बरोबरीचा अधिकार
भाग १
" मयुरी, तुझ्या क्रेडिट कार्डवरून या महिन्यात ऑनलाईन ग्रोसरीवर सात हजार कसे खर्च झाले ? मला जरा त्या ॲपचं स्टेटमेंट डाऊनलोड करून दाखव, नक्की कुठे काय मागवलंस ते..." अनिकेतने ऑफिसची बॅग सोफ्यावर ठेवली. मोबाईलवर बँकेचा मेसेज आलेला. तो वाचून त्याच्या भुवया उंचावल्या. तो दाखवत त्याने कडक आवाजात विचारलं.
मयुरीने शांतपणे पिहूचा गृहपाठ घेत होती. तिने पिहूला काही गणित सोडवायला दिली. किचन मधून पाण्याचा ग्लास घेऊन ती अनिकेत समोर बसली. त्याने पाण्याचा ग्लास बाजूला ठेवून तिला तो मेसेज दाखवला.
"अनिकेत, या महिन्यात वाणसामान— तीन हजार, दूध बाराशे, आणि पिहूच्या शाळेचा वाढदिवस होता म्हणून तिच्या मित्रांसाठी जे चॉकलेट्स आणि स्नॅक्स मागवले ते अठराशे. झाले सात हजार. यातला एकही रुपया मी स्वतःच्या वैयक्तिक हौसेसाठी खर्च केलेला नाहीये."ती शांतपणे म्हणाली.
अनिकेतने चरफडत मोबाईल खिशात टाकला. पण त्याच्या कपाळावर आठ्या पडल्या होत्या. तो रागावून म्हणाला,
" तरीही, ऑर्डर करताना थोडी काटकसर करायला शिक. पैसा काय झाडाला लागत नाही. प्रत्येक गोष्टीचा ताळेबंद असायला हवा." तो निर्णय ऐकवून फ्रेश होण्यासाठी रूममध्ये गेला.
मयुरीने काहीच उत्तर दिलं नाही. तिच्या मनाला रोज हेच वागणं टोचत होतं. अनिकेत एका मल्टिनॅशनल कंपनीत चांगल्या हुद्द्यावर होता, घरात पैशाची तशी काही कमी नव्हती. पण मयुरीने पिहूच्या जन्मानंतर तिची नोकरी सोडली होती, त्यामुळे ती आर्थिकदृष्ट्या अनिकेतवर अवलंबून होती. याचा अर्थ तिने प्रत्येक भाजीच्या जुडीचा किंवा ऑनलाईन मागवलेल्या दुधाचा हिशोब द्यावा, हे अनिकेतच वागणं बोलणं टोकणं! हा तिच्या स्वाभिमानाला रोज लागणारा ओरखडा होता.
खरा विरोधाभास एक दिवशी संध्याकाळी समोर आला, जेव्हा अनिकेतची आई आणि त्याचा लहान भाऊ त्यांच्या घरी आले.
हॉलमध्ये चहा पिता पिता लहान भावाने सहज विषय काढला,
"दादा, मी जो कॅफे सुरू केला होता ना, त्याचं ऑनलाईन मार्केटिंग आणि इन्स्टाग्राम प्रमोशन करायचंय. ब्रँडिंगसाठी एका एजन्सीला दीड लाख रुपये खर्च करायचे आहेत, नाहीतर बिझनेस वाढणार नाही."
आईनेही भावाच्या सुरात सूर मिसळला,
" अरे अनिकेत, आपल्या गावाकडच्या घराचं जुनं किचन बदलून ते शहरात असतं तसं सोयीचं असं मॉड्यूलर किचन करून घ्यायचंय मला. गावातल्या सगळ्यांच्या घरी आता तशीच स्वयंपाकघरं झालीत. आपल्या घराची डागडूजी पण करायला हवीच ना!"
अनिकेतने एका सेकंदाचाही विचार केला नाही. त्याचा पुरुषी अहंकार दुखावला गेला.मोठा भाऊ असण्याचा अभिमान जागा झाला. त्याने फोन काढला. बँकेच्या ॲपवरून दोन लाख रुपये भावाच्या खात्यावर ट्रान्सफर केले.
"आई, तू काळजी करू नकोस. गावी जे काय बेस्ट आहे तेच करून घे. आणि विनू, बिझनेसची काळजी करू नको, पैशा कमी पडले तर मी आहे ना! हक्काने सांगत जा." अनिकेत अभिमानाने म्हणाला.
मयुरी हे सगळं किचनच्या दारातून पाहत होती. हलकेच तिच्या डोळ्यांत पाणी आलं. अनिकेतने भावाला किंवा आईला एकदाही विचारलं नाही की,
" आधीच्या स्टार्टअपच्या पैशांचं काय झालं ? या नव्या किचनच्या दुरुस्तीची खरंच लगेचच गरज आहे का ?"
आता अनिकेतला तिथे कोणताही ताळेबंद दिसत नव्हता, तिथे फक्त लुटवून देणे. मोठ्या भावाचे स्टेटस दाखवणे होतं. पण घराचा गाडा चालवणाऱ्या मयुरीच्या वाट्याला मात्र प्रत्येक रुपयाची कात्री येत होती.
त्या रात्री मयुरीने अनिकेतला थेट विचारलंच,
" अनिकेत, भाऊजी आणि आईने स्टेटस आणि स्टार्टअपसाठी दोन लाख मागितले, तेव्हा तू डोळे झाकून दिले. मग माझ्याकडेच प्रत्येक पाच रुपयांच्या कोथिंबीरचा जाब का विचारतो ?"
अनिकेतने चिडून उत्तर दिलं,
"मयुरी, तू तुझी मर्यादा ओलांडू नकोस. ते माझं कुटुंब आहे, त्यांच्या गरजांवर खर्च करताना मी हिशोब ठेवत नाही. तू घराचं बजेट सांभाळतेस, त्यामुळे तुझ्याकडे हिशोब मागणं माझा अधिकार आहे. यात वाद घालण्यासारखं काहीच नाही."
मयुरीला जाणवलं की, अनिकेतसाठी त्याचं स्वतःचं कुटुंब वेगळं होतं. जिने स्वतःचं करिअर सोडलं ती पत्नी फक्त एक कॅशियर कम मॅनेजर होती. तिने ठरवलं, एक कठोर निर्णय घेतला. आता या दुटप्पी मानसिकतेला भांडून नाही, तर कृतीतूनच उत्तर द्यायचं !
