणारा प्रवाह किंवा निळ्या आकाशाची अथांग निळाई, सूर्याचं प्रखर तेज किंवा अग्नीतली प्रखर ऊर्जा यांचं मोजमाप होऊच शकत नाही. प्रीती आणि रती, मैत्री आणि भक्ती, संयम आणि आसक्ती या भावना जिच्यामध्ये ओतप्रोत भरलेल्या होत्या पण तरीही तिने कधी मनाचा तोल जाऊ दिला नाही. जिचे मुळात अस्तित्वच यज्ञाच्या लखलखत्या आहुतींच्या ज्वालांमधून निर्माण झालेले आहे. यज्ञातल्या आहुती आणि त्यातून आसमंतांपर्यंत जाणाऱ्या लखलखणाऱ्या ज्वाला, जे काही हिणकस आहे, अशुद्ध, अपवित्र, त्या भस्मसात करणाऱ्या अखंड तेजाच्या, साक्षात अग्नीच्या प्रतिनिधी ज्वालांच्या उदरातून जिचा जन्म झाला आहे, ती याज्ञसेनीही त्या ज्वालांचंच आयुष्यभर प्रतिनिधित्व करते.

सतत कर्तव्य व्यग्र असणार तीच व्यक्तिमत्व पण मनात मात्र सतत प्रेमांचे अंकुर उमलणार तिचं हृदय, अनाकलनीय बुद्धिमत्ता आणि प्रसंगावधान, जे स्वतःचा आहे ते हक्काने मिळवण्यासाठी तिची चाललेली नितांत धडपड आणि वेळोवेळी प्रक्षेभाचे रूप घेणार तिचं व्यक्तिमत्व फारच विलक्षण आहे.

विपुल काळ्या, कुरळ्या, केसांच्या लाटेप्रमाणेच क्रोधाच्या अथांग लहरीही तिच्याभोवती सतत फिरत असतात. सुरंगीच्या फुलांचा दर्प जिच्या तनुला वेढलेला आहे, वर्णाने जरी ती सावळी असली तरी तिचं तेज मात्र एखाद्या ज्वालेपेक्षा कमी नाही अशी ती द्रौपदी. महाभारताची जणू महानायिकाच!

उत्कट, विराट, प्राकृतिक कधीकधी अतिशय सामान्य वाटावी तर कधी कधी अनंत आकाशाएवढी उंच वाटावी अशी द्रोपदी पुन्हा कधी झालीच नाही. ही द्रुपदाची लेक सुंदर आहे. महाभारतातल्या सगळ्याच नायिका सुंदर आहेत. शकुंतला, सत्यवती, कुंती, गांधारी, साऱ्याच जणी त्यांच्या अनुपम सौंदर्यासाठी प्रसिद्ध होत्या. शकुंतला सुंदर होती पण प्रियकराच्या सहवासात त्या सौंदर्याची सफलता झाली. कुंतीने आणि गांधारीने त्यांचा त्यांचा राजवंश वाढवला. सत्यवती तर मुळातच मनात राजसत्तेची लालसा घेऊनच कुरुवंशात आली होती. सुभद्रेने तर अर्जुनाचेच हरण केले. पण इंद्राच्या पाच अंशांना स्वतःच्या सौंदर्याच्या, बुद्धीच्या, प्रेमाच्या, कर्तव्याच्या, प्रसंगावधानाच्या, पाशात जिने बद्ध केले अशी ती कल्याणी अलौकिकच.

महाभारतातल्या साऱ्याच नायिका गोऱ्या रंगाच्या. कुणी गुलाबी कमळासारख्या, तर कुणी मोगऱ्यासारख्या नाजूक, कुणी प्राजक्तासम कोमल तर कुणी पिवळ्या मोहवून टाकणाऱ्या चाफ्यासम, परंतु पांचालीचे सारेच निराळे. मूळ भारतीय गहूवर्णीय, श्यामवर्णी सौंदर्याची ती परिसीमा आहे. जणू ती इंद्राची पट्टराणी शचीचे सौंदर्य घेऊन भूतलावर आली आहे. इंद्रायणीचे पार्थिव स्वरूपातले प्रतिनिधित्व करते ती नीलमण्याची कांती घेऊन अवतरलेली कमल दलासारखे नेत्र असलेली, विपुलकेश सांभाराची साम्राज्ञी द्रौपदी.

द्रोपदीच्या साऱ्या सौंदर्याचं रहस्य तिच्या शरीराच्या प्रमाणबद्धतेत आहे. ती उंच नाही, ठेंगणी नाही, किडकीत नाही, की लठ्ठ नाही. तेज आणि कोमलता तिच्या अंग प्रत्यांगात भरलेली आहे. तिचा प्रत्येक विभ्रम विलोभनीय आहे. जो कोणी तिच्याकडे पाही तो तिच्यावर लुब्ध होई. परंतु द्रौपदीचा विशेष हा की आपण पुरुषांवर छाप पाडू शकतो हा स्त्री सुलभ अभिमान तिच्या प्रत्येक कृतीतून प्रकट झालेला आहे.

अशी ही कामकलिका द्रोपदी जन्मताच जळते आणि जाळते रुप घेऊन आलेली आहे. द्रोणाचा पराभव करेल असा वीर पुत्र द्रुपदाला हवा होता आणि त्याने जो यज्ञ केला त्याचे फलस्वरूप म्हणजे धृष्टुत्द्युम्न आणि याज्ञसेनी यांचा जन्म.

द्रुपदाने जेव्हा पुत्रप्राप्तीसाठी यज्ञ केला आणि त्यातून जे हर्वीद्रव्य किंवा प्रसाद बाहेर आला त्यावेळी द्रुपदाची पत्नी 'पृषती' ऋतुमती असल्याने, आणि फलशोधनाचा मुहूर्त टळत असल्यामुळे तिथे उपस्थित असलेल्या ऋषींनी तो प्रसाद त्या यज्ञकुंडातच टाकला. यज्ञात शेवटची आहुती पडली आणि यज्ञ देवतेने आकाशवाणी केली.

देवता- "द्रुपदा तुला तुझे मनोरथ पूर्ण करणारा शूर लढवय्या पुत्र देताना प्रकृतीचे वरदान म्हणून एक पुत्रीही प्राप्त झाली आहे. लक्षात ठेव ही दोन्ही मुलं मानव जातीचा इतिहास, वर्तमान आणि भविष्य यावर दूरगामी परिणाम करतील! तुझी तेजस्वी कन्या आर्यवर्ताचे वर्तमान आणि भविष्यकर्ती असेल."

त्या यज्ञदेवतेच्या आकाशवाणीने पांचाल नरेश द्रुपद आनंदित होते आणि चिंतामग्न देखील. कारण त्याकाळी कन्या म्हणजे एक अस्तित्व नसलेली वंशवेल वाढवणारी स्त्री असाही एक समाजमान्य विचार रूढ होता. मुळातच द्रोणाचार्यांचा सूड घ्यायचा या भावनेने केलेल्या यज्ञाचं फलित जसं असायला हवं तसंच होतं. धृष्टुत्द्युम्नाने कपटाने द्रोणाचार्यांचा वध केला, त्याचप्रमाणे आयुष्यभर द्रोपदी पदोपदी, क्षणोक्षणी अरे ला कारे केल्याशिवाय राहत नाही. जणू सुडाची लखलखती तळपती तलवार घेऊनच ती प्रत्येक वेळी उभी असते. साक्षात अग्नीचा प्रसाद म्हणून ती माहेरीही लाडकी होती. तिचे स्वतःचे नाव ‘कृष्णा’, द्रुपद कुळातली म्हणून द्रौपदी, पांचालांची राजकन्या म्हणून पांचाली, यज्ञसेन द्रुपदाची मुलगी म्हणून याज्ञसेनी.

द्रौपदीच्या लग्नाच्या दिवसापर्यंत पांडव बापूडवाणे, बिचारे आणि अनाथ होते. चुलत्याच्या दुष्ट कारस्थानातून ते जीवानिशी कसेबसे बाहेर पडले होते. आपण जिवंत आहोत हा सुगावाही शत्रूंना लागू नये म्हणून लपतछपत या गावाहून त्या गावी हिंडत होते. द्रोपदीच्या स्वयंवराला आले तेही ब्राह्मणांच्या वेशाने. अगदी आपण कोण हे इतरांना कळून देण्याची खबरदारी घेऊनच. द्रुपदाच्या राज्यामध्ये त्यांना द्रौपदीच मिळाली असं नव्हे तर पराक्रमी वैभवशाली मित्र पाठीराखे मिळाले. बायकोचं माहेर द्रुपद आणि आईचं माहेर यादव यांच्या संयुक्त पाठबळाने त्यांना प्रकट होऊन बेधडकपणे हस्तीनापुरच्या राज्याचा वाटा मागता आला. द्रोपदीशी लग्न केल्यामुळे पांडवांना नुसती सुंदर बायकोच मिळाली असं नव्हे तर प्रतिष्ठा मिळाली आणि राज्यही.

विवाहाच्या पहिल्या रात्री पांचाली जेव्हा पांडवांबरोबर त्यांच्या घरी गेली तेव्हा तिच्यावर पहिला अन्याय झाला. द्रौपदीच्या नीलवर्णी सौंदर्याने पाचही पांडव तिच्यावर लुब्ध झाले होते. ही बाब कुंतीच्याही लक्षात आली होती म्हणूनच तिने त्या रात्री काही एक न बोलता आपल्या सुनेला आणि मुलांना आराम करण्याचा आणि वेळ काढूपणाचा सल्ला दिला.

त्या रात्री युधिष्ठिर पांचालीला म्हणाला की “आमच्या पाचही बंधूंचे पाय तुझ्या तनुला स्पर्शतील अशा रीतीने तु झोप.” बिचारी द्रौपदी! नववधू, त्यातच स्वयंवराच्या वेळी झालेला मोठा युद्धप्रसंग, आणि विवाह बद्दल निर्णय न घेता वेळ काढूपणा करणारी सासू बघून ती जरा भांबावली होती. त्या रात्री ती काही एक न बोलता निमूटपणे, तिने युधिष्ठराचे म्हणणे ऐकले पण त्यानंतर मात्र तिने प्रत्येक वेळी स्वतःचेच म्हणणे खरे केले.

महाभारत काळी थोरल्या मुलाला वंशपरंपरा अधिकाराचा आणि द्रव्याचा वारसा मिळत असे. आई-वडिलांचे श्राद्ध आणि गृहस्थपणाची सर्व कर्तव्य बजावण्यासाठी त्याला लग्न आवश्यक असे. अशावेळी युधिष्ठिर आधी अर्जुनाने लग्न करणे म्हणजे थोरल्याचे सामाजिक, कौटुंबिक आणि धार्मिक अधिकार हिरावून घेण्यासारखे होते. शिवाय द्रौपदीच्या बाबतीत जर अर्जुनाने एकट्यानेच तिच्याशी लग्न केले असते तर त्याच्या मोठ्या भावांना इतक्या तोला मोलाच्या राजघराण्यातील मुलगी मिळणे अवघड झाले असते. त्या काळच्या परंपरेनुसार थोरल्याच्या बायकोवर त्याचे लहान बंधू अधिकार सांगू शकत. शिवाय आधीच्या पिढीत भीष्माने आपल्या भावाकरिता मुली जिंकून आणल्याच होत्या. म्हणूनच अर्जुन आणि जिंकलेल्या मुलीचे धर्माशी लग्न होणे शक्य होते, त्याकरिता कुंतीने पांचालीचं लग्न तिच्या पाचही पुत्रांशी लावून दिले. द्रौपदी पाच पांडवांची बायको झाली.

खरे तर द्रौपदीला बघून सर्व भावांच्या नजरा तिच्यावर खिळल्या होत्या. सर्वांच्या मनात तिच्याबद्दल अभिलाषा उत्पन्न झाली होती. जर ती एकाची झाली असती तर त्या भावांमध्ये कलाहाची बीजे पेरली गेली असती. आणि त्या सर्वांचा समुळ नायनाट झाला असता, परंतु पाचही जणांशी तिचा विवाह कुंतीने लावून दिल्यामुळे पांडवांची एकी अभेद्य राहिली.

©® राखी भावसार भांडेकर.


संदर्भसूची

1. मृत्युंजय, लेखक शिवाजी सावंत.

2. राधेय, लेखक रणजित देसाई.

3. व्यासपर्व, लेखक दुर्गा भागवत.

4. युगांत, इरावती कर्वे.

5. ती मयसभा, चित्रा बॅनर्जी दिवाकरुणी.

6. कल्पवृक्षाची कन्या, सुधा मूर्ती.

7. मत्स्यगंधा, वसंत कानेटकर.

8. पर्व, एस.एल. भैरप्पा