Login

फिरंग्यांचा कर्दनकाळ भाग १

फिरंग्यांचा कर्दनकाळ भाग १

फिरंग्यांचा कर्दनकाळ

भाग १

" सुभेदार... या अथांग समुद्राने आत्तापर्यंत अनेक वादळं पचवली असतील, पण आज जे वादळ क्षितिजावर आकाराला येतंय, ते विजयदुर्गचं काळीज ओरबाडण्यासाठी येतंय! जरा निरखून बघा..."

विजयदुर्ग किल्ल्याच्या पश्चिमेकडील सर्वोच्च काळभैरव बुरुजावर उभ्या असलेल्या रामाजी कोळीचा आवाज हवेतील मिठाच्या वासासोबत थरथरत होता. डोक्यावर पांढरा फेटा आणि कमरेला सुरा खोचलेला रामाजी, जन्मापासून या समुद्राच्या लाटांवर खेळलेला माणूस होता. समुद्राच्या पाण्याच्या रंगावरून आणि वाऱ्याच्या गतीवरून येणाऱ्या संकटाचा अचूक वेध घेण्याची कला त्याच्या रक्तात होती.

त्याच्या शेजारीच उभे असलेले सरखेल कान्होजी आंग्रे यांचे उजवे हात आणि आरमारी सुभेदार तुकोजी संकपाळ यांनी हातातील लांब पितळी दुर्बीण डोळ्याला लावली. मावळत्या सूर्याची शेवटची तांबूस किरणं समुद्राच्या पाण्यावर रक्तासारखी पसरली होती. तुकोजींनी दुर्बिणीतून दूर क्षितिजावर पाहिलं, आणि त्यांच्या कपाळावर आठ्यांची जाळी पसरली.

"अक्कलशून्य फिरंगी..." तुकोजींचा करारी आवाज उमटला.

"त्यांना वाटतंय की पांढरी शिडं चढवून आणि जहाजांची टोकं धारदार करून ते आंग्र्यांच्या घरात घुसतील? रामाजी, किती जहाजे आहेत?"

"एक, दोन, तीन... नाही सुभेदार, पूर्ण बारा आहेत! आणि ती साधीसुधी गलबतं नाहीत. पोर्तुगीजांची 'गॅलिऑन्स' आहेत ती. पुढच्या बाजूने एखाद्या सुसरसारखी टोकदार! पाण्याच्या छाताडाला चिरत वाऱ्याच्या वेगाने धावतायत," रामाजीने चिंतेने आपल्या हातातील काठी जमिनीवर आपटली.

तब्बल बारा अजस्त्र पोर्तुगीज युद्धनौकांचा तांडा विजयदुर्ग किल्ल्याला वेढा घालण्यासाठी खाडीच्या मुखाकडे सरकत होता. ही जहाजे पाण्यावर वेगाने धावण्यासाठी खास पोर्तुगालच्या गोदीत तयार करण्यात आली होती. त्यांचे पुढचे टोक लोखंडी पट्टीने मढवलेले आणि सुईसारखे तीक्ष्ण होते, जेणेकरून वाटेत येणाऱ्या कोणत्याही लाकडी जहाजाला ते एका धडकेत दोन तुकड्यांमध्ये फाडू शकत होते.

किल्ल्याच्या आत 'धुम्-धुम्-धुम्' असा धोक्याचा नगाडा वाजू लागला. विजयदुर्गच्या तटबंदीवर तैनात असलेले मावळे हातात भाले आणि मशाली घेऊन धावू लागले. गडाच्या खालच्या भागात राहणाऱ्या कोळी बांधवांच्या वस्तीत आणि सैनिकांच्या कुटुंबात एकच खळबळ उडाली. महिला आपल्या लहान मुलांना कडेवर घेऊन किल्ल्याच्या सुरक्षित भुयारी मार्गाकडे धावत होत्या. हवेत भीती आणि युद्धाचा तणाव स्पष्ट जाणवत होता.

गडाच्या मुख्य खलबतखान्यात मशालीच्या पिवळ्या प्रकाशात एक मोठा नकाशा पसरला होता. सरखेल कान्होजी आंग्रे शांतपणे एका लाकडी आसनावर बसले होते. त्यांच्या चेहऱ्यावर कोणतीही घाई किंवा भीती नव्हती. एका हाताने ते आपल्या धारदार तलवारीच्या मुठीवर बोटे फिरवत होते, तर दुसऱ्या हाताने नकाशावरील विजयदुर्गच्या खाडीची रचना न्याहाळत होते.

त्यांच्यासमोर बाजीप्रभू सरनाईक आणि तुकोजी संकपाळ उभे होते.

"सरखेल!" बाजीप्रभू सरनाईक थोडे अस्वस्थ होऊन म्हणाले,

"शत्रूने खाडीच्या मुखापाशी नांगर टाकला आहे. पोर्तुगीजांचा व्हाइसरॉय दॉम पेरैरा स्वतः या मोहिमेचे नेतृत्व करतोय. त्यांच्या जहाजांवर अशा तोफा आहेत, ज्यांची मारक क्षमता आपल्या तटबंदीच्या तोफांपेक्षा जास्त आहे. जर त्यांनी लांबूनच तोफमार सुरू केला, तर आपल्याला प्रतिहल्ला करणे कठीण जाईल. त्यातच त्यांची जहाजे प्रचंड वेगात आहेत, आपली लहान गलबतं त्यांच्या एका धडकेत समुद्राच्या तळाशी जातील!"

खलबतखान्यात काही क्षण शांतता पसरली. एका तरुण सरदाराने हळूच म्हटले,
" महाराज, आपण तह करावा का? पोर्तुगीजांचे आरमार अफाट आहे..."

ते ऐकताच कान्होजी आंग्रे यांनी आपली करडी नजर त्या तरुण सरदारावर रोखली. खलबतखाना एकाएकी बर्फासारखा थंड झाला. कान्होजी शांतपणे उठले आणि नकाशाजवळ आले. त्यांचा पहाडी आवाज घुमला

"तह ? आणि तोही या समुद्राच्या लुटेऱ्यांशी ? ज्या समुद्राला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची आई मानलं, त्या समुद्रावर हुकूमत गाजवण्याचा अधिकार फक्त आणि फक्त मराठ्यांचा आहे!
पोर्तुगीजांना वाटतंय की त्यांची जहाजे टोकदार आणि अवाढव्य आहेत म्हणून ते अजिंक्य आहेत? अरे, वाघ कितीही मोठा असला, तरी तो समुद्रात पोहू शकत नाही. हा समुद्र आमचा आहे, आणि याचे नियम आम्ही ठरवतो!"

कान्होजींनी रामाजी कोळीकडे पाहिले,
"रामाजी, समुद्राची स्थिती काय आहे?"

"रात्रीच्या तिसऱ्या प्रहरापासून पाणी ओसरायला सुरुवात होईल, महाराज. पहाटेपर्यंत पूर्ण ओहोटी असेल," रामाजीने हात जोडून सांगितले.

"उत्तम!" कान्होजींच्या ओठांवर एक गूढ, करारी हास्य उमटले.

"तुकोजी, आपल्या भवानीप्रसाद गुराबाला आणि तेजस्विनी गलबताला खाडीच्या पाठीमागील कातळाच्या आडोश्याला लपवून ठेवा. एकाही जहाजाचा दिवा पेटता कामा नये. शत्रूला वाटू द्या की मराठे घाबरून किल्ल्यात लपले आहेत. बाजीप्रभू, तटबंदीवरील तोफखान्याला हुकूम द्या... शत्रूने कितीही गोळे डागले, तरी पहिली आज्ञा मिळेपर्यंत शांत बसायचे. शत्रूचा अहंकार जितका वाढेल, तितका त्याचा विनाश जवळ येईल!"

दुसऱ्या बाजूला, समुद्रात नांगर टाकून उभ्या असलेल्या सान मिगेल या पोर्तुगीज फ्लॅगशिप जहाजाच्या कॅप्टन रूममध्ये वेगळेच चित्र होते. मखमली पडदे, महागडी दारू आणि चांदीच्या ताटात सजलेले मांस... पोर्तुगीज व्हाइसरॉय दॉम पेरैरा एका मोठ्या खुर्चीवर पाय पसरून बसला होता. त्याच्या डोक्यावर पिसांची टोपी होती आणि डोळ्यांत मराठ्यांबद्दल पराकोटीचा द्वेष आणि गर्व होता.
त्याच्या समोर तोफखाना प्रमुख कॅप्टन रॉड्रिगेस उभा होता.

"अडमिरल पेरैरा," रॉड्रिगेसने दारूचा पेला पुढे करत म्हटले,

"विजयदुर्ग किल्ल्यावरून कोणतीही हालचाल दिसत नाहीये. आंग्र्याचे उंदीर आपल्या जहाजांचा आकार पाहूनच बिळात लपलेले दिसतात."

पेरैरा मोठ्याने हसला, त्याचा अट्टाहास जहाजाच्या लाकडी भिंतींवर आदळला.

"रॉड्रिगेस! हा कान्होजी आंग्रे स्वतःला समुद्राचा शिवाजी समजतो. त्याने आमच्या अनेक व्यापारी जहाजांना लुटले आहे. पण आज पोर्तुगालचे साम्राज्य त्याला त्याची जागा दाखवेल. आपली जहाजे पाहिली ना ?
पाण्यावरून कशी उडतात! उद्या सकाळी भरती येताच, आपण आपली टोकदार जहाजे थेट विजयदुर्गच्या छाताडावर घालणार आहोत. त्यांच्या एकाही लाकडी जहाजाला आम्ही जिवंत सोडणार नाही."

रॉड्रिगेसने खिडकीतून बाहेर पाहिले.
"पण अडमिरल, आज रात्री काय करायचे? शत्रूला मानसिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी काहीतरी करायला हवे."

पेरैराचे डोळे क्रूरतेने चमकले. त्याने आपला पेला टेबलावर आदळला आणि ओरडला,

"कॅप्टन रॉड्रिगेस! सांओ पेद्रो जहाजाला पुढे करा. आणि गडाच्या मुख्य तटबंदीवर तोफगोळ्यांचा पाऊस पाडा! आज रात्री आंग्र्याला आणि त्याच्या मावळ्यांना झोप येऊ देऊ नका. त्यांना मृत्यूची घंटा ऐकू जावू द्या!"

रात्रीचा दुसरा प्रहर सुरू झाला. संपूर्ण विजयदुर्ग काळोखाच्या चादरीत वेढला गेला होता. फक्त तटबंदीवर काही मशाली जळत होत्या.

अचानक, समुद्राच्या बाजूने एक भयंकर गर्जना झाली.

तोफांनी एकदम आगी ओकल्या.लाल पिवळ्या केशरी रंगाच्या ज्वालांनी अवघा आसमंत थरथरला.

सांओ पेद्रो या पोर्तुगीज जहाजाच्या तोफांनी एकाच वेळी आगी ओकायला सुरुवात केली होती. काळोख्या रात्री आकाश अचानक लाल-पिवळ्या प्रकाशाने उजळून निघाले. आकाशातून आगीचे जळते प्रचंड तोफगोळे शिट्ट्या घालत, हवा चिरत थेट विजयदुर्गच्या दिशेने झेपावले.

'धाडक... धाडक...!'

दोन प्रचंड तोफगोळे थेट विजयदुर्गच्या पश्चिमेकडील मुख्य तटबंदीवर येऊन आदळले. पाषाणाला पाषाण भिडला. इतका भीषण आवाज झाला की जणू काही भूकंप झाला असावा. आगीच्या ठिणग्या हवेत उडाल्या, आणि किल्ल्याची भक्कम पाषाणाची भिंत थरथरली. तटबंदीचे काही अवाढव्य दगड निखळून खाली गर्जना करणाऱ्या समुद्रात कोसळले.

किल्ल्याच्या आत धुराचे लोट उठले. सैनिकांमध्ये हलकी धावपळ सुरू झाली. पाठोपाठ आणखी तीन गोळे गडाच्या आत पडले, ज्यामुळे काही धान्याच्या कोठारांना आग लागली.

"सरखेल! शत्रूच्या तोफांची रेष थेट आपल्या मुख्य बुरुजापर्यंत पोहोचते आहे! तटबंदीला तडे जात आहेत! जर हा मारा असाच सुरू राहिला, तर उद्या सकाळपर्यंत गड कोसळेल!"
एक तरुण मावळा धापा टाकत, रक्ताळलेल्या हाताने कान्होजींच्या समोर येऊन ओरडला.

पण सरखेल कान्होजी आंग्रे तटबंदीच्या त्या कोसळलेल्या भागावर उभे होते. शत्रूचे तोफगोळे त्यांच्या डोक्यावरून जात होते, पण त्यांच्या पायात अंगदासारखा अढळ विश्वास होता. त्यांनी तटबंदीच्या गरम झालेल्या, धूर निघणाऱ्या पाषाणावर आपला हात ठेवला. त्यांच्या डोळ्यांत पोर्तुगीजांच्या विनाशाची ठिणगी चमकत होती, पण चेहरा शांत समुद्रासारखा धीरगंभीर होता.

ते मागे वळले आणि आपल्या थरथरणाऱ्या मावळ्यांच्या खांद्यावर हात ठेवून अत्यंत शांत पण करारी आवाजात म्हणाले,

"घाबरू नका! हा विजयदुर्ग फक्त दगडांचा बनलेला नाही, तो मराठ्यांच्या मनगटाने बांधला आहे. फिरंग्याला डागू द्या त्याचे तोफगोळे... त्यांना वाटू द्या की ते जिंकत आहेत. कारण जेव्हा एखाद्या रात्रीचा अंधार सर्वात जास्त गडद होतो... तेव्हाच समजायचे की, उजाडण्याची वेळ जवळ आली आहे! उद्या सकाळी हाच समुद्र त्यांची थडगी बांधेल..."

क्रमशः

0
📱

ईरा App

आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने

आजच ईरा App इंस्टॉल करा →